ईश्वरचंद्र या संस्थेचे फार आस्थेने संगोपन करीत आहेत, हे पाहून त्या शाळेच्या चालक-मंडळींतील पुष्कळ बड्या लोकांनी सर्वच जबाबदारी ईश्वरचंद्रांवर सोपविली आणि या शाळेचे ईश्वरचंद्र जीव झाले. ईश्वरचंद्र आणि विद्यालय याचां एकजीव झाला. शाळा भरभराटत चालली. नामांकित शिक्षक शाळेस मिळाले. तेव्हा विद्यालयाचे महाविद्यालयात ईश्वरचंद्रांनी रूपांतर केले. या महाविद्यालयास ईश्वरचंद्र हयात होते तोपर्यंत ‘मेट्रापॉलिटन महाविद्यालय’ असे नाव होते. त्यांच्या निधनानंतर त्यास ‘विद्यासागर महाविद्यालय’ हे नाव मिळाले. महाविद्यालयासाठी विद्यासागर अविश्रांत झगडले. मोठमोठे प्रोफेसर त्यांनी मिळविले. त्यांस गुणांची पारख होती. हंस जसा पाण्यातून दूध ग्रहण करतो, त्याचप्रमाणे वेचक माणसे ते घेत. अंबिकाचरण मुद्यावर ‘The grand old man of Faridpur’ ‘फरीदपूर येथील वृद्ध मुनी,’ जे लखनौच्या काँग्रेसला १९१६ मध्ये अध्यक्ष होते, ते या मेट्रापॉलिटन महाविद्यालयात आचार्य होते. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हेसुद्धा या महाविद्यालयास मिळाले. आय. सी. एस. होऊन आल्यावर सुरेंद्रनाथ यांस सरकारने मॅजिस्ट्रेटची जागा दिली होती. त्या जागेवर असता काही क्षुल्लक कारणांवरून सरकारने सुरेंद्रनाथ यांस काढून टाकले. सनदी नोकरीत सुरेंद्रांचा प्रवेश गोर्‍यांस सहन झाला नाही. ह्यूमसाहेबांनी, एका युरोपियनाचा असाच किंबहुना जरा मोठ्या स्वरूपाचा गुन्हा सरकारने कसा सारवासारवीने नाहीसा केला व काळ्या आदमीस (तो विद्वान व निरपराधी असता) कसे कस्पटासमान लेखले हे त्या वेळेच्या ‘हिंदू’ पत्राच्या अंकात दाखविले होते.

सुरेंद्रनाथ यांस त्या वेळी नोकरी नव्हती. वकिली किंवा बॅरिस्टरी करण्याची कलकत्त्यास सोय नव्हती. परंतु अंधारातून प्रकाश येतो, मरणातून जीवन येते, अभिनव व उदात्त जीवन लाभते, तसेच सुरेंद्रनाथांचे झाले. अन्यत्र सांगितले आहे की, मद्यपानप्रतिबंधक चळवळ चालली असता, एक प्रचंड जाहीर सभा कलकत्ता शहरात भरली होती. त्या सभेत सुरेंद्रनाथ यांस ‘भाषण करा’ असा आग्रह करण्यात आला. सुरेंद्रनाथांचे हे पहिलेच भाषण; अद्याप सार्वजनिक सभेत ते बोलले नव्हते; परंतु आता ते उभे राहिले; बोलले. सभा चित्राप्रमाणे तटस्थ झाली. दुसर्‍या दिवशी त्यांचे मित्र सुरेंद्रनाथांस म्हणाले, ’आपण कलकत्त्यातील एक उत्कृष्ट व्याख्याते असे सर्वजण बोलू लागले आहेत.’ सुरेंद्रांस समाधान झाले.

विद्यासागर या सभेत हजर होते. त्यांनी सुरेंद्रनाथांस आपल्या महाविद्यालयात इंग्रजीचे अध्यापक होण्याबद्दल विनंती केली. पगार फार नव्हता. रुपये २०० होता. परंतु तरुण विद्यार्थीगणांत मिसळण्याची सोन्याची संधी आली. तरुणांची मने काबीज करण्याची वेळ आली. ही संधी गमावू नये असा सुरेंद्रांनी विचार केला. त्यांनी ती जागा घेतली. तरुणांच्या मनात त्यांनी देशभक्ती उत्पन्न केली. विद्यार्थीसंघ स्थापन करून, त्या संघासमोर मॅझिनीसारख्या राष्ट्रभक्तांची चरित्रे त्यांनी वर्णिली; नवीन संदेश त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांस ते प्रिय झाले.

असे चालले असता ब्राह्मो समाजाच्या चालकांत काही फाटाफूट झाली. शिवनाथशास्त्री वगैरे लोक केशवचंद्रांपासून फुटून निघाले. त्यांनी सद्धर्मब्राह्मोसमाज स्थापन केला. त्यांनी नवीन ‘सिटी कॉलेज’ काढले. या सिटी कॉलेजमध्ये आम्हास येऊन मिळा असे सुरेंद्रांस त्या महाविद्यालयाच्या चालकांनी विनविले. ते जास्त पगार देणार होते. आपणास शिक्षण द्यावयाचे मग जर कौटुंबिक स्थिती सुधारत असेल तर तिकडे का न जावे, असा विचार करून सुरेंद्र तिकडे जाण्यास कबूल झाले. त्यांनी विद्यासागर यांस सर्व मजकूर विदित केला. विद्यासागर म्हणाले, ‘पैशाचाच प्रश्न असेल, तर आपणास येथे तशी ददात मी भासू देणार नाही. मी आपणास तिकडे देणार तेवढा पगार देतो.’ सुरेंद्रनाथ ‘येतो’ असे सांगून चुकले होते. कारण विद्यासागर परवानगी देतील असे त्यांस वाटले होते. परंतु हा सगळा अनपेक्षित प्रकार घडून आला. शेवटी ते विद्यासागरांस म्हणाले, “हे पाहा, मी तुमच्या महाविद्यालयात रोज एक तास शिकविण्यास येत जाईन; परंतु आता तिकडे जाण्यास मला उदार मनाने परवानगी द्या.” विद्यासागर हे दुसर्‍याच्या अडचणी जाणणारे, ते स्वतःच्या अडचणीसाठी दुसर्‍यास दुःखात किंवा संकटात लोटणारे नव्हते. त्यांनी सुरेंद्रनाथांस मोठ्या आनंदाने जावयास परवानगी दिली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel