एके दिवशी सायंकाळी हेमा बाहेर गेली होती. सुलभा एकटीच घरी होती. ती आज का नाही बरे फिरायला गेली? तिला का बरे वाटत नव्हते? का कोणी येणार होते भेटायला? सुलभा आज जरा सुंदर दिसत होती. तिने केस नीट विंचरले होते. गळयात सोन्याची साखळी होती. बोटात अंगठी होती. तिच्या कानात टपोर्‍या मोत्यांची कुडी होती. अस्मानी रंगाचे पातळ ती नेसली होती. कोणाची तरी वाट पाहत होती.

आणि कोणी तरी आले. मुकाटयाने कोणी तरी येऊन बसले. सुलभाने त्यांच्यासमोर फळे ठेवली.

''शेवटी तू माझा पिच्छा पुरवायला येथे आलीस.''

''रंगा, तू मला काय लिहिले होतेस? यदाकदाचित माया निवर्तली तर मी तुझ्याशी लग्न लावीन, असे तू नव्हतेस का लिहिलेस? माया मरावी म्हणून मी काही नवस नव्हते करीत. मी तिकडे एकटी राहात होते. तुझ्या प्रेमपत्रांचे अध्ययन करीत राहात होते. परंतु मायेचे निधन कळल्यावर मी विचार केला. मी तुला पत्रे पाठवली. तू का ते सारे प्रेम विसरलास?''

''परंतु रंगराव पूर्वीचा नाही.''

''मी ज्या वेळेस तुझ्यावर प्रेम करू लागले, त्या वेळेस तू का लक्षाधीश होतास? तुझ्या संपत्तीवर मी प्रेम नाही केले.''

''सुलभा, मला वाईट दिवस येत आहेत. माझा धंदा चालत नाही. एखादे वेळेस माझे दिवाळेही निघेल. नगरपालिकेचा अध्यक्ष धुळीत मिळेल. कशाला माझ्या पाठोपाठ येतेस?''

''इतकी वर्षे मनात ठेवलेली आशा आता तरी पूर्ण होऊ दे रंगा, तुझ्या दारात मी आले आहे.''

''घाई नको. हळूहळू सारे घेऊ.''

''किती तरी वर्षे झाली. आता आणखी किती धीर धरू? तुला हे सांगवते तरी कसे?''

''जगाचा नेम नाही. हे जग चंचल आहे. आज तुला जवळ करून उद्या तुला लाथाडण्याची मला अवदसा आठवली तर? जरा धीराने घे. आता एका गावांत आहोत. एकमेकांस भेटत जाऊ; बघत जाऊ; बोलत जाऊ. प्रेमाचा वेल बहरतो की वठतो ते बघू. या दुनियेचा भरवसा नाही. सुलभा, दो दिनकी दुनिया. संसार म्हणजे बुडबुडा, मृगजळ.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel