''ती तिच्या गावी आहे. परंतु तिचा तगादा सुरू आहे. आम्ही एकमेकांना शेकडो प्रेमपत्रे लिहिली आहेत. तिची निराशा होईल. ती एका कुलीन घराण्यातील आहे. तिचे आईबाप मागे एका साथीत मरण पावले. तिला पैशांची फारशी जरूर नाही. पोटापाण्याला तिला कमी नाही. ती माझ्या प्रेमाची भुकेली आहे. मी त्या काळी दु:खीकष्टी होतो. आजारी पडलो. तिने प्रेम दिले आणि आज तिची का निराशा करू?''

''भाऊ, ते सारे खरे. परंतु पहिली पत्नी-निरपराधी पत्नी- किती आशेने आली असेल? तिचा आधीचा हक्क नाही का? तुम्ही तुमच्या त्या नूतन प्रेयसीला सारी हकीगत काही लपंडाव न करता कळवा. तिला तुमचे कारण पटेल.''

''ठीक. तू म्हणतोस तसेच करतो. आणि पहिल्या पत्नीच्या बाबतीतही मी जी योजना केली आहे तसाच वागू ना?''

''तसे करायला हरकत नाही.''

आणि त्याप्रमाणे सारे ठरले. रंगरावांनी सुलभाला सारी हकीगत लिहिली. तिला त्यांनी पुढीलप्रमाणे लिहिले;

''प्रिय सुलभा,
माझी पूर्वीची पत्नी परत आली. आता तुझ्याशी लग्न कसे करू? तू क्षमा कर. पुढेमागे निराळी परिस्थिती उत्पन्न झाली नि तुझ्याशी लग्न करणे शक्य झाले तर करीन. तुझी निराशा होईल. मलाही वाईट वाटत आहे. मी तुला विसरणार नाही. प्रेमाची आठवण म्हणून हजार रुपये तुला पाठवीत आहे. प्रेमाची किंमत म्हणून नव्हे. माझ्या आपत्काळी तू जे प्रेम दिलेस, ओलावा दिलास, त्याची का पैशांत किंमत होईल? पैशांत किंमत करता तरी येईल का? पुन्हा प्रार्थना  करतो की तू रागावू नकोस. गैरसमज करून घेऊ नकोस. परिस्थितीच चमत्कारिक उत्पन्न झाली आहे; मी तरी काय करणार? तू माझी कीव कर.
तुझा
रंगराव.''

सुलभा आशेत होती. नवीन स्वप्ने ती मनात खेळवीत होती. रंगरावांनी पाठविलेली प्रेमपत्रे वाचीत ती बसली होती. तो ते पत्र आले. तिने पत्रावरचे अक्षर ओळखले. ती आनंदली. आशेला पूर आला. तिने ते पत्र फोडले. आणि तिने ते वाचले. ती हताश होऊन बसली. तिचे अंग थरथरत होते. बोटे थरथरत होती. तिचे डोळे भरून आले. ती तेथे कोचावर पडली; उठली; येरझारा घालीत होती. ''दुर्दैवी आहे मी, खरेच दुर्दैवी.' असे स्वत:शीच रडत रडत ती म्हणाली आणि हजार रुपये पाठवीत आहे. कशाला? पैसे काय चाटायचे आहेत? मला का काही कमी आहे? प्रेम का पैशांनी मिळते? परंतु त्याला माझ्याविषयी थोडा आपलेपणा आहे. तो मला विसरू इच्छित नाही. माझ्या प्रेमाची थोडी तरी त्याला किंमत आहे. परंतु आता काय? सारे संपले. असो. मी एकटीच राहीन. इतके दिवस एकटी होते, पुढेही राहीन. मला आता सवयच झाली आहे.'' असे ती बोलत होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel