परमेश्वर आपल्या दिव्य सिंहासनावर बसला होता. देवदूत स्तुति-स्तोत्रे गात होते. इंद्र, चंद्र, सूर्य, वायू सारे हात जोडून उभे होते.
‘देवा, तुझा महिमा किती वर्णावा? हे अनंत विश्व तू निर्माण केलेस. इंद्राल पाऊस पाडायला लावलेस; सूर्याला तापावयास सांगितलेस. तुझ्या आज्ञेने वायू वाहातो, अग्नी जळतो, समुद्र उचंबळतो; तुझ्या आज्ञेने पर्वत उभे आहेत, नद्या धावत आहेत, फुले फुलत आहेत, वृक्ष डोलत आहेत, किती विविध ही सृष्टी; किती सुंदर, किती मोठी आणि सर्वात कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हटली म्हणजे मनुष्यप्राणी. देवा, परमेश्वरा, तुझे सारे बुध्दिवैभव मनुष्य निर्मिण्यात ओतले आहेस. एवढासा साडेतीन हात देहात राहणारा हा मनुष्य, परंतू सर्व विश्वाचे तो आकलन करू शकेल, सर्व सृष्टीवर सत्ता गाजवू शकेल. तो पृथ्वीवर राहून तार्‍यांचा इतिहास लिहील, पाताळातील घडामोडी वर्णील. मानवाला अशक्य असे काही नाही.’

परमेश्वराची अशी स्तुती चालली होती, इतक्यात तेथे सैतान आला. सारे कुजबुजू लागले. दुधात जणू मिठाचा खडा पडला. सुखात विष कालवले गेले. सर्वाच्या प्रसन्न चेहर्‍यावर वक्रता दिसू लागली. सैतान संतापाने व उपहासाने बोलू लागला, ‘पुरे करा ही स्तुतिस्तोत्रे. स्तुती करण्यासारखे काय आहे? परमेश्वराचे अनंत विश्व दूर राहो. आपण पृथ्वीपुरतेच पाहू या. काय आहे त्या पृथ्वीवर? त्या पृथ्वीवर सदैव मारणमरण सुरू आहे. ‘बळी तो कान पिळी’ हा प्रकार सुरू आहे. कोल्हा कोंबडीला खाईल, लांडगा कोल्हाला खाईल; वाघ, सिंह सर्वांना खातील. चिमणी किडे खाईल, ससाणा चिमणीला खाईल. तेथे भूकंप होतात व एकदम सारे गडप होते. ज्वालामुखीचे स्फोट होतात व आगीचा वर्षाव होऊन लाखो जीव त्यात मरतात. त्या पृथ्वीवर नाना रोग, नाना साथी, तेथे प्लेग आहे, कॉलरा आहे, मानमोडी आहे, विषमज्वर आहे, देवी आहेत, गोवर आहे, घटसर्प आहे, काळपुळी आहे. कोणी आंधळे आहेत, कोणी पांगळे आहेत, कोणी मुके आहेत, कोणी बहिरे आहेत आणि त्या मनुष्यप्राण्याची कशाला स्तुती करता? काय आहे त्या मानवात? मनुष्यप्राणी आज हजारो वर्षे झाली तरी आपसांत झगडत आहे. मनुष्य मनुष्याला छळीत आहे, पिळीत आहे, गिळीत आहे, एकमेकांना मारू पाहतात, एकमेकांना गुलाम करू इच्छितात. मारण्याची भयंकर साधने शोधीत असतात. कोणी घंटा वाजविण्याचा हट्ट धरतात. कोणी तीन वाजविण्याचा हट्ट धरतात. घंटेसाठी भांडणार्‍यांचे का कौतुक? कोणी तोंडाने शांतिमंत्र म्हणतात आणि खुशाल रक्तपात करतात. शांतिधर्माचे, प्रेमधर्माचे उपाध्यायच युध्दांना उत्ततेजन देतात. मारामारीत आशीर्वाद देतात. हा मनुष्यप्राणी वरून हसतो व मनात रडतो. गोड बोलतो, पोटात द्वेषाचे विष असते. मनुष्याजवळ सत्य नाही,  न्याय नाही. आपल्या मनाला जे वाटेल ते तो करतो आणि त्याचे समर्थन करण्यासाठी फक्त बुध्दी वापरतो. मनुष्यप्राणी म्हणजे मूर्तिमंत पाप. किती स्वार्थी, किती दांभिक; किती अहंकारी, किती धूर्त ; मनुष्यप्राणी म्हणजे दुनियेला शाप. तो सर्वाचा संहार करील. स्वत:च्या जातीचाही करील. तो पक्ष्यांना गंमतीसाठी मारील व मग त्यांच्यात पेंढा भरुन तो दिवाणखान्यात ठेवील. तो हरणे मारील व मग त्यांची शिंगे शोभेसाठी आणील. तो पक्ष्यांची पिसे ते जिवंत असता उपटील व त्या पिसांनी नटेल. हया मनुष्याकडे पाहू नये असे मला वाटते. मनुष्या म्हणजे वासनाविकारांचा गोळा.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel