शिवाजी
शिवाजीनें मुसलमानांच्या सर्वभौम सत्तेपासून महाराष्ट्राला स्वतंत्र केलें. आज हिंदुस्थानला ब्रि. सत्तेपासून स्वतंत्र करण्याची पाळी आलेली आहे. म्हणून तुम्ही शिवाजीसारखे वागा. असें आमच्यांतील कांही वृध्द मंडळी आम्हां तरुणांस सांगत आहेत. या कारणास्तवच शिवाजीच्या कार्याचा विचार आतां करावयाचा आहे. गतकालांतील सीझर, क्राम्वेल, नेपोलियन, बुध्द, शिवाजी इत्यादि महापुरुषांचें इतिहासांतील स्थान कोणतें ? व्यक्तीचें इतिहासांतील स्थान गौणत्वाचें असतें. ज्यांना आपण विभूति किंवा महात्मे म्हणतों ते केवळ इतिहासांतील विशिष्ट कार्य करणारीं उपकरणें आहेत. विभूतिमत्व आपण त्यांच्यावर लादत असतों. विभूतीची इतिहासाला गरज असते, नाही असें नाहीं. पण या विभूति म्हणजे प्राप्त परिस्थितींतील सामुदायिक प्रवृत्ति, शक्ति अगर आंदोलनें दर्शविणारीं निमित्तमात्र साधनें होत. इतिहासाचा क्रम सतत चालू ठेवण्यासाठीं. विशिष्ट काळीं, विशिष्ट परिस्थितींत व्यक्तीची निवड इतिहास करीत असतो. अमुकच व्यक्तीशिवाय इतिहासाचा ओघ अडून बसेल असें कधीहि होत नाहीं. इतिहास आपले लगाम महापुरुषांच्या हातांत देत नसतो;  तर महापुरुषांचा साधनें म्हणून उपयोग करीत असतो. ब्राम्हणशाही आणि यज्ञसंस्था यांविरुध्द बंड करणें अवश्य आणि अपरिहार्य होतें, त्या वेळीं गौतम बुध्द निर्माण झाला. सोळाव्या शतकांत दक्षिणेंत तत्कालीन सरदारांमध्यें शाश्वत युध्द चाललें होतें. ते अराजक बनले होते. त्यांच्या अराजकतेला आळा घालून सामाजिक विकासाकरितां मध्यवर्ती राज्यसंस्था स्थापन करणें ही त्या वेळची ऐतिहासिक गरज होती. अशा वेळीं इतिहासानें शिवाजीला निर्माण केलें. शिवाजीच्या त्याच्या वेळच्या मोरे, घाटगे, वगैरे त्याच्याच जातीच्या सरंजामदारीच्या मिरासदार सरदारांकडून साहाय्य मिळूं शकलें नाही तर उलट त्यांच्याशींच शिवाजीला प्रथम झगडावें लागलें ही गोष्ट लक्षांत घेतली म्हणजे वरील दृष्टिकोनाची व विधानाची सत्यता पटते. वरील सरदारांविरुध्द झगडणारे सैनिक कोणते होते !- तर पुण्याच्या आसपासच्या मावळ प्रांतातील लंगोटी नेसणारे मावळे लोक होते. याचा अर्थ असा की सरदारांच्या जुलमाखालीं पिळल्या गेलेल्या जनतेचा शिवाजी पुढारी होता. शिवाजीला गोब्राह्मण-प्रतिपालक असें कांही लोक म्हणतात. पण शिवाजीला त्याच्या वेळच्या ब्राह्मण वर्गाकडून विरोध झालेला आहे. राज्याभिषेकाच्या वेळी स्थानिक ब्राह्मण येईनात म्हणून शिवाजीला काशीहून गागा भट्टाला बोलवावें लागलें. तेव्हां शिवाजीला सहाय्य करणारी जनता ही सरंजामशाहीच्या जुलमाखाली भरडल्या जाणार्‍या लोकांची होती. याचें कारण काय ? तर शिवाजीनें त्या सामान्य जनतेच्या अंत:करणांतहि दडपलेल्या सुप्त आकांक्षांना तोंड फोडलें.

शिवाजीच्या वेळचा भगवा झेंडा आज आपणांस दिसतो. पण आजचा भगवा झेंडा गरीब सामान्य जनतेच्या आकांक्षाचें प्रतीक नव्हे. आजचा भगवा झेंडा प्रतिगामी लोकांचे स्फूर्तिस्थान आहे. शिवाजीनें आपला भगवा झेंडा त्या वेळच्या सत्ताधारी सत्तेविरुध्द झगडण्याकरितां उभा केला. त्या वेळचे सत्ताधारी मुसलमान राजे होते. त्या वेळच्या मुसलमान राजाविरुध्द शिवाजीनें बंड केलें. मुसलमान धर्माविरुध्द बंड उभारलें नाहीं. त्याचा झगडा अन्यायी राज्यतंत्राविरुध्द होता. शिवाजीला गोब्राह्मण प्रतिपालन करावयाचें असतें तर त्यानें गोशाला व अन्नसत्रें काढलीं असतीं आणि मुसलमान धर्म नाहींसा करावयाचा असता तर मुसलमानांच्या मशिदी उध्वस्त केल्या असत्या; त्यांची वतनें बुडविली असतीं. परंतु यांपैकी कांहींहि त्यानें केलें नाही. प्रचलित सत्तेविरुध्द सामान्य जनतेच्या मनांत सुप्तावस्थेंत असंतोष जागृत करुन त्यानें आपलें कार्य यशस्वी केलें. तेव्हां शिवाजीचें अनुकरण करावयाचें असलें तर आजच्या परिस्थतीचें अचूक परिशीलन करुन हिंदी राष्ट्रानें काँग्रेसच्या तर्फे चालविलेल्या स्वातंत्र्याच्या लढ्यांत भाग घेतला पाहिजे.
--वर्ष २, अंक ४.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel