झाडालागी जेव्हा नवी पाने फुटतील
कळयांमधून जेव्हा नवी फुले फुलतील
माझ्यासाठी चंडोल गातील स्वागताचे गान
आणि गान ऐकून माझे हरपले देहभान
माझे घर माझे घर कोठे माझे घर?
आणि माझी जन्मभूमी नितान्त सुंदर॥

त्याने म्हटलेले ते भावपूर्ण गाणे ऐकून सर्वांची हृदये उचंबळली. असे गाणे कधी ऐकले नव्हते. त्याला ते गाणे म्हणून दाखविण्यासाठी पुन: पुन्हा आग्रह करण्यात आला. त्याने पुन: पुन्हा म्हटले. शेवटी सारे शांत बसले.

''तुम्हांला तुमच्या जन्मभूमीचे एवढे वेड आहे तर इकडे आलेत कशाला? आमचा हा प्रदेश रद्दी नि लोकही रद्दी. इकडे सारे लोक फसवे आहेत.'' एक जण म्हणाला.

''सारे फसवे?'' त्या पाहुण्याने विचारले.

''अहो, ते गृहस्थ अतिशयोक्ती करतात. सगळी माणसे कशी फसवी असतील? भलीबुरी माणसे सर्वत्रच आहेत. परंतु तुम्हांला तुमच्या जन्मभूमीचे गाणे म्हणताना तेवढे उचंबळून येते, तेवढे आम्हा लोकांना येत नाही. आम्ही जरा नीरस लोक आहोत.'' दुसरा म्हणाला.

''परंतु तुम्हीच तर मला पुन: पुन्हा म्हणायला सांगितलेत. तुम्हीही सहृदय आहांत. मी आज परदेशात आहे म्हणून जन्मभूमीची आठवण येत आहे. तुम्ही परप्रांतात गेलेत, तर तुम्हांला असेच वाटेल. मनुष्यस्वभाव सर्वत्र सारखाच आहे.''

गाणी-गप्पा संपून तो पाहुणा वर झोपण्यासाठी निघाला.

''थांबा, वर बिछाना तयार आहे का बघतो.'' मालक म्हणाला.

''अग, त्यांचे अंथरूण घालून ठेवले आहेस का? काम ना तू करणार होतीस? ऊठ, त्यांच्यासाठी गादी पसरून ठेव.'' मालक हेमाला वर येऊन म्हणाला.

हेमा उठली. तिने तेथे नीट अंथरूण तयार केले. ती आपल्या खोलीत परत येत होती. तो खालून ते संगीत वर येत होते. तो पाहुणा प्रेमगीताचे चरण गुणगुणत येत होता.



आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel