मुहंमदांचा जन्म

मानवसमाजांतील धर्माच्या प्रगतीची अखंडता सतत दिसून येते.  मनुष्य प्रथम सृष्ट पदार्थांची पूजा करूं लागला. पुढें ईश्वराकडे वळला. ज्या पध्दतीनें ही उत्क्रान्ति झाली ती एकसारखी नाहीं होत गेली. मधूनमधून पुन्हां पिछेहाट होई. पुन्हां रस्ता बंद पडे. रान उगवें. पुन्हां ईश्वराचे नवे पाईक येत. संदेश-वाहक पैगंबर येत. ते परमेश्वरासंबंधींचीं कर्तव्यें पुन्हां सांगत. एकमेकांत कसें वागावें पुन्हां शिकवीत. त्या त्या काळांत अशा थोर विभूति होऊन गेल्या. प्रत्येक विभूति म्हणजे आध्यात्मिकतेची मूर्ति होती. तेजःकिरण फेंकणारी प्रकाशराशि होती. अधःपतित मानवसमाजाला वर नेण्यासाठी ते येत. पतिताला उध्दरायला येत. अशुध्दला शुध्द करण्यासाठी येत. अंधारांत दिवा दाखवायला येत. अशा महापुरुषांपैकींच मुहंमद पैगंबर हे होत.

मुहंमदांचें आगमन केवळ अरबस्थानापुरतें नव्हतें. ते सर्व जगासाठीं होतें. कारण त्या काळांत सर्वत्रच धार्मिक अवनति झाली होती. झरथुष्ट्र, मोझेस, ख्रिस्त यांनी पेटविलेल्या पवित्र ज्वाला विझून गेल्या होत्या. इराणांत श्रेष्ठकनिष्ठपणाची बंडें माजलीं होती. सध्दर्म लोपला होता. ख्रिश्चनधर्म आपसांतील मतभेदांनी कत्तली करीत होता. शांति देणारा धर्म रत्तस्नात होत होता! हिंदुस्थानाकडेहि निराशाच होती. बुध्दांनी दिलेला नीतिधर्म पुन्हां नष्ट झाला. पुन्हां हिंदुधर्मानें उचल केली. अनेक देवदेवतांचा धर्म रूढ झाला. नाना देवतांचीं पुराणें रचिलीं जाऊं लागलीं. निरनिराळया देवतांचे उपासक आपसांत झगडत होते. शाक्तमतें येत होतीं. उपनिषदांतील थोर धर्म मूठभर लोकांजवळ होता. इतरांचा धर्म म्हणजे कर्मकांड! शिवाशिवी, श्रेष्ठकनिष्ठपणा यांना सीमा राहिली नाही. निर्गुण, निराकर ब्रह्म शून्य झालें. कर्मकांड वाढलें. सतराशें देवदेवतांचा बुजबुजाट झाला. उच्चनीचपणाला ऊत आला.

आणि बुध्दधर्म हिंदुस्थानाबाहेर सर्वत्र होता. त्याचें शुध्द स्वरूप राहिलें नाही. बुध्दचें अनेक अवतार झाले. नाना बुध्द निर्माण झाले. त्या त्या देशांनी आपलें रंग बुध्दधर्माला दिले. कारण निर्वाणात्मक अभावरूप बुध्दधर्म कोणास पटणार ! बुध्दलाच त्यांनी देव केलें ! कोणी अमिताभ म्हणूं लागले, कोणी कांही.

स्त्रियांची सर्वत्र शोचनीय स्थिती होती. गरिबांना मान नव्हता. सर्वत्र दुःख होतें. अपमान होते. माणुसकीचा अभाव होता. खरा धर्म लोपला होता. अशा काळांत मुहंमद आले. त्यांचें येणें आकस्मिक नव्हतें. जगाच्या कोंडलेल्या बुध्दिशक्तींना, आत्मशक्तींना मुक्त करण्यासाठीं ते आले. मुहंमदांचे आगमन जगाच्या इतिहासाशी संबध्द होतें. सामाजिक, राजकीय, धार्मिक शिथिलतेचा तो काळ होता. अशा परिस्थितींतून नवश्रध्देचा जन्म होणें अपरिहार्य होतें. अशा चिखलांतून नवीन सहस्त्रदल सुंदर कमळ मुहंमदांच्या रूपानें फुललें. जगभर त्याचा गंध गेला. आर्तास त्यांतील अनंत मकरंद मिळाला.

कोठें जन्मला हा महापुरुष ? अरबस्थानांत जन्मणा-या पैगंबरास दोन अनुकूलता हव्यात. अरबी धर्माच्या पुण्यक्षेत्रीं, परंपरागत स्थानीं जन्मलेला तो असावा आणि अरब रक्ताच्या थोर कुळांत तो जन्मलेला असावा. मुहंमदांना या दोन्ही अनुकूलता मिळाल्या. ते मक्केंत जन्मले. काबाची पूजा करणारे श्रेष्ठ कुरेश त्यांच्या घराण्यांत जन्मले.

मक्का शहर अरबस्थानचें केन्द्र होतें. धर्माचे व व्यापाराचें. उत्तर दक्षिण दरींत तें वसलें होतें. पश्चिमेकडे उंच टेंकडया. पूर्वेकडे हि उंच दगड. मक्केच्या मध्यभागीं काबाचें पवित्र मंदिर, मंदिराजवळच सार्वजनिक दिवाणखाना. घरें तटबंदी केलेलीं. रस्ते नीटनेटके व फरसबंदी. असें हे भरभराटलेलें, समृध्द व बळवंत शहर होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel