नारायण -  आणि '' राष्ट्रदेवो भव '' अशी लोकमान्यांची आज्ञा आहे.

गोपाळ -  अरे, धर्म हा श्रेष्ठ आहे इतरां कोणांहीपेक्षां !

नारायण -  धर्म म्हणजे तरी काय ?

खंडे -  अरे, धर्म म्हणजे आपल्या पूर्वीच्या आचाराप्रमाणं वागणं.

नारायण -  तुम्ही तरी सारे प्राचीन आचाराप्रमाणं वागणं गृहीं राहिलांत का ? गुर्वाज्ञा घेऊन विवाह केलात का ? मरेपर्यंत संसारांतच लोळणार का वानप्रस्थ व संन्यास हे आश्रमहि पाहणार ? रोज प्रात:काळीं स्नान करतां का ? आगगाडींत वाटेल तिथं बसतां कीं नाहीं ? चहा पितां कीं नाहीं ? हाडांच्या पुडींतून गाळलेली मोरस साखर मिळक्या मारून खातां कीं नाहीं ? बोला, कोणता पूर्वीचा आचार राहिला आहे ? कोण त्याहि वर्णाचा माणूस विश्रांतिगृह काढतो, हातांनीं हजामत करतो, शिंपी काम करतो, मग काय राहिलं आहे ? बोला.

गोपाळ -  अरे, हा आपध्दर्म आहे वेडया !

नारायण -  चांगला आहे आपध्दर्म ! जेव्हां कांही चालत नाहीसं होतं तेव्हां आपध्दर्माची ढाल पुढं !  हा तुमचा स्वार्थी धर्म तुम्हांसच लखलाभ होवो. मी धर्म म्हणजे एवढंच समजतों कीं, भूतदया करावी, सत्यानं वागावं; परोपकार, प्रेम व पावित्र्य ही ह्रदयांत ठेवून आपल्या देशावर प्रेम करावं, उत्तरोत्तर उदार व उन्नत व्हावं, उदात्त आचारविचार ठेवावा !

पद ( केदार, त्रिताल, जर्गी शील चि ०)
धर्म जगति हा वैष्णव मानी । दिवस सदा । जनसेवेवरी राहि म्हणोनी ॥ ध्रू ० ॥
परपीडन हें पाप तयाला । पुण्य म्हणे तो उपकाराला ।
कर्मी रत; त्यार्जि आपपराला ।
सौंख्य स्वतांचें लोकसुर्खि गणी ॥ १ ॥


अंधपरंपरा हा माझा धर्म नव्हें. परंपरेहून भूतदयेला, पावित्र्याला प्रेमाला, बंधुभावाला अधिक मान असून ज्या धर्मात ह्रदयाचा ओलावा आहे, तो धर्म मला पाहिजे आहे. आचरणाच्या दुराग्रहानं पर-पीडा देणारा धर्म हा मला अधर्म वाटतो.

खंडे -  बाळ, अरे, अभद्र बोलूं नकोस ! आपला जुना आचार सोडून, कुळाला कलंक लावून, पितृह्रदयाला दुखवून नरकाचं साधन करूं नको. दुस-याचं ह्रदय सुखविण्यासाठी झटतोस, परंतु जन्मदात्या पित्याच्या ह्रदयाची मात्र होळी करतोस ?

नारायण -  मला कुणाला सुखवायचं नाहीं, कुणला दुखवायचं नाहीं. मला सत्याची पूजा करावयाची आहे. ती करतांना महाराला सुख होईल अगर पित्याचं ह्रदय दुखावलं जाईल ! सत्य हें सौदा करीत नाही. सत्य हें आपलाच सरळ मार्ग चोखाळतं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel