लवक्राफ्ट ह्यांचे जीवन तसे पाहायला गेल्यास जास्त विलक्षण नव्हते. लवक्राफ्ट ह्यांची आई अमेरिकेतील ऱ्होड आयलंड येथील होती. त्यांचे वडील साधारण सेल्समन असले तरी त्यांचे आजोबा म्हणजे आईचे वडील श्रीमंत होते. आजोबानी लहान हॉवर्ड ला वाचनाची गोडी लावली आणि आपल्या स्वतःच्या काही भयकथा वाचायला दिल्या. हॉवर्ड ला कदाचित गूढ आणि अगम्यतेची गोडी इथेच लागली असावी.
हॉवर्ड लहान असतानाच त्याचे वडील अतिशय आजारी पडले. खरेतर त्यांच्या वडिलांना एक गुप्तरोग झाला होता आणि त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले होते. ह्यामुळे शेवटी त्यांना वेड्याच्या इस्पितळांत ठेवले गेले आणि ५ वर्षांत त्यांच्या मृत्यू झाला. हॉवर्ड ला हे सर्व माहिती होते कि नाही हे कुणालाच ठाऊक नाही. हॉवर्ड च्या स्वतःचा लेखना प्रमाणे आपले वडील निद्रानाशामुळे कोमात गेले असाच हॉवर्ड चा समज शेवट पर्यंत होता.
हॉवर्ड ची आई हॉवर्ड प्रति थोडी जास्तच दक्ष होती. हॉवर्ड कुठे जातो काय करतो ह्यावर तीचे बारीक लक्ष असायचेच पण त्याच वेळी हॉवर्ड च्या रूप सौंदर्याबद्दल ती सतत टीका करायची. ह्यामुळे हॉवर्ड ला स्वतःच्या चेहेर्या बद्दल न्यूनगंड निर्माण झाला होता.
हॉवर्ड आपल्या रूम मध्ये बसून कथा कविता लिहायचा. शेजाऱ्यांचा मते हॉवर्ड आणि त्याची आई एकमेकांवर ओरडत असत पण त्याच्या आईच्या मते माता पुत्र रात्री शेक्सपिअर च्या नाटकांची तालीम करत असत. सत्य कुणालाच ठाऊक नाही. अनेक पत्रांतून मात्र असे स्पष्ट होते कि हॉवर्ड ची आई त्याला "अत्यंत कुरूप" म्हणून संबोधित करत असे आणि हॉवर्ड बाहेर गेल्यास लोक त्याला घाबरून मारतील असे ती म्हणत असे. हॉवर्ड प्रत्यक्षांत मात्र साधारण सौंदर्याचा मुलगा होता पण आईच्या स्वभावाने त्याला बिचार्याला काहीही मित्र वगैरे नव्हते.