आत्या : का रे, आतासा आलास ?

शशी : मास्तर वर्गात बसू देत नाहीत.

आत्या : का ?

शशी : टोपी नाही म्हणून.

आत्या : दिलेली टोपी काय झाली ?

शशी : मुले माझ्या पाठीस लागली म्हणून ती फेकून दिली.

आत्या
: काय, फेकून दिलीस ?

शशी : हो, गटारात फेकली.

आत्या : शाबास आहे बाबा ! जहांबाज पोर आहेस ! टोपी फेकून दिलीस, आणि निर्लज्जपणे सांगतोस ? तुला लाज नाही, भय नाही, धाक नाही ! तू बाबा आपल्या घरी चालता हो. आमच्याकडे नाही तुझा निभाव लागावयचा ! जसा सत्त्व पाहायला आला आहेस !”

शशी काही बोलला नाही. आत्याबाई बडबड करीत खाली जाऊन निजल्या. शशीलाही तेथे जरा झोप लागली. सायंकाळी शाळा सुटली आणि मिठाराम व रघुनाथ घरी आले. मिठाराम शशीजवळ गेला. शशी काळवंडला होता.

मिठाराम
: शशी काय रे झाले ?

शशी : काय सांगू, मिठा ?

मिठाराम
: शशी, रडू नकोस. रडून रडून तुझे डोळे लाल झाले आहेत. मिठारामने शशीचे डोळे पुसले. शशीचे अंग त्याला क़ढत लागले.

मिठाराम : शशी, तुला ताप आला आहे, तुझे अंग कढत लागते आहे.

शशी : येऊ दे ताप.
मिठाराम खाली गेला व आईला म्हणाला, “आई, शशीला ताप आला आहे ग.” आई म्हणाली, “कसला ताप नि बीप? ढोंगी आहे तो! उठा म्हणावे दोन घास गिळा आणि निजा. शाळेत जायला नको म्हणून तापाचे सोंग!” मिठाराम शशीजवळ गेला व म्हणाला, “शशी, चल थोडे जेव म्हणजे बरे वाटेल. ऊठ हो!”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel