परंतु मनुष्य कधी सुधारणार असा प्रश्न न करता, मी कधी सुधारणार? असा करायला हवा. आपापले जीवन तरी चांगले करणे हे बरेचसे आपल्या स्वाधीन आहे. आपल्याकडून तरी जगाच्या दु:खात भर न पडो, असे प्रत्येकाने मनात ठरवून वागावे, नाही का सुधा?

तुझा हल्ली वेळ कसा जातो? तुझे कुंचले नि रंग घेऊन चित्रे काढतेस का? सकाळी त्या सुरूच्या बनात बसून समोरचा देखावा कधी रंगवलास का? चित्र काढू लागलीस म्हणजे अरुणाही ब्रश घेऊन नाचू लागेल. तीही कागद घेईल व म्हणेल, ''हे फूल झालं, हो ना सुधा?'' अरुणा दुपारी झोपली की तू जा चित्र काढायला! एखादे सुंदर चित्र काढून मला पाठव. मागे तू एक पाठवले होतेस.

मावशी मुंबईला गेली आहे. तिचे पत्र आले होते. म्हणते, 'मुंबईच्या रस्त्यानं गुलमोहोर नावाची लाललाल फुलांची झाडं किती छान दिसतात. तशीच पिवळया फुलांची झाडं व मोतिया रंगाच्या फुलांचे वेलच्या वेल जणू अंगावर खेळवणारी झाडे! मौज. मावशीला नाही तरी फुलांचे फार वेड. कोकणात बकुळींना भर आहे. परंतु पांढरे चाफे आता उलगले. त्यांचा भर  ओसरला. हिरवीगार पाने आता त्यांना फुटली आहेत आणि या हिरव्या पानांच्यामध्ये मधूनच थोडी फुले दिसतात. जेव्हा भर असतो तेव्हा एक पान दिसत नाही. जणू फुले म्हणजेच पाने. सुधा, जर्मनीचा महाकवी गटे याने म्हटले आहे, ''फूल म्हणजे काय? फूल म्हणजे परिपूर्ण विकास झालेलं पान.'' सुंदर व्याख्या!

तुला मी पत्र लिहीत आहे आणि या बघ लाखो मुंग्या! भिंतीच्या कोप-यातून एकदम आल्या. कवठाच्या मुंग्या! प्रत्येकीच्या तोंडात पांढरे काय आहे ते? ती का त्यांची अंडी आहेत? पावसाळा आल्याची ही खूण मानतात. मुंग्यांचे काम या वेळेस फारच जोराने सुरू होते. पावसाळयात त्यांना बाहेर पडता येणार नाही. सारी तरतूद त्यांना करून ठेवावी लागते. किती मुंग्या! या चाव-या नाहीत. भुळभुळया मुंग्या आहेत. सर्वत्र काळेभोर झाले आहे. उठू दे मला. पुरे हे पत्र. धांदल झाली तुझ्या अण्णाची. अप्पा नि ताईस घाईघाईत सप्रेम प्रणाम. चि. प्रिय अरुणास घाईतला पापा. पळतो आता.

अण्णा

ता. क.

अग सुधा, मुंग्यांना घाबरलो परंतु पाच मिनिटांनी आलो तो एकही नाही. क्षणात आल्या, क्षणात गेल्या!
साधना २७ मे १९५०

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel