फुला शांतपणे प्रार्थना करीत होता. त्याच्या तोंडावर मंगल प्रसन्नता होती. त्याच्या कोठडीसमोर कळी येऊन उभी होती; परंतु त्याचे लक्ष नव्हते. एकदम बाहेर जयघोष झाले. गर्जना झाल्या. फुलाने खिडकीतून पाहिले. तो हसला. त्याने दाराकडे पाहिले, तो कळी रडत होती.

‘रडू नका,’ तो म्हणाला.

‘माझ्या बाबांना क्षमा करा.’ ती म्हणाली.

‘माझ्या मनात कोणाविषयी राग नाही.’

‘आता तुम्हाला नेतील.’

‘घाबरू नका. वाईट वाटून घेऊ नका.’

‘किती तुम्ही थोर! पृथ्वीवरचे तुम्ही देव.’

इतक्यात ढब्बूसाहेब तेथे आले. सशस्त्र शिपाई आले. कोठडीचे दार उघडण्यात आले. दोर्‍या बांधून फुलाला त्यांनी नेले. कळी रडू लागली. ती आपल्या खोलीत गेली. ती देवाची प्रार्थना करीत होती. बाहेर लोक फाशीसाठी अधीर होते आणि गब्रु वधस्तंभाच्या जवळ गर्दीत उभा होता.

जिकडे तिकडे कडेकोट बंदोबस्त होता. लोक आता अधीर झाले होते. इतक्यात फाशी जाणारा जीव त्यांच्या दृष्टीस पडला. लोकांनी टाळया वाजविल्या.

‘फाशी जायचे आहे तरी हा दु:खी नाही.’

‘बेरड आहे हा बेरड.’

‘पक्का निगरगट्ट-’

असे लोक म्हणत होते. फुलाला वधस्तंभाजवळ उभे करण्यात आले. अधिकारी उभे होते. मांग दोरी हातात घेऊन तयार होता. शेवटची खूण होण्याचा अवकाश. वधस्तंभावर सूर्याचे किरण पडले होते. सर्वत्रच आता प्रकाश पडला. सकाळचा कोवळा सोनेरी प्रकाश!

परंतु हे काय? हा कसला गलबला? हटो, हटो, राजा आ गया. हटो; ठैरो, राजा आ गया. ठैरो.’ असे शब्द कानांवर आले. घोडेस्वार दौडत येत होते. त्यांनी आपले घोडे गर्दीत लोटले. टापांखाली कोणी तुडवले गेले. ‘हटो, ठैरो, राजा आ गया.’ सर्वत्र एकच घोष. एकाच आरोळी. ते घोडेस्वार वधस्तंभाजवळ गेले. ‘राजा येत आहे, थांबा.’ असा त्यांनी निरोप दिला. सर्व लोकांचे डोळे वधस्तंभाकडून आता राजाकडे वळले. कोठे आहे राजा, नवीन उदार राजा? तो पाहा आला. राजा आला.’ शुभ्र घोडयावर बसून वायुवेगाने राजा येत होता. ‘राजा चिरायू होवो! क्रांती चिरायू होवा!’ अशा गर्जना झाल्या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel