ईश्वरावर श्रध्दा ठेवून ईश्वरास संतुष्ट करण्यासाठी. परलोकी परमेश्वर प्रसन्न व्हावा यासाठी कार्ये करणारे लोक थोर खरे; परंतु अशा लोकांस कार्य करण्यास उत्साह देणारा परमेश्वर हा आधार तरी असतो; परंतु ज्यांस ईश्वरी आधाराचेंहि सौख्य नाही, असे राजवाडयांसारखे लोक, पारलौकिक सुख वगैरे कांही न मानतांही, मरणानंतर कांही आहे असें न मानतांही केवळ निरपेक्ष दृष्टीनें कामें करतात, याचें कौतुक वाटतें व त्यांच्याबद्दल मनांत जास्तच आदर व पूज्यभाव वाटतो.

महाराष्ट्राच्या पूर्ववैभवासंबंधी ते आदराने बोलत. परंतु सध्यांच्या महाराष्ट्राच्या औदासिन्याबद्दल ते खिन्न होते. स्वार्थत्यागवृत्तीस महाराष्ट्रांत मान नाही, खरा स्वार्थत्याग, खरी कार्यवृत्ति, खरा कार्यकर्ता यांची किंमत महाराष्ट्रीयांस होत नाहीं असें त्यांस वाटे. काव्हूर या इटालीमधील मुत्सद्याच्या चरित्राच्या प्रस्तावनेंत ते लिहितात “स्वार्थत्यागाची किंमत समजणारी अक्कल समाजांत नसेल तर स्वार्थत्याग गाभटतो.” लो. टिळक यांच्या केसरी पत्रासंबंधी ते म्हणत “या पत्रासाठी बळवंतराव एवढी झीज सोसतात; त्यांतील अग्रलेखांनी व स्फुटांनी सबंध दक्षिण व व-हाड नागपूरचा भाग त्यांनी हालवून सोडला आहे, तरी या पत्राच्या प्रती लाखांनी कां खपूं नयेत ! महाराष्ट्र एक दरिद्री तरी असला पाहिजे, नाही तर कंजूष तरी असला पाहिजे. प्रत्येक गांवांतील मारुतीच्या देवळांतून केसरी मोठयानें वाचला जाऊन तो लोकांनी ऐकावा असें झालें पाहिजे. राजकीय विचारांचे लोण सर्वत्र नेऊन पोंचविलें पाहिजे' महाराष्ट्राच्या औदासिन्याबद्दल जरी ते असे उद्गार काढीत असले तरी कधी कधी जनतेवर असलेला आपला विश्वास ते प्रकट करीत. इतिहास साधनांच्या एका खंडांतील प्रस्तावनेंत ते लिहितात 'कार्य करविता स्वदेशांतील अभिमानी समाज आहे.” ख-या स्वार्थत्यागाची बूज जनता केल्याशिवाय राहणार नाही असें ते म्हणत. 'हे राज्य व्हावें असें श्रीच्या मनांत फार आहे.' या शब्दांनी श्रीशिवछत्रपतींनी आपली श्रध्दा बोलून दाखविली आहे. 'कार्यकर्त्या मनुष्यास महाराष्ट्र, सर्व भारतवर्ष उपाशी मरुं देणार नाही' असा विश्वास ते प्रगट करीत असत. त्यांचा राग जनतेवर नसून अर्ध्या हळकुंडानें पिवळे होणा-या अर्धवट सुशिक्षितांवर असे असें विचार केला म्हणजे वाटतें.

राजवाडे हे निर्व्यसनी होते हें सांगण्याची जरुरी नाही. ते विरक्त व संन्यस्त वृत्तीनें राहिले हें सर्वांस महशूर आहे. फक्त विडीचें व तंबाकूचें त्यांस व्यसन होतें. परंतु या व्यसनांचेहि राजवाडे गुलाम झाले नव्हतें. कित्येक दिवस ते विडीशिवाय खुशाल राहूं शकत व विडी ओढावयास न मिळाल्यामुळें कपाळ वगैरे दुखलें असेंहि त्यांस होत नसे. एकदां त्यांच्या एका स्नेह्यानें हजार पंधराशें विडयांचा एक गठ्ठा दिला, त्यावेळेस ते दररोज ४०। ५० विडया ओढीत. परंतु त्यांस विचारलें असतां ते म्हणाले 'सध्यां आहेत म्हणून मी ओढतों, मी विकत घेऊन कांही ओढीत नाही; परंतु ते कधी विकतही आणीत असत; तथापि व्यसनाचें ताब्यांत न जातां व्यसन त्यांनी आपल्या ताब्यांत ठेविलें होतें. लिहितांना कधी तोंडांत तंबाखू टाकून ते चघळावयाचें.

त्यांना स्वत:च्या राहत्या जागेच्या भोवती गुरेंढोरें आलेली खपत नसत. गुरांमुळें घाण होते व मग डांस वगैरे होतात असें त्यांचें मत असे.राजवाडे यांचा स्वभाव जरा भित्रा होता. ते फिरावयास गेले तरी काळोख पडण्यापूर्वी परत यावयाचे. ६ वाजल्यानंतर ते फिरावयास जात नसत. माघारे यावयाचे. त्यांना सापाबिपांची फार भीति वाटे. पावसाळयांत ते फिरावयास जात नसत. तसेच हिरवळीच्या जागेवरुन. कुंपणाजवळून वगैरे फिरण्यास त्यांस भीति वाटे. कारण अशा ठिकाणी सर्प वगैरे फार असतात. त्यांच्याबरोबर त्यांचा सोटा नेहमी असावयाचाच.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel