मी एकदां बडोद्याला गेलो होतों. तेथील कॉलेजमधील ' मराठी मंडळातर्फे ' माझें व्याख्यान होतें. मी तेथील मुलांस म्हटलें, '' तुम्ही सीमेवर आहात. येथें गुजराती व मराठी यांचा संगम आहे. येथील तुम्हां लोकांस गुजराती समजते. येथील मराठी बोलणा-यांचे हें काम आहे कीं त्यांनीं गुजरातच्या आत्म्याची, गुजरातच्या हृदयाची ओळख महाराष्ट्रास करुन द्यावी. हें काम तुम्ही न कराल तर कर्तव्यास विरलेत असें होईल. बेळगांवच्या बाजूस राहणा-या मराठी भाषेच्या भक्तांनी कर्नाटकचें हृदय मराठीला कळवावें. विश्वभारतीत वगैरे जाणा-या महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना बंगाली आत्मा आम्हांला द्यावा. अशा रीतीनें त्या त्या प्रांतीय भाषांनीं आपापल्या भाषेंतून अखिल भारताची ओळख आपल्या लेकरांस करुन द्यावी. आपण कलशाची पूजा करतांना म्हणतो, ' येथें गंगा, सिंधु, नर्मदा, तापी सर्व नद्या आहेत.'' माझ्या घरांतील त्या लहानशा तांब्यांत मी सर्व हिंदुस्थानच्या नद्या पाहतों त्याप्रमाणें माझ्या भाषेंत मला सर्व भारताचा आत्मा दिसला पाहिजे. परंतु तो आज कोण दाखवीत आहे? ''

मी १९३०-३१ मध्यें त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होतों. रोज रात्रीं प्रार्थना झाल्यावर आम्ही कांही लिहून वाचीत असूं. एके दिवशीं माझ्या एका नवीन मल्याळी मित्राला मीं म्हटलें, '' तूं कांही लिही. तं इंग्रजींत लिही. मी त्यांचें मराठींत भाषांतर करुन वाचीन.'' त्या मित्राचें नांव व्यंकटाचलम्. मोठा आनंदी तरुण. तो बी.एससी्. झालेला होता. तो चांगले गात असे. त्याला मल्याळी, तामिळ, तेलगु, तिन्ही भाषा येत. आणि हल्लीं त्यानें हिंदीचाहि अभ्यास केला आहे. तो हिंदी प्रचारक म्हणूनहि कांही दिवस काम करीत होता व त्याचें हिंदीतून मला पत्र आलें होतें. व्यंकटाचलमची् मला आठवण होते. त्या वेळेस वीस-एकवीस वर्षांचे फक्त त्यांचें वय होतें. त्यानें शेवटी इंग्रजीत एक लेख लिहिला. कोणत्या विषयावर लिहिला बरें? ' मलबारकडील एक दिवस ! ' हा विषय. पहांटे उठल्यापासून रात्रीं निजेपर्यत मल्याळी मराठी कुटुंबाचा दिवस कसा जातो त्यांचे हृदयगंभ वर्णन त्याने केलें होतें. मी अनुवाद करुन वाचला. '' पहांटे बायका उठतात, चूल सारवतात, तुळशींपुढें सारवतात. मग दुधें काढतात. कॉफी तयार होते. सुना भांडी घांसतात. स्नानें झाल्यावर तळयांवर धुणीं धुवावयास जातात. मुलांची शाळेंत जाण्याची घाई होते वगैरे तें वर्णन होतें. तो निबंध वाचल्यावर आमचे महाराष्ट्रीय म्हणाले, '' हें आपल्याकडच्या सारखेंच आहे !

''त्या एका निबंधानें महाराष्ट्र एकदम मलबारच्या जवळ गेला ! महाराष्ट्रांतील शारदा नाटकासारखेंच नाटक तेलगु भाषेंत आहे. या गोष्टी कळल्या म्हणजे सारें हिंदुस्थान एक आहे असें वाटतें.

प्रांतिक भाषांनी हें काम केलें पाहिजे. परंतु त्याबरोबरच सर्व राष्ट्राची अशी एक भाषा हवीं. म्हणून राष्ट्रभाषेवर काँग्रेस जोर देत आहे. काँग्रेसच्या बैठकांतील भाषणेंहि आतां बरीचशीं हिंदीतून होतात. काँग्रेसच्या दृष्टिनें राष्ट्रभाषेचा प्रचार करणारें सांगत असतात कीं, आपण जी हिंदी राष्ट्रभाषा करूं इच्छितों ती बहुजनसमाजाची असावी. आज हिंदी म्हणून जी समजली जाते तिच्यांतहि अनेक प्रकार आहेत, असावयाचेच. ती जी हिंदी तिला अधिक व्यापक करूं याअसें काँग्रेसचें म्हणणें. हिंदी भाषाभिमान्यांनीं यापुढें हिंदीला असें स्वरूप द्यावें कीं, तें सर्वांना समजेल. कांही हिंदी भाषाभिमान्यांस या गोष्टींचा राग येतो. ही हिंदीवर कुरघोडी आहे, हिंदीचा आत्मा नष्ट होईल, असें त्यांना वाटतें ! हिंदी अधिक लोकांना समजूं लागण्यानें हिंदीचा आत्मा कसा नष्ट होणार तें समजत नाही !! तें पूर्वींचें व आतांपर्यंतचे हिंदी वाङमय का फुकट जाणार आहे? तें जनता वाचीलच. परंतु यापुढचें वाङमय जरा निराळें पाहिजे. ज्ञानेश्वरांची भाषा निराळी आहे म्हणून का ती खेडयापाडयांतून वाचली जात नाही? हिंदींचे विशाल स्वरूप होऊन हिंदी जर हिंदुस्थानी झाली, बहुजन समाजाची झाली तर त्यांत काय नुकसान आहे? शिवाय ज्यांना हिंदीचें प्रौढ व संस्कृतप्रचुर स्वरूपच ठेवायचे असेत त्यांना कोण प्रतिबंध करणार आहे? प्रतिष्ठित बोलतात तीच भाषा प्रौढ असें मानलें जातें. अद्याप सर्वत्र हा प्रतिष्ठितेचा अहंकार कायम आहे. बहुजन समाजाकडे कोणाचेंच लक्ष नाहीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel