त्या मित्राबरोबर त्या लहान रस्त्यांतून मी जात होतो. सर्वत्र हिंगाचा उग्र दर्प पसरलेला होता. हिंग कुटायचा आवाज येत होता. बायामाणसेंही काम करीत होती. एका घरांत आम्ही शिरलो. लहानशा जिन्यानें वर गेलो. कांही मंडळी विश्रांति घेत होती. आम्ही जातांच ते उठले. त्यांच्या गळ्यांत माळा होत्या. तें वारकरी असावेत. भिंतीवर तसबिरी होत्या. तेथेंच झोपावें, तेथेंच बसावे; तेथेंच भजन, तेथेच भोजन. ना घर ना दार. कोठें तरी सार्वजनिक नळावर आंघोळ, कोठेंतरी सार्वजनिक शौचकूपांत मलमूत्रविसर्जन, असे ते घरदारहीन लोक होते. कांहींजण विश्रांति घेत होते; परंतु कांहींचे काम चालूच होते. परदेशांतून, अफगानिस्तानांतून, वगैरे अस्सल हिंग येतो. येथें तो हिंग फोडतात आणि त्यांत लांकडी तुकडे मिसळतात. लांकडी भुसा व अस्सल हिंग याचें मिश्रण करण्यांचे काम तेथें चालत असतें. मूळ हिंगांत किती लांकूड मिसळतात, हरि जाणे ! अशा रीतीनें अफाट नफा कारखानदार मिळवीत असतो. त्याचें काम एकच. अस्सल हिंग आणून त्यांत लाकडी भुसा मिसळून तो वाढवायचा नि पैसे कमवायचे.

मी तेथें होतों. परंतु तो उग्र वास मला सहन होईना. एखादे वेळेस कपाळ दुखतांना हिंग उगाळून कपाळावर घालतात. परंतु त्याचा किती भिरभिर असतो! डोळ्यांना तो हात लागला तर डोळा सारखा चुरचुरत राहतो. मग या लोकांचें कसें होत असेल ? मिठागरांत काम करणार्‍यांच्या पायांना ज्याप्रमाणें क्षतें पडतात, उन्हांत चमकणार्‍या मिठांत काम करून त्यांचे डोळे अधू होतात, तसाच प्रकार येथेंही असेल. तेथें बसलेल्या बंधु-भगिनींकडे पाहून मला वाईट वाटलें.

‘तुमच्यानें कसें करवतें हें काम ? किती उग्र हा दर्प ! मी थोडा वेळ येथे आहे, तोंच कसें तरी होत आहे. वर्षानुवर्ष तुम्ही हें काम करता  ? मी विचारलें.

“हौसनें का दादा, कोणी काम करतो ? पोटासाठी सारें करतो. खर्‍या हिंगांत लांकूड मिसळायचें आणि पैसे मिळवायचें. तो हिंग फोडतांना आणि त्यांत लांकूड मिसळून कुटतांना आमचा जीव हैराण होतो. डोळे तर सारखें चुरचुरत असतात. पाणीं येतें. त्यांत पुन्हा हात लागला तर आणखीच चुरचुर. आणि हाताची नुसती आग होते. तो अस्सल हिंग असतो. रद्दी हिंग लागला डोळ्याला तरी असह्य होतें, मग आमची काय होत असेल दशा, कल्पना करा.” तो माळकरी सांगत होता. त्याचे डोळे मिर्णामण करीत होते. ते तेजस्वी डोळे निस्तेज होत होते. मी काय बोलूं ?

“तुम्ही येथें किती वर्षें काम करता ?” मी पुन्हा विचारले.

“येथें फार वर्षें काम नाही करतां येत. कापडाच्या गिरणींत तीस तीस वर्षेही कामें करतात; परंतु येथें नाहीं करता येणार. दहापंधरा वर्षे होताच डोळे बिघडूं लागतात. हें हिंगफोडीचें काम म्हणजे आंधळे करणारे. डळ्यांना हा उग्र वास सहन होत नाहीं. आम्ही शेवटी आंधळे होतो. कमी दिसूं लागलें कीं, संपलें काम. पुन्हा बेकार ते बेकार ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel