महापुरूषाचा जन्म
शिवनेरीला शिवराणा जन्मला. १६३० साली अक्षय्य तृतीयेला अक्षयकीर्ती छत्रपती जन्माला आले. माता जिजाईला दुःखात आनंद झाला. राजे शहाजी दूर रहात होते. पित्याच्या मांडीवर बाल शिवाजी खेळला नाही. शहाजी त्या वेळचा महान योद्धा. “उत्तरेकडे कोण तर शहाजहान, दक्षिणेकडे कोण तर शहाजी!” अशी म्हण पडली होती. दिल्लीपतीचा साल्हेर मुल्हेरजवळ शहाजीने धुव्वा उडविला होता. परंतु पुढे शहाजी विजापूरकडे आला. विजापूरचा राजा शहाजीस सामोरा गेला. शहाजीने दक्षिणेकडे-विजापूरकडे राज्य वाढविले. तिकडे जणू स्वतंत्र सम्राट असा तो वागू लागला. मोठा दरबार भरे. कवी गाणी गात.

असा शहाजी शोभत होता. परंतु नावाला का होईना, तो विजापूरचा अंकित होता अद्याप तो स्वतंत्र बंड करू शकत नव्हता. परंतु आपल्या मुलाने स्वतंत्र व्हावे असे त्याला वाटत असावे. पुण्याजवळची जी जहागीर त्याने बालशिवाजीला दिली, तिची व्यवस्था दादोजी कोंडदेव पाहात. त्या जहागीरासाठी शिवाजीच्या नावाचा जो शिक्का शहाजीने तयार करून दिला त्यात “प्रतिपच्चंद्ररेखेव” ही मुद्रा वाढत जाईल असे लिहिले होते. शिवाजीचे स्वतंत्र राज्य झाले तर खंडोबाला सोन्याची नाणी वाहीन असाही शहाजीचा नवस होता. आपण विजापूरच्या दरबाराला  जोडून राहायचे, शिवाजीला तिकडे वाढू द्यायचे; विजापूरकरांना फार शंका येणार नाही, असे शहाजीस वाटत असावे. आणि शिवाजीची शक्ती वाढली तर पुढे वरून शिवाजी व दक्षिणेकडून
आपण चाल करून मध्ये विजापूर पकडून गारद करावे असेही मनात असेल. दक्षिणेकडचे राज्य शिवाजीच्या राज्यास पुढे जोडू, व नर्मदेपासून कन्याकुमारीपर्यंत स्वतंत्र मराठा राज्य होईल असे विचार शहाजीच्या मनात नसतील असे नाही.

काही असो; विजापूरच्या भर दरबारात कुर्निसात न करणारा, विजापूरच्या रस्यात गो-माता मारणा-याला शासन करणारा हा बालवीर, शहाजीपासून दूर पुण्याजवळ माता जिजाबाईच्या प्रेमळ, पवित्र व तेजस्वी सानिध्यात वाढत होता. रामायण-महाभारतातील कथा ऐकत होता. समर्थांच्या हिंडणा-या प्रचारकांचे स्वर ऐकत होता. आसपासची परिस्थिती न्याहाळीत होता. तरूणांचे विचार ऐकत होता.

ध्येयवादी तरूणांचा गोतावळा
बालशिवाजीसमोर स्वातंत्र्याचे भव्य ध्येय उभे राहिले. हे ध्येय कसे कृतीत आणायचे? रामाला वानरांनी साहाय्य केले. मला कोण करील? गरीब मावळे करतील. हे तरूण शेतकरी करतील. मोठमोठे इनामदार, जहागीरदार, जमीनदार हे मदत करणार नाहीत हे शिवरायाने जाणले. ज्यांना खायला नाही, ज्यांच्या अंगावर वस्त्र नाही तेच उठतील. जिकडे पाहावे तिकडे गढीवाल्यांचे राज्य. हे गढीवाले विजापूरकरांचे मिंधे असत व इकडे गरीब जनतेला लुटीत. शेतक-यांची शेते, त्यांची फळझाडे, त्यांचे गवत-सारे आधी गढीवाल्यांसाठी. शिवरायाने विजापूरकरांविरूद्ध, गढीवाल्यांविरूद्ध, बंड उभारले. बंड कसे उभारायचे? पैसा कुठून आणायचा? सैन्य कसे निर्मायचे? शस्त्रात्रे कोठून आणायची? कसे लढायचे? कोठून लढायचे? सारे प्रश्न होते. बालशिवाजी व त्याचे सवंगडी याची चर्चा करीत. शिवरायाला गर्व नव्हता. गोकुळातील कृष्ण गोपाळबाळांत मिसळे, काला करी, खेळे, तसे हे शिवराय होते. डोंगर चढावे, दरीखोरी पाहावी; घोडदौड करावी; पट्टा, भाला, समशेर, सारे शिकावे. तरूणांबरोबर लुटुपुटीच्या लढाया कराव्या असे चाले. समान विचारांचे, समान ध्येयाचे तरूण जमू लागले, गोष्टी गाऊ लागल्या. तरूणांचे जथे ठायी ठायी वाढू लागले. कर्माची प्रतीक्षा करू लागले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel