भारत-सेवक समाज

या वर्षातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व्हंट ऑफ इंडिया सोसायटीच्या सभासदांचे प्रथम संमेलन- अधिवेशन पुणे येथे भरले. ही संस्था- हा भारतसेवक समाज १९०५ साली जून महिन्यात स्थापन करण्यात आला होता. यावर्षी एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत सर्व सभासद जमले आणि नियम, घटना वगैरे सर्व ठरविण्यात आले. सर्व्हंट ऑफ इंडिया सोसायटीचे ध्येय, पूर्वी काँग्रेस स्थापण्याच्या आधी बंगाली तरुणांस उद्देशून ह्यूम साहेबांनी जे पत्रक काढले होते. तदनुरूप बरेचसे होते असे फेरोजशहांचे चरित्रकार मोदी हे म्हणतात, 'It may be mentioned-that the lines suggested by Mr. Hume were more or less adopted by Mr. G. K. Gokhale nearly three decades later in his Servants of India Society.'

ब्रिटिश साम्राज्यान्तर्गत वसाहतींचा दर्जा प्राप्त करून घेणे हे त्यांतील सभासदांचे ध्येय आहे. या ध्येयाच्या सिध्दीसाठी वर्षेच्या वर्षे अविश्रांत परिश्रम झाले पाहिजेत, आणि देशाची संघटना केली पाहिजे. जे लोक या कार्यास येऊन मिळतील त्यांच्यावर संकटे कोसळतील, मोह आवरण घालू पाहील; परंतु संकटांस टाळून व मोहास न भाळून आपले पवित्र कर्तव्य सिध्दीस नेण्यासाठी प्रत्येक सभासदाने झटावयाचे. कुचराई करावयाची नाही.

या सर्व गोष्टींची जाणीव हिंदुस्तानातील लोकांस पटविली पाहिजे. ज्याप्रमाणे धर्मप्रसारार्थ सर्वसंगपरित्याग करून कामे करणारे लोक असतात, तद्वत जनसेवा ही जनार्दनसेवाच आहे अशा उत्कट भावनेने लोकांनी आता पुढे यावे. देशप्रेमापुढे इतर गोष्टी तुच्छ, कवडीमोल वाटल्या पाहिजेत. स्वार्थत्यागपूर्वक काम करा म्हणजे ते कार्य पवित्र आहे.

एवंप्रकारे उच्च ध्येय डोळ्यांसमोर ठेवून निधड्या छातीने व परमेश्वरावर दृढ श्रध्दा ठेवून प्रत्येक देशहितचिंतकाने कामास आरंभ करावा आणि आपल्या कामात रमण्यात सात्त्विक आनंद मानून सुखी व्हावे.

सनदशीर मार्गाने चळवळ करून देशाची सर्वांगीण उन्नती करणे व ती उन्नती करण्यासाठी देशातील तरुणांस तयार करणे हे संस्थेचे ध्येय आहे. एतदर्थ खालील गोष्टी सभासदाने कराव्या:-

(१) आपल्या स्वत:च्या उदाहरणाने लोकांत खरीखुरी देशभक्ती उत्पन्न करणे आणि तदर्थ त्यांस स्वार्थत्याग     करण्यास शिकविणे.

(२) लोकांस राजकीय शिक्षण देणे आणि समाजात चळवळ करून लोकमत तयार करणे.

(३) निरनिराळ्या जातीजातींतील विरोध काढून टाकून सलोखा व प्रेमभावना उत्पन्न करणे.

(४) मागासलेल्या जातीत शिक्षणाचा फैलाव करणे; औद्योगिक धंदेशिक्षणासंबंधी जास्त सुसंघटित प्रयत्न करणे.

(५) अस्पृश्यांची सर्वतोपरी सुधारणा करणे.

संस्थेचे हे पाच उद्देश आहेत.

संस्थेची मुख्य कचेरी पुणे येथे असावयाची. तेथे राहावयास वसतिगृह व अभ्यासासाठी उत्तम पुस्तकालय असेल.

(१) सोसायटीची एक 'फर्स्ट मेंबर' म्हणजे मुख्य अधिकारी असावयाचा व तो जन्मपावेतो असावयाचा.

(२) साधारण सभासद.

(३) विद्यार्थी.

समाजाचे हे तीन घटक होते. प्रत्येक विद्यार्थ्यांस पाच वर्षे शिक्षण देण्यात येईल.

संस्थेचे सर्व नियम वगैरे फर्स्ट मेंबर आणि तीन साधारण सभासद यांच्या अनुमतीने व सल्ल्याने होतील. बहुतेक सर्व सत्ता फर्स्ट मेंबरच्या हातात राहील. तीन मेंबरांचे एक कौन्सिल असेल. या कौन्सिलने शिफारस केल्याशिवाय कोणालाही सभासद करून घेता येणार नाही. प्रत्येक सभासदाने खालील शपथ घ्यावयाची असते:-

१. माझ्या डोळ्यांपुढे सदैव देशाच्याच कल्याणासाठी गोष्ट प्रथम राहील; मजमध्ये जे काही उत्कृष्ट आहे ते ते सर्व मी आपल्या देशाच्या सेवेस अर्पण करीन.

२. देशाची सेवा करिताना स्वार्थलोलुपता मी मनात येऊ देणार नाही.

३. सर्व हिंदी लोकांस मी भाऊ असे समजेन, आणि सर्वांच्या उन्नतीसाठी पंथ व जात बाजूस ठेवून मी प्रयत्न करीन.

४. माझ्या किंवा माझ्या कुटुंबासाठी सोसायटी जे काही देईल त्यातच मी आनंद मानीन. स्वत:साठी याहून अधिक पैसा मिळविण्याच्या भरीस मी पडणार नाही.

५. मी आपले खासगी आचरण पवित्र ठेवीन.

६. मी कोणाबरोबर खासगी, व्यक्तिगत भांडणे भांडणार नाही.

७. सोसायटीचे ध्येय सदोदित मी डोळयांसमोर ठेवीन. शक्य तितक्या कळकळीने व उत्कटतेने मी सोसायटीच्या अभिवृध्दयर्थ प्रयत्न करीन. सोसायटीच्या ध्येयाला प्रतिकूल असे मी काही करणार नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel