संकटांचा मुकाबला

मुहंमद अशा रीतीनें शांति प्रस्थापित होते. लुटणा-यांचा बंदोबस्त करीत होते. प्रेमानें, कठोरपणानें सर्वांस जिंकित होते. मक्का सोडून त्यांना आतां सहा वर्षे झालीं होतीं. त्यांचे शब्द ऐकायला दूरदूरचे लोक येऊं लागले. त्यांचा सल्ला विचारायला येऊं लागले. रोजच्या जीवनांत कसें वागावें तें विचारण्यासाठीं येऊं लागले. मुहंमद नाना विषयांवर सांगत. त्यांतून इस्लामी धर्माच्या स्मृति तयार होऊं लागल्या. नीतिशास्त्र, कायदेशास्त्र तयार होऊं लागलें. मुहंमदांबरोबर जे मक्का सोडून आले होते, तीं आपलीं घरें, त्या टेकडया सारें सोडून आले होते, त्यांना पुन्हां एकदां ती जन्मभूमि पहावी, असें वाटूं लागलें. मुहंमदांसहि मक्केची फिरुन फिरुन आठवण येत होती. तें परंपरेचें पवित्र मंदिर काबा पाहण्याच्या इच्छेनें सारे उत्कंठित झाले होते. काबा सर्व अरबस्थानचें होतें. कुरेश केवळ तेथले पंडये होते. काबाच्या दर्शनास शत्रुहि आला तरी कुरेश कायद्यानें त्याला बंदी करुं शकत नव्हते.

आणि यात्रेचा महिना जवळ आला. मक्केस जाऊन पवित्र स्थानें पहाण्याचा आपला इरादा पैगंबरांनीं जाहीर केला. सातशे मुसलमान नि:शस्त्र असे निघाले. या सातशेंत अन्सार, मुहाजिरीन सारे होते. परंतु कुरेशांचा वैराग्नि विझला नव्हता. ते मक्केपासून कांही अंतरावर सशस्त्र आडवे आले. परंतु नंतर मागें हटत हटत मक्केंत जाणारे सारे रस्ते रोखून बसले ! मुहंमदांनीं त्यांच्याकडे एक प्रतिनिधि पाठवला. परंतु कुरेशांनीं त्याला नीट वागवलें नाहीं. मुहंमद व त्यांचे अनुयायी यांना काबा मंदिरांत आम्ही येऊं देणार नाहीं, अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. मक्कावाले मुहंमदांच्या तळाभोंवतीं घिरटया घालीत होते. एखादा एकटाच आढळला तर त्याला ठार मारतां यावें म्हणून टपून बसत. कांहींनीं पैगंबरांवरहि दगड फेंकले, बाण मारले. यांतील कांहीं पकडले गेले व मुहंमदांसमोर आणले गेले. पैगंबरांनीं त्यांना क्षमा केली. नंतर कुरेशांकडे पैगंबरांनीं उस्मानला पाठविलें. त्याला कुरेशांनी धरुन पकडून ठेवलें ! मुहंमदांस यादवी थांबवावयाची होती. त्यांनीं कुरेशांना कळविलें, तुमच्या अटी काय त्या कळवाव्या. कांहीं करार करूं. शेवटीं एक करार झाला. दहा वर्षेपर्यंत दोघांनीं आपसांत लढावयाचें नाहीं असें ठरलें. तसेंच कुरेशांपैकी बिगरपरवाना कोणी मुहंमदांकडे आला तर त्यांनीं त्याला पुन्हां कुरेशांच्या स्वाधीन करावें. परंतु मुसलमानांपैकीं कोणी मक्केंत मक्केवाल्यांकडे गेला तर त्याला मुहंमदांकडे परत पाठवायला कुरेश बांधलेले नाहींत. कोणत्याहि जातिजमातीस, मुहंमदांस वा कुरेशांस मिळण्याची मुभा असावी. या वेळेस मुसलमानांनीं परत जावें. पुढील वर्षी काबादर्शनास यावें. तीन दिवस मक्केंत रहावें. हत्यारांसह यावें. अशा अटी ठरल्या. कुरेशांकडचा एक दूत मुहंमदांकडे आला होता. पैगंबरांविषयीं सारे किती पूज्यभाव, भक्तिभाव दाखवतात तें पाहून तो चकित झाला ! तो परतल्यावर कुरेशांस म्हणाला, 'अनेक राजे-महाराजे यांचे दरबार मी पाहिले, परंतु कोणाहि राजामहाराजाला असा मान दिलेला मी पाहिला नाहीं. अशी आदरबुध्दि कोणाविषयी दाखविलेली मला दिसली नाहीं.'

करार झाला. कुरेशांनीं कराराप्रमाणें आपल्यांतील मुहंमदांकडे गेलेल्या कांही लोकांची ताबडतोब मागणी केली. मुहंमदांनीं त्यांना पाठविले. कांहीं लोक असंतुष्ट झाले. परंतु मुहंमद दूरवर पाहणारे. नम्रतेनें ते जिंकूं पहात होते. सरळता व उदारता दाखवून जिंकूं पहात होते. मुहंमद अनुयायांसह मदिनेस परत आले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel