वगैरे ती नकट्याच्या खेळातली गाणी कोण विसरेल? तू काटखेळ पाहिला आहेस का? इंग्रजी पलटणीत स्कॉटिश हायलंडर्स असतात. त्यांच्या पलटणीत ते पुढे बँडवाले असतात ना, त्यांचा तो चुण्याचुण्यांचा झग्याचा पोषाख असतो. काटखेळातील लोकांचा कमरेखाली तसा पोषाख असतो. वर छातीवर पांढरा दुपट्टा फुलीच्या आकाराचा बांधलेला आणि हातात गोंडे असलेल्या टिप-या. मग नाच होतो सुरू. तो ताल, ते नृत्य, ते वादन- सारे अपूर्व असते. सेवा दलातील मुलांनी ते खेळ शिकून यावे असे मला फार वाटते.

शिमग्यातच संकासुराचे सोंगही येते. साध्या पेंढ्याच्या झिळमिळ्या, किंवा बांबूच्या पातळ झिलप्या घेऊन त्यांचा बनवलेला टोप, त्याच्या दाढी-मिशा, असा तो संकासूर यावयाचा.

सुधामाई, पूर्वीचे खेळ जात चालले. नवीन करमणूक अजून आली नाही; म्हणून सारे निर्जीव वाटते. जुन्या कलांत नवीन अर्थ ओतून त्यांचे पुनरुज्जीवन करायला हवे. नवीन गाणी द्या, नवीन संकेत द्या, नवीन रंगरूप द्या. नवनिर्मितीचे हे काम अजून करायचे आहे. प्रचंड काम!

परवा वामनभटजींनी मला पोपया खायला बोलावले. पोपया मला फार आवडतो. मावशीलाही आवडतो. ज्ञानकोशकार केतकर होते ना ते पोपयाचे फार शोकी. कोकणात पोपये फार नाहीत. परंतु त्यांची नीट मशागत केली तर होतील. मावशीबरोबर पुष्कळ वर्षांपूर्वी मी द्वारकेत गेलो होतो. तेव्हा केवढाले पोपये स्टेशनवर पाहिले. एक पोपया आम्हांला संपवेना!

आम्ही लहानपणी कच्चे पोपयेही तिखट मीठ लावून खायचे. आजोबा रागे भरायचे. एकदा मी आजोळी गेलो होतो. आजोबा तिसरे प्रहरी बाहेर पडले. मावशी म्हणाली, ''पाड पोपया.'' मी पाडला. अक्काही होती. सोलून तिखटमीठ लावून खाऊ लागलो. तो आजोबा परत आले! त्यांनी त्या फोडी भिरकावून दिल्या. पोपया उष्ण असतो. फार खाल्ला तर खरूज होते म्हणतात. परंतु हिवतापात मुद्दाम खायला द्यावा. वाढलेली पांथरी कमी होते म्हणतात. तुमच्या तेथे पोपये खूप ना? मागच्या वर्षी तुमचे ते झाड पडले. किती पोपये त्यावर येत! त्यांच्या ओझ्यानेच झाड मोडले. होय ना?

विठोबारावांच्या घाणीवर काल गेलो होतो. आजूबाजूला सुंदर बाग आहे. खरोखर, फुलांसारखे मनाला रिझविणारे दुसरे काय आहे? पाश्चिमात्यांनी शेकडो प्रयोग करून फुलांची अनंत सृष्टी उभी केली आहे. शेकडो रंगांची फुले. आपण फक्त गुलबाक्षीच्या कंदात हळद, पिंजर भरून प्रयोग केले व शिटकावांची फुले निर्मिली. परंतु शेकडो फुलांवर असे प्रयोग करता येतील. प्राचीन काळी भारतात मोठमोठी उद्याने होती. मुसलमानी राजांना तर बागांची अनावर हौस. भारतीय जनतेला फुलाफळांचे वेड लागायला हवे आहे. तू मुंबईस गेलीस तर 'हँगिंग गार्डन' बघायला जा. तेथे मेंदी कापून पशूपक्ष्यांचे नाना आकार केलेले असतात. कोठे मेंदी कापून बैल केलेले, वानर केलेले! मी एकदा गेलो होत तर दोन बैलांच्या मानेवर जू आहे व नांगर चालला आहे, असे मेंदी कापून दाखविले होते. शेकडो प्रकारची, शेकडो रंगांची फुले पाहून मन प्रसन्न होते! प्रत्येक गावात फुलबाग हवी. ज्या गावात भरपूर फुले नाहीत, आनंदी मुले नाहीत, त्या गावाला कुठली शोभा?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel