एक होता राजा. त्याला ब-याच वर्षांनी मुलगा झाला. मग सोहळा काय वर्णावा? हत्तीवरून साखरा वाटण्यात आल्या. शेतसारे कमी करण्यात आले. कैद्यांना सोडण्यात आले. शहरांतून, खेडयापाडयांतून रोषणाई करण्यात आली. गाणे बजावणे चालू होते. मौज होती, आनंद होता.

राजाच्या दरबारांत एक विदूषक होता. त्याला राजाने विचारले, ''सर्वत्र सोहळा आहे, आनंद आहे. तुम्हांला हा प्रसंग कसा वाटतो?''

विदूषक म्हणाला, ''शौचास व्हावे तसा वाटतो.''

राजा रागावला. त्याने विदूषकाला घालवून दिले. एका झोपडीत विदूषक राहू लागला. परंतु काही दिवसांनी राजाला करमेनासे झाले. त्याने विदुषकाला बोलावणे पाठविले. विदूषक गेला नाही.

तेव्हा स्वत: राजा विदूषकाकडे आला व म्हणाला, ''चल बाबा. तुझ्यावाचून सारे आळणी आहे.''

''महाराज, आपण आलांत, आज माझ्या हातचे जेवा. मग तुम्ही नि मी नावेतून दूर जाऊ. मान्य करा.''

राजाने मान्य केले. विदूषकाने पंचपक्वान्नांचे जेवण केले. राजाला आग्रह करकरून वाढले. नंतर दोघे नवेत बसून जलविहराला गेले. विदूषकाने नाव दूर दूर नेली. परंतु राजाचे पोट दुखू लागले. तो कष्टी दिसू लागला.

''काय होते महाराज?''
''नाव मागे फिरव. लौकर किना-याकडे ने. पोटांत कळा येतात.''
''ते बघा नदीतील बेट. तेथे लावू का जरा नाव?''
''लाव कुठेही. मला शौचास लागली आहे बळकट.''
विदुषकाने नदीतील बेटाला नाव लावली. राजा घाईघाईत उतरला. बेटावरील झुडपांच्या आड बसून त्याने शौचविधी आटोपला. त्याला हलके वाटले. तो आनंदला. पुन्हा नावेवर तो चढला.

''महाराज, आता कसे वाटते?''

''काय सांगू? ब्रह्मानंद वाटतो रे. कसे हलके हलके वाटते आहे.''

''महाराज, मी मागे म्हटले की तुमच्या मुलाचा सोहळा शौचानंदाप्रमाणे आहे. तर तुम्हांला राग आला. परंतु हा आनंद म्हणजे ब्रह्मानंद असे तुम्हीच म्हणता. पुत्रजन्माचा उत्सव मी तुच्छ नव्हता मानला. तो ब्रह्मानंदाच्या बरोबरीचा असे मी म्हटले.''

''शहाणा आहेस रे तू. म्हणून तर तुला न्यायला आलो. तू हसवतोस परंतु ज्ञान देतोस!''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel