प्यारीचरण यांनी सुरू केलेल्या चळवळीस चांगले यश आले. ईश्वरचंद्र या चळवळीत मोठ्या उत्साहाने मिसळले. जेथे म्हणून दुःख व कष्ट आहेत तेथे विद्यासागर जावयाचे. जेथे अन्याय आणि पाप होते आहे, तेथे ते नाहीसे करावयास ते पुढे यावयाचे. केशवचंद्रसेन हा प्रख्यात धर्मोपदेशक व अप्रतिम वक्ता या चळवळीत सामील झाला. या चळवळीसाठी कलकत्त्यास जी प्रचंड जाहीर सभा भरली होती, त्याच सभेत पहिले सार्वजनिक भाषण करून सरकारने हुसकून लावलेले सुरेंद्रनाथ बॅनर्जी जनमनांचे राजे झाले. अशा थोर पुरुषांनी, कार्यतत्परांनी जी चळवळ केली तिला यश कसे येणार नाही? त्या चळवळीस यश आले. तरुण पिढीवर या चळवळीचा चांगला परिणाम घडला. मद्यपानाच्या लाटेस आळा बसला. तिचे भेसूर व प्रचंड स्वरूप कमी झाले. सुशिक्षितांत तरी हे व्यसन कमी झाले यात शंका नाही.

वरील हकीगतीवरून ईश्वरचंद्र सामाजिक गार्‍हाणी व सामाजिक अन्याय दूर करण्यासाठी कसे झगडले ते समजेल. ज्ञानाचे दरवाजे सर्व जातींस खुले करण्यासाठी संस्कृत महाविद्यालयात त्यांनी कशी खटपट केली व ब्रह्मवृंदास गप्प बसविले हे मागे सांगितलेच आहे. त्यांची तळमळ फार, प्रयत्‍न जोराचे आणि सर्व गोष्टी हिंदुसमाजात राहूनच त्यांनी केल्या. ब्राह्मोप्रमाणे किंवा आपल्याकडील प्रार्थनासमाजातील लोकांप्रमाणे जनतेशी फटकून राहून सुधारणा करू पाहणारे ते नव्हते. सुधारणा करणाराने लोकांतच राहून, त्यांचे शिव्याशाप वगैरे गोष्टींस न भिता काम केले पाहिजे, हळूहळू पुढे सरकले पाहिजे, हे ईश्वरचंद्रांनी भारतास शिकविले. सुधारणा करणार्‍यास पुनःपुन्हा निराश व्हावे लागेल; परंतु स्वतःचे अश्रू आपण पुसून, लोकांचे अश्रू पुसावयास सतत प्रयत्‍न करीत राहिले पाहिजे हे विद्यासागर यांनी दाखविले.

प्रसिद्ध बंगाली पंडित, अर्थशास्त्रज्ञ व कादंबरीकार रमेशचंद्र यांनी ईश्वरचंद्रांची सुधारणा करणारे या नात्याने फारच स्तुती केली. कोण करणार नाही? सर्व विश्व माना तुकवील अशीच त्यांची अभिनव कामगिरी आहे.

विद्यासागर यांचे गृहजीवन व सार्वजनिक जीवन

विद्यासागर यांस आणखी सहा भाऊ होते. त्यांची नावे अनुक्रमे १. दीनबंधू, २. शंभुचंद्र, ३. हरचंद्र, ४. हरिश्चंद्र, ५. ईशानचंद्र, ६. भूतनाथ. एकंदर हे सात भाऊ. या भावांच्या नावांवरून घराण्यात शंकराची भक्ती असावी असे दिसते. आणि ईश्वरचंद्र जन्मण्याच्या पूर्वी त्यांचे जे सर्वत्र हिंडणारे वनवासी आजोबा होते, त्यांनी काशीस विश्वेश्वराची आराधना केली होती.

या भावांपैकी हरचंद्र, हरिश्चंद्र व भूतनाथ हे विद्यासागर हयात असतानाच वारले; बाकीचे त्यांच्यानंतर वारले. हरचंद्र हा फार हुशार होता व तो विद्यासागर यांस फार आवडायचा. तो ज्या वेळेस मेला, त्या वेळेस ईश्वरचंद्र वेड्यासारखे झाले. कित्येक दिवस ते खिन्न व उदास असत. भूतनाथ हा अगदी लहानपणीच वारला.

या भावांचा विद्याभ्यास ईश्वरचंद्रांनीच केला. दीनबंधू हे न्यायरत्‍न होऊन त्यांस जज्ज-पंडित ही जागा मिळाली. शंभुचंद्र हे विद्यारत्‍न होते. ते खेड्यात गावीत राहत असत. ईशानचंद्र हा आपला जरा सुस्त व ऐदी असा होता. त्यास विद्या वगैरे नसे. तोही खेड्यातच राहत असे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel