चि. प्रिय सुधास,

सप्रेम आशीर्वाद.

तुमची सुट्टी संपली. परीक्षेची सुट्टी व शिमग्याची. आता मे महिन्यात सुट्टी. तोवर नाही. गुढीपाडव्याची व रामनवमीची मध्यंतरी मिळेल. नवीन जोमाने नि उत्साहाने तुम्ही अभ्यास करू लागाल. पुस्तकांना कव्हरे घालाल, वह्यांवर नावे घालाल, नव्याचे नऊ दिवस. त्या पुस्तकांची व वह्यांची पुढे तितकी काळजी कोण घेतो? मुलांची परीक्षा त्यांच्या पुस्तकांवरून, वह्यांवरून करावी. मुलगा गबाळ आहे की व्यवस्थित आहे हे त्यावरून दिसेल. पुस्तकांची नीट काळजी घ्यावी. परंतु स्वत:च्या पुस्तकांचीही आपण काळजी घेत नाही, मग दुस-याच्या कोण घेणार? ग्रंथालयातून पुस्तक घरी आणतात, परंतु सार्वजनिक कर्तव्याची जाणीव ठेवून ती पुस्तके कोणी नीट वापरीत नाही. तुला तो जुना श्लोक माहीत आहे का?

जलाद्रक्षेत् स्थलाद्रक्षेत्, रक्षेत् शिथिलबंधनात्।
मूर्खहस्ते न दातव्यम्, इत्थं वदति पुस्तकम्॥

पुस्तक सांगते : ''पाण्यापासून मला वाचवा, वाटेल तेथे ठेवू नका, मूर्खाच्या हातात देऊ नका;'' परंतु पुस्तकाची ही प्रार्थना कोण ऐकतो?

मराठीतले थोर कांदबरीकार हरिभाऊ आपटे तुला माहीतच आहेत. उष:काल, पण लक्षात कोण घेतो, वगैरे त्यांच्या कादंब-या वाचल्या नसल्यास तर वाच. हरिभाऊंना पुस्तकांचे फार वेड. पुस्तकांना कव्हेर घालीत ते बसायचे. जणू मुलांमुलींनाच सजवीत आहेत असे वाटायचे. लोकमान्य टिळकही पुस्तकांना फार जपायचे. मंडालेच्या तुरुंगातून लिहिलेल्या पत्रांत ग्रंथालयातील पुस्तकांची काळजी घ्या, म्हणून सांगायचे. एकदा त्यांना कोणती तरी पुस्तके हवी होती. घरी सापडत ना. त्यांनी रागाने लिहिले. सुधामाई, व्यवस्थितपणा हा फार मोठा गुण आहे. माझ्या आईचे वडील फार व्यवस्थित होते. ते म्हणायचे, एखादी वस्तू लागली तर तर ती अंधारातही नेमकी मिळायला हवी. लहानपणी मी कोयती नीट जागेवर ठेवली नाही म्हणून त्यांनी मला मार दिला होता. एकदा लेखणी करायला चाकू घेतला नि मी कुठे तरी ठेवला. ते रागे भरले. मी फार व्यवस्थित नसलो तरी बेताचा व्यवस्थित आहे. मुंबईस माझ्या मित्रांच्या खोलीत कधी गेलो तर आधी नीटनेटकेपणा मी थोडा आणतो; परंतु त्यांच्या न कळत करतो ते काम. नाही तर आपल्याला लाजवीत आहेत असे त्यांना वाटायचे.

आम्ही येरवड्याच्या तुरुंगात होतो. तेव्हा माझ्या एका मित्राच्या टेबलावर पसारा असे, तो मी नीट लावून ठेवायचा. त्या मित्राला ते आवडत नसे. तो एरव्ही नीटनेटका व्यवस्थित. परंतु टेबलावर अनेक वस्तू पसरलेल्या. तो मला म्हणायचा, ''या पसा-यात आमची व्यवस्था असते. वस्तू पसरलेल्या असल्या म्हणजे हवी ती पटकन सापडते!'' मी त्याला म्हणे, ''मुंबईला उद्या लहानशा खोलीत लग्न होऊन तुला संसार थाटायचा झाला तर का खोलीभर वस्तू पसरून ठेवशील? लहानशा खोलीत हुशार बायको सारं कसं व्यवस्थित ठेवते. तू का उद्या आपल्या बायकोला म्हणशील; सारी अडगळ खोलीभर मांडून ठेव म्हणून?'' तो मित्र हसे. तुला आपले चंद्रोदय माहीत आहेत ना? त्यांच्या खोलीत जाऊन मी त्यांची खोली नीट लावून ठेवायचा. ते मग म्हणायचे : ''तुम्ही येऊन गेला होता वाटतं खोलीत?'' ते गावी निघाले म्हणजे पुष्कळदा त्यांची वळकटी मी बांधून द्यायचा. ते म्हणायचे : ''तुम्ही महाराष्ट्रीय लोक फार व्यवस्थित.'' मी म्हणायचा, ''तुम्ही बंगाली लोक कवी! कवीला ना भान ना बंधन!'' ते हसायचे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel