येवढे मात्र खरे की, टिळकांस काँग्रेसची गोगलगायी पध्दत पसंत नव्हती. चार दिवस जमून नुसते ठराव पास करून जावे आणि मग बॅरिस्ट-या, वकिल्या कराव्या याचा त्यांना तिटकारा येई. काँग्रेसच्या कामाचे लोण  सर्व लोकांत जर पसरविले असेल तर ते टिळकांसारख्यांनीच. त्यांनीच व्याख्यानांनी व लेखांनी देशात काय चालले आहे याची लोकांस जाणीव करून दिली. अशा मनुष्याला काँग्रेसभंजक कसे म्हणावयाचे? काँग्रेसला लोक येतात, आरती करितात आणि घरोघर जातात याविषयी काँग्रेसचे जनक ह्युमसाहेब काय म्हणतात ते पहा:- ''You meet in congress, you glow with a momentary enthusiasm. You speak much and eloquently. But the congress closes and every man of you goes off straight way on his private business. Years ago, I called on you to be up and doing; years ago, I warned you that Nations by themselves are made; and have you heeded these counsels? You have, indeed, ever eagerly clamoured for and vainly clutched at eh crown, but how many of you will touch the cross, even with your finger tips?'' ह्यूमसाहेबांच्या या सणसणीत बोलांस मेथांनी मुंबईस उत्तरे देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अशी वक्तृत्वपूर्ण व नटवेगिरीची उत्तरे देऊन थोडेच भागणार आहे? वस्तुस्थिती जगास दिसत होती. तेव्हा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष देशासाठी तनमन झिजवणारे लालाजींसारखे होण्याऐवजी सर्वस्वावर निखारा ठेवण्यास तयार असलेल्या आपल्या राष्ट्रीय बंधूंची, भर कौन्सिलात नालस्ती करणारा व्हावा हे पाहून टिळकांच्या पायाची आग मस्तकास का न जावी? राष्ट्रीय सभेचा अध्यक्ष जर राष्ट्रीय पक्षास निंदितो तर सरकारास या सर्व पक्षाच्या पुढा-यांस एका दावणीस बांधून अंदमानास पाठवून देण्यास काय हरकत?

अंबिकाचरण मुजुमदार आपल्या पुस्तकात पोक्तपणे लिहितात :- ''It is hardly-conceivable that a man of Bal Gangadhar Tilak's position and patrotism could have knowingly and willingly associated himself with any plan  of action calculated to wreck  the congress.'' आम्हांस हे म्हणणे विचाराचे वाटते.

पुढे लवकरच अलाहाबाद येथे एप्रिल महिन्याच्या १८-१९ तारखेस सभा भरून, नवी घटना, ध्येय वगैरे ठरविण्यात आले. मॉडर्न रिव्ह्यूने या प्रकारच्या सभेस एकपक्षीय म्हटले आहे व ते खरे आहे. कारण ही काही अखिल राष्ट्राची सभा नव्हती. सुब्रह्मण्यम् अय्यर यांचे या वेळेस मॉडर्न रिव्ह्यूत पुन: प्रसिध्द झालेले पत्र वाचण्यासारखे आहे. अशा रीतीने राष्ट्रीय पक्ष वगळला गेला. टिळक पुन: राष्ट्रीय पक्षाची जमवाजमव करते, पण त्यांस हे श्रम होऊ नयेत म्हणून सरकारने त्यांस सहा वर्षांची शिक्षा दिली! राजकारणाच्या दंगलीत रंगलेला महात्मा तत्त्वज्ञानाच्या गहन गाठी सोडविण्यासाठी मंडालेच्या तुरुंगात निघून गेला!! राष्ट्रीय पक्ष पोरका झाला!!!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel