काँग्रेसच्या महान् भूमिकेला हें शोभत नाहीं. तिनें वाट दाखविली पाहिजे. आधीं स्वच्छ व नि:संदिग्ध घोषणा केली पाहिजे.” यांतील कांहीचें म्हणणें असे कीं, ज्या वेळेस हरिपुरा येथें युध्दांसंबंधी काँ. ची भूमिका स्पष्ट करणारा ठराव प्रसिध्द झाला, त्या वेळेसच महात्माजींनीं शत्रूच्या संकटाचा फायदा घेतां कामा नये, असा ठराव करुं नका, असें कां सांगितलें नाहीं ? त्या ठरावांचा अर्थ स्पष्ट होता. काँगेस ठराव करिते. परंतु प्रसंग आला म्हणजे श्र्लेष निघूं लागतात, दुसर्‍याच गोष्टी उभ्या केल्या जातात. अशानें त्या ठरावांचें महत्व कमी होतें; त्या संस्थेचें हंसें होतें.

या सर्व प्रश्नांना मी उत्तर देऊं शकत नाहीं. महात्माजी प्रत्यक्ष ठरावांवर वगैरे बोलत नाहींत. ते आपलीं मतें लादीत नाहींत. व. कमिटीला पटलें तर व. कमिटी त्यांचें म्हणणें ऐकते. शिवाय तो क्षण येईपर्यंत उगीच आधींपासून कां चर्चा करा असेंहि त्यांना वाटत असेल. युध्दाचें स्वरुप काय या बाबतींतहि मतभेद असूं शकतील. तेव्हां महात्माजींच्या संबंधी मी काय सांगणार ? त्या अनंत सिंधूंत मी शिरुं शकत नाहीं.

परन्तु काँग्रेसनें एकदम निर्णय कां घेतला नाहीं, याला थोडें उत्तर देतों, युरोपमधील युध्दाचा रागरंगहि पाहिला पाहिजे. पोलंडचा प्रश्न आटोपल्यावर हिटलर युध्द थांबवा असें सुचवील. कदाचित् कोणी राष्ट्रे मध्यस्थी करु पाहतील आणि अशा रीतीनें युध्द मिटलेंच तर ? जर युरोपांतील युध्द थांबलें तर आपल्या निर्वाणीच्या खलित्याचें केवळ हंसेंच व्हावयाचें तेव्हां काँग्रेसने दोनतीन आठवडे मध्यें ठेवले आहेत. तोंपर्यंत पोलंड पडल्यावरचाहि युध्दाचा रागरंग नीट कळेल. काँग्रेसच्या कार्यकर्त्यासहि जबाबदारपणें विचार करतां येईल. सर्व संघटना जागृत ठेवतां येईल. अशा हेतूनें काँग्रेसनें निर्णय घेतला नसावा.

काँग्रेसनें निर्णय घेतला नसला तरी तो घेतल्या सारखाच आहे. वर्किंग कमिटीचें पत्रक जो म्हणून वाचील त्याला त्यांतील अर्थ कळल्याशिवाय राहणार नाहीं. व. कमिटीनें तयार रहा असें सांगितलें आहे. याच्याहून दुसरा कोणता निर्णय घ्यावयाचा ? व. कमिटीचें पत्रक प्रसिध्द झाल्याबरोबर प्रत्येक काँग्रेससेवकाचा या पत्रकाच्या हजारों प्रती घेऊन गांवोगांव जाऊन त्यांतील अर्थ समजावून सांगणें व तयार रहा, स्वयंसेवकांचीं पथकें नोंदून ठेवा, काँग्रेसचें लष्कर तयार राहूं दे असें सांगत फिरणें हा आपला धर्म होता. परंतु आम्हां बावळटांना हा महान् धर्म दिसत नाहीं.

किसानांनो सावध रहा. तुमचे सर्व प्रश्न सुटावयास हवे असतील तर सत्ता हाती हावी. ती सत्ता हातीं यावी म्हणून जर शेवटीं काँग्रेसला लढा पुकारावा लागला तर सावध रहा. ३१ व ३२ सालीं आपणांस दंड होऊं लागतांच आपण घाबरलों. परंतु आतां दंडाला भिऊं नका, मरणाला भिऊं नका, जप्तीला भिऊं नका. बार्डोलींतील शेतकर्‍यांच्या जमिनी काँग्रेसनें परत देवविल्या, जप्त पेन्शनें परत सुरु केलीं; जप्त पाटिलक्या परत दिल्या. यांतील अर्थ लक्षांत घ्या. अत:पर गुजराथ व कर्नाटकांतीलच शेतकरी घरदार सोडून जातो असें दिसतां कामा नये. महाराष्ट्रांतील शेतकरीहि त्याच दर्जाच्या प्रमाणें दिसला पाहिजे. गांवोगांव तयार रहा. जे लढ्यांत अधिक सामील होतील, त्यांचें राज्य होत असतें ही गोष्ट विसरतां कामा नये.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel