तिचे हे आळवणे चालू असता घरातले शब्द तिच्या कानांवर आले, ‘आज घेऊन जातो मोरीला. काय मिळतील १०-५ रुपये ते घेऊन येतो.’ शामराव बोलत होते. आठ वाजता तिला गोठ्यातून बाहेर काढण्यात आले. ती बेफाम झाली. हातातून निसटून गोठ्यात आली. तेथे बसली. उठेना. पाठीत काठ्या बसल्या. मुसक्या बांधून तिला ओढून नेण्यात आले. आपली आई, आजी. पणजी जेथे मेल्या तेथे मरावे अशी मोरीची इच्छा होती. ती पुरी झाली नाही. तिला चरण आठवला-‘तमेव शरणं गच्छ सर्वभावेण भारत!’ देवाची इच्छा प्रमाण. सारे चराचर मंगलच आहे. खाटकाच्या हातात तूच आहेस. त्या सु-यातही तूच आहेस. देवा, ने-मला कोठेही ने, परंतु हृदयराउळात तुझी मूर्ती असू दे. खाली मान घालून मोरी चालली होती. इतर गायी-बैल तिच्याकडे पाहात होते. मोरीने एक हंबरडा फोडला. “माझं प्रवचन ध्यानात धरा, सत्त्वाला जागा.” असे तिने या बंधु-भगिनीस सांगितले. मोरी गेली हे पाहून गावातील तृणवनस्पती, दगडधोंडे, पशु-पक्षी सर्वांना वाईट वाटले. परंतु तिचे शब्द, तिची शान्तगंभीर वाणी अद्याप सृष्टीच्या कानांत घुमत होती.

मोरी शांत दिसत होती. अश्रू तोंडावर सुकले होते. डोळे शांत, स्निग्ध झाले होते. तिने आपल्या धन्याला आणि मुलाबाळांना आशीर्वाद दिला.

आज गुरांचा बाजार. तेथील मुख्य गि-हाईक कसाबच. हिंदुस्थानातील दारिद्र्य, निष्ठुरता सारे तेथे दिसत होते. एका गोष्टीवरुन सा-या संसाराचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. हिंदुस्थानातील झाड पाहा, फळे पाहा, पशु-पक्षी पाहा, गायीबक-या पाहा, मुले पाहा, स्त्रिया पाहा, -कुठेही नजर फिरवा- हिंदुस्थानाचे दारिद्र्य, दुर्दैव तुम्हांला दिसून येईल. सर्वत्र मृतकळा.

खाली माना घालू गोमाता उभ्या होत्या, अपार मूक शोकसागर तेथे उसळला होता. सौदे होऊ लागले. शामरानवांच्या मो-या गायीकडे कोणी येईना. ती अत्यंत रोड होती. खाटीक पाहात व हसत जात. “अरे पाच रुपये –घ्या, घ्या.” शामराव म्हणत. शेवटी एका कसाबाला करुणा आली. आपल्या धन्याला आपल्यासाठी इतके तोंड वेंगडावे लागावे याचेच मोरीला वाईट वाटू लागले. ती देवाला मनात आळवीत होती. ‘देव, घेऊ दे रे मला कोणी तरी विकत. माझ्या चामड्याचे नाही का होणार एक-दोन जोडे, हाडांचे नाही का होणार चार-आठ आण्यांचे खत, मासाचे नाही का होणार काही पैसे? देवा, धन्याला का रे लाजवतोस?’ मोरीची ती प्रार्थना भगवानाने ऐकली. त्या सजन कसायाने तिला विकत घेतले. त्या कसायाचे नाव सजन होते. थोर पुरुषाचे नाव आपणास लाभावे यातही पूर्व-पुण्याई असते. त्या नावापुढे एखाद्या वेळी सद्बुद्धी होते. जीवनात क्रांती होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel