बुद्धांच्या मौनाचे आपण तीन अर्थ करु शकू : १) कार्यकारणात्मक दृश्य अशा पसा-याच्या पलीकडे काही आहे की नाही याचे ज्ञान च्यांना नव्हते. २) हे दृश्य जगत् म्हणजेच सारी सत्यता व  त्याच्यापलीकडे काही नाही हे त्यांना माहीत होते. ३) या विश्वात दृश्यच्या पलीकडे काही एक सत्यता आहे अशी त्यांची श्रद्धा होती; परंतु काही नैतिक कारणांमुळे व काही तार्किक कारणांस्तवही अनिर्वचनीय असणा-या अशा त्या वस्तूची व्याख्या देण्याचे ते टाळीत. या तीन शक्यता आपण कल्पू शकतो. कोणी म्हणतात, की ‘बुद्ध अज्ञेयवादी होते. वस्तूंतील सत्यता त्यांना ज्ञात झाली नाही, त्या सत्यतेचे ज्ञान त्यांना झाले नाही असे ते मानीत असावेत. ती सत्यता अज्ञेय आहे. बुद्धांचे मौन म्हणजे न दिलेल्या निर्णयाचे आविष्करण होय.’ काही असेही म्हणणारे आहेत, की ‘बुद्ध हे गूढवादी होते. आणि इतर सर्व गूढवाद्यामप्रमाणे अनिर्वचनीय अशा त्या स्थितीचे, त्या सत्याचे, वर्णन करायला ते धजत नसत. ती अनिर्वचनीय स्थिती अनुभवायची असते, चर्चावयाची नसते.’ अर्वाचीन विवरणकार वरील मतांपैकी आपापल्या वृत्तीप्रमाणे, कलाप्रमाणे, कोणते तरी एक मत स्वीकारतात.

जे कोणी असे समजतात, की बुद्ध हे संशयवादी किंवा अज्ञेयवादी होते, कारण त्यांना अंतिम सत्यता समजली नाही, समजती तर ते वर्णन करते, अशांना बुद्धांच्या शिकणीतील मर्म समजले असे म्हणता येणार नाही. बुद्धांनी शतदा सांगितले आहे, की ‘मी शिष्यांना दिले त्यापेक्षा कितीतरी मजजवळ आहे.’ बुद्धांच्या या उदगारांचा वरील समजुतींशी विरोध येईल. बुद्धांची वृत्ती पलंगपंडित संशयवाद्यांची नव्हती. पलंगपंडित संशयवादी त्या अंतिम सत्यतेसंबंधी अस्तिपक्षी वा नास्तिपक्षी उत्तर देता यावे म्हणून संशोधन करीत नाहीत, पराकाष्ठेची धडपड करीत नाहीत. बुद्ध असे नव्हते. तसेच त्यांना ती सत्यता खरोखरच नाही असे वाटते, तर तसे स्पष्टपणे सांगण्याचे नीतीधैर्य त्यांच्याजवळ नव्हते असे मानणेही न्याय्य नाही. बुद्धधर्मग्रंथांत आपणांस पुढील वृत्तांत एके ठिकाणी वाचायला सापडतो:

‘कौशांबीस शिंशपवनांत बुद्ध राहत होते. शिंशपवृक्षाची काही पाने हातात घेऊन बुद्ध शिष्यास म्हणाले, “माझ्या हातातील पाने वनात असणा-या पानांपेक्षा कमी की अधिक?”

शिष्य म्हणाले, “महाराज, आपल्या हातातील पाने थोडी आहेत. पलीकडे वनात पुष्कळ आहेत.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel