हाती सतीचे वाण
शिवरायांनी जनतेचे बळ जागृत केले. तिची सहानुभुती मिळविली. त्याचप्रमाणे ध्येयार्थ प्राणार्पण करण्याची वृत्तीही निर्मिली. संतांच्या उपदेशाने, समर्थांच्या प्रचाराने त्यागाची व पुरूषार्थाची ज्वलंत भावना पेटली होती. शिवरायांनी स्वत: संकटात पुढे होऊन मरणाची बेपर्वाई शिकविली. अफजुलखानासमोर स्वत: जाऊन ते उभे राहिले. शाहिस्ताखानावर स्वत: जाऊन हल्ला केला. ते स्वत: हातात सतीचे वाण घेऊन उभे होते, म्हणून त्यांना ध्येयार्थी माणसे निर्माण करता आली.

गनिमी लढाईचे नवे तंत्र शोधले

आणि द्रव्य, शस्त्रात्रे वगैरेंची ते जमवाजमव करू लागले. कधी  सरकारी खजिने लुटावे, कधी श्रीमंतांजवळचे द्रव्य आणावे. अशा रीतीने द्रव्याची आरंभीची जमवाजमव होऊ लागली. शस्त्रे गोळा होऊ लागली. परंतु सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे लढण्याची एक नवीन पध्दतच या प्रतिभाशाली पुरूषाने निर्माण केली. मोगलांच्या विजापूरकरांच्या प्रचंड फौजा. हत्ती, घोडे या फौजांशी समोरासमोर तोंड देणे कठीण. अकस्मात यावे, छापा घालावा, मारावे, लुटावे, निघून जावे, अशी ही गनिमी पध्दतीत जनतेचे सहकार्य लागते. ते तर शिवरायांस संपूर्णपणे असे. लोक शत्रूची बातमी देत. धान्य देत. आसरा देत. अशा रितीने शिवरायांचे बंड प्रचंड होऊ लागले.

किल्ला म्हणजे स्वातंत्र्याची किल्ली
ठिकठिकाणचे डोंगरी किल्ले हाती असणे म्हणजे सत्तेची किल्ली, ही गोष्ट शिवरायांनी ओळखली. ते एकामागून एक किल्ले घेत चालले. किल्ला म्हणजे स्वातंत्र्याची किल्ली. तोरणा किल्ल्यावर तोरण बांधून शिवराय महाराष्ट्रभर संचार करू लागले. तेजस्वी इतिहास निर्माण होऊ लागला. वीर, महावीर, मुत्सद्दी, पृथ्वी-मोलाची माणसे निर्माण झाली. ते आबाजी सोनदेव, ते अढळ मांडीचे महावीर नेताजी, हत्तीशीही झुंज घेणारे येसाजी, जखमी हाताला शेला गुंडाळून लढणारे व मुंडके तुटले तरी ज्यांच्या स्फूर्तिमय धडाने शेकडो सैनिक मारले असे ते वीरशिरोमणी मुरारजी, आणि पावन खिंडीत शिवराय सुखरूप पोचावे म्हणून धारातीर्थी पडणारे व तोफांचा आवाज ऐकुन ‘माझे कर्तव्य मी केले!’ असे म्हणून प्राण सोडणारे थोर बाजी, आणि शिवरायांच्या स्वातंत्र्य रामायणातील आपल्या रक्ताने ज्यांने सुंदरकांड लिहिले, लाडक्या रायबाचे लग्न दुर ठेवून आधी कोंडाण्याचे लग्न लावायला जो गेला, मध्यरात्री घोरपडीने जो चढला, लढता लढता ज्याचा हात तुटला, आणि शेवटी शिवरायाचे स्मरण करीत जो पडला... तो अतुलकीर्ती, अमरस्फूर्ती तानाजी, व ‘मी दोर केव्हाच कापून टाकला आहे, पळता कोठे?’ असा संदेश देणारा तानाजीचा भाऊ सूर्याजी आणि तानाजीच्या मृत्यूचा सूड घेणारे, उदयभानूला कंठस्नान घालणारे वृद्ध शेलारमामा, आणि जरा शिस्त मोडल्यामुळे शिवप्रभू ज्यांच्यावर रागावले म्हणून शत्रूवर पुन्हा तुटून पडून, कलंक पुसून टाकण्यासाठी धारातीर्थी पडलेले प्रतापराव गुजर किती नावे सांगावी? किती ज्ञात अज्ञात वीर, महावीर! किती बलिदाने, किती आत्मार्पणे!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel