आग्र्याहून सुटका
आणि ती दिल्लीहून सुटका! किती कठीण प्रसंग! केवढे धाडस! संभाजीस ताटात घेऊन जेवणारा ब्राह्मण! कशी उदात्तता, वीरता! दिल्लीहून शिवराय सुखरूप येतात. कोणी आणले? जनता- जनार्दनाने. या महापुरुषाला जनतेने जणू सांभाळले; आणि आईसमोर अंगाला राख फासलेले शिवराय उभे राहिले तेव्हा जिजामातेला काय बरे वाटले असेल! शिवराय सुखरूप आलेले पाहून कशी चैतन्यकळा संचरली असेल किती गूळ वाटला गेला असेल, किती उत्सव-समारंभ झाले असतील?

विजापूरकरांना दिल्लीपतीचा शह देऊन शहाजीराजांना सोडविल्यावर पुढे काही वर्षांनी जेव्हा शहाजीराजे भेटीला येत होते, तेव्हाचे शिवरायांचे ते विनयमधुर वर्तन! ते पायी सामोरे गेले. पित्याच्या चरणांवर त्यांनी मस्तक ठेवले. पित्याने प्रतापी पुत्राला हृदयाशी धरले. किती गोड उदात्त असा तो प्रसंग!

ज्याचा दर्या त्याचे वैभव
सैन्य वाढत होते. राज्य वाढत होते. घोडदळ तयार झाले. दर बारा कोसांवर सुसज्ज असे डोंगरी किल्ले खडे राहिले. किल्ल्यांत धान्य, शिबंदी, शस्त्रात्रे, सारे जय्यत असे. तसेच शिवरायाने समुद्राचेही महत्त्व ओळखले. आरमार तयार केले. समुद्रात किल्ले बांधले. मराठ्यांचे एक होडगेही पूर्वी फिरत नव्हते. परंतु असे खंबीर आरमार तयार केले की जे पुढे अरबी समुद्रात इंग्रजांसही भारी झाले! किती दूरवर दृष्टी. छत्रपतींचे एक वाक्य आहे “ज्याचा दर्या त्याचे वैभव.” सुरत, मुंबई येथील इंग्रज वखारी शिवरायांनी पाहिल्या. या जलचरांची शक्ती या दूरदृष्टी पुरूषाने ओळखली. व्यापार हवा, वैभव हवे, तर समुद्र ताब्यात हवा, हे सुत्र त्यांनी सांगितले. परंतु हे महान सुत्र पुढे पेशवे, मराठे, विसरले. इंग्रज बळावले. हिंदुस्थान परतंत्र झाला. शिवराय काळाच्या पुढे होते. त्यांची बुध्दी स्वतंत्र, अर्वाचीन होती.

राज्य बळकट राहावे म्हणून ते नक्त पगार देत. कोणाला जहागि-या दिल्या नाहीत. बक्षीस देत. पगार देत. जहागि-या दिल्या पुढे जहागिदार स्वतंत्र होऊ लागतात. त्यांचा स्वार्थ बळावतो. मध्यवर्ती सत्ता कोलमडते. म्हणून जहागि-या न देण्याचा दंडक त्यांनी घातला. हाही पुढे पाळला गेला नाही.

राज्यभिषेक झाला
अशा रीतीने शिवराय स्वातंत्र्य बांधीत होते; आणि एके दिवशी १६७४ साली तो महामंगल विधी झाला. शिवराय छत्रपती झाले! समर्थांनी आशीर्वाद दिला. माता जिजाईने आशीर्वाद दिला. दोघांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. सारे मराठी हृदय उचंबळले. महाराष्ट्राने दुवा दिला. राज्यभिषैक झाला.

अनंत सुधारणा केल्या
शिवरायांना आपली परंपरा जणू प्राचीन राजर्षींच्या परंपरेस जोडायची होती. अष्टप्रधानपूर्ण राज्यपद्धती त्यांनी सुरु केली. निरनिराळी खाती पाडली. त्यावर योग्य अधिकारी नेमले. ते पुन्हा वंशपरंपरा नेमले नाहीत. गुणांची किंमत राहिली. राज्याचा पसारा वाढत होता. स्वतंत्र मराठी सत्तेचा पर-दरबारी पत्रव्यवहार होऊ लागला. शेकडो परभाषेतील शब्द मराठीत घुसले होते. शिवरायांनी “राज्यव्यवहार कोश” करवून सर्व परकी शब्दांना संस्कृत प्रतिशब्द रूढ केले. आपले असेल ते ठेवावे. नवीनच कल्पना असेल तर घ्या एखादा परकी शब्द. परंतु घरचे बुडवून परके घेण्यात काय अर्थ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel