रामराज्य
महाराष्ट्रात आदर्श रामराज्य सुरु झाले. रामराज्य? हो; रामराज्य. रामराज्य जनतेसाठी होते. रामचंद्रांचा आदर्श समर्थांनी सर्वांसमोर ठेवला होता. शिवछत्रपतींच्या राज्याची खूण कोणती? त्यांच्या ध्वजाचा रंग कोणता? भगवा रंग म्हणजे संन्यासाची खूण. भगवा झेंडा असे दाखवतो की, राजा हा संन्यासी आहे. तो प्रजेचा विश्वस्त आहे. खजिना प्रजेचा. प्रजेच्या कल्याणात खर्च व्हायचा. ज्या राज्याची खूण भगवा झेंडा ते रामराज्य. परंतु नुसती भगवी निशाणे काय कामाची! आज जो भगवा झेंडा वापरणारी संस्थाने आहेत ती प्रजापालनात किती दक्ष आहेत! प्रजेचे विश्वस्त म्हणून हे संस्थानिक वागतात का? भगवा झेंडा म्हणजे गरिबांचे कल्याण. भगव्या झेंड्याचा हा अर्थ आज तिरंगी झेंड्यात आहे. त्या शेतक-या-कामक-यांसाठी झगडा. तिरंगी झेंड्यावर चरखा आहे. चरखा म्हणजे दरिद्री नारायणाची निशाणी. तिरंगी झेंड्याने गरिबांना हृदयाशी धरले आहे. तो झेंडा अन्याय सहन करीत नाही, खोटे भेदभाव निर्मीत नाही, मुसलमानांस द्वेषीत नाही, भगव्या झेंड्याचाच विकसित अवतार अखिल भारतास शोभेसा अवतार म्हणजे तिरंगी झेंडा. शिवछत्रपतींच्या वेळेस ‘मराठा तितुका मेळवावा!’ असा संदेश होता. भगवा झेंडा महाराष्ट्रातील मुसलमानांसह सर्वांना एकत्र हाक मारित होता. तिरंगी झेंडा सर्व भारतीयांस हाक मारीत आहे.

न्यायाची प्रस्थापना
भगवा झेंडा राज्याची खूण करून शिवप्रभू जनतेच्या सेवेत रमले. भांडणे बंद पडली. समर्थ, संत यांच्या प्रचाराने ऐक्य झालेच होते. कोणतेही महाकार्य करायच्या आधी शक्य तो सर्वांचा मेळ घालावा.

“सर्वषामविरोधेन ब्रह्मकर्म समारंभे।।”

जे ब्रह्मकर्म आहे, मोठे कर्म आहे, ते सर्वांच्या अविरोधानेच प्राप्त  होते, सफळ होते. शिवरायांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी शक्य तो अविरोध  निर्माण केला. सर्वांना एकत्र आणले. सर्वांची सुख-दु:खे पाहिली. न्याय सर्वत्र स्थापिला.

हे सारे पाहून समर्थ नाचू लागले. ते म्हणाले;

“उदंड जाहले पाणी।
स्नानसंध्या करावया।।”

इतके दिवस स्नानसंध्या रूचत नव्हती जणू. लोभ व क्षुद्र कलह सोडून उभे राहिले पाहिजे. परकी सत्तेवर संपूर्ण बहिष्कार घालायला उभे राहिले पाहिजे. सरकारच्या तोंडाकडे पाहणे बंद झाले पाहिजे. आपला जन्मसिद्ध स्वातंत्र्याचा हक्क मिळवून घ्यायला सर्वांनी उभे राहिले पाहिजे. यात पुरूषार्थ आहे. याने उज्ज्वल भूतकाळाला शोभेसे आपण होऊ.

शिवछत्रपती भारताची अमृत-संजीवनी

महाराष्ट्रा! शिवछत्रपतीची खरी पूजा आपण घरोघर स्वातंत्र्यासाठी लढू तेव्हाच होईल. घरोघर शिवछत्रपतींची ती तेजोमय तसबीर ठेवा. तिला हार घाला. त्यांची उदात्त शिकवण अंगी आणा व स्वतंत्र व्हा.

शिवछत्रपती म्हणजे महाराष्ट्राची, भारताची अमृत-संजीवनी आहे. महाराष्ट्र उभा राहील. भारत स्वतंत्र होईल.

वंदे मातरम!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel