असे सेवक ही मोठी शक्ति आहे. परंतु सेवेला सर्ववेळ देणा-या अशा सेवकांना साथ द्यायला शेंकडो हजारों दुय्यम सेवक उभे राहिले पाहिजेत. सेवेचें वातावरण, सेवेचा ध्यास, ध्येयवादित्वाची हवा, राष्ट्रीयत्वाचा विचार सर्वत्र नुसता भरुन राहिला पहिजे. आणि हें कशानें होईल?

सेवादलासारख्या संस्थेच्या प्रसाराने हें कार्य होईल असें वाटतें. काँग्रेसच्या सेवादलाची प्रचंड संघटना उभी केली पाहिजे. सेवादल सर्वत्र सेवेची आवड उत्पन्न करील. खेळ खेळतां खेळतां, कवाईत करतां करतां राष्ट्रीयत्वाची अमर भावना सर्वांना शिकवील. आपण कांही तरी फावल्या वेळांत केलें पाहिजे, ही भावना सेवादल सर्वांच्या मनावर बिंबवील. सेवादल सेवकांचा पुरवठा करील, आणि मुख्य म्हणजे व्यापक व उदार अशी ख-या राष्ट्रीयत्वाची कल्पना नव-तरुणांच्या मनांत रुजवील, नवीन तरुणांच्या हृदयात शुध्द राष्ट्रीयतेची सर्वसंग्राहक, अशी विशाल दृष्टि नसेल तर उद्यां नवभारत कसा उभा राहाणार?

वसंता, म्हणून तुला मी काँग्रेसच्या सेवादलास वाहून घे, असें सांगत आहें, तू राहातोस तेथें नाही ना शाखा? कर सुरु. आरंभी अडचणी येतील. मुलें मिळणार नाहींत. परंतु अडचणींतूनच जावें लागतें. आपल्या श्रध्देची अशा वेळेसच कसोटी असते. श्रध्देचे चार लोक एकत्र आले तर ते शेवटी जगाला भारी होतात. विवेकानंद म्हणत असत, 'मला श्रध्देचीं एक हजार माणसें द्या. सिंहाच्या छातीची एक हजार माणसें द्या. सा-या हिंदुस्थानचामी कायापालट करुन दाखवितो. ' जगांत ज्यांनी ज्यांनी प्रचंड संघटना केल्या, त्या कांही एकदम नाही उभ्या राहिल्या. मोठीं कार्ये हळूहळूच वाढतात. दोनतीन मुली घेऊन कर्मवीर कर्वे यांनी स्त्रीशिक्षणास आरंभ केला. आज स्त्रियांचे विद्यापीठ उभें आहे ! श्रध्देचा मनुष्य उभा राहातो. ध्येयावर दृष्टि ठेवून पहिलें पाऊल टाकतो ! महाराष्ट्रांतील इतिहास-संशोधक मंडळ आहे ना? आज त्याचा व्याप खूप वाढला आहे. परंतु तें स्थापन करतांना एकटे राजवाडेच होते ! तेच अध्यक्ष, तेच चिटणीस, तेच सर्वं कांही, एके दिवशी विश्वनाथ काशिनाथ राजवाडे एका खोलींत बसले, आणि इतिहास संशोधक मंडळ त्यांनी सुरु केलें ! त्यांनी त्या दिवशी एक निबंध वाचला. त्यांनीं स्वत:च तो ऐकला. ऐकायला दुसरें कोंण होतें? तेथील भिंती होत्या, आणि ज्या पूर्वजांनी पराक्रमी व वैभवशाली इतिहास निर्माण केला ते स्वर्गस्थ पूर्वज कदाचित गुप्त रुपांने तेथें येऊन ऐकत असतील. वसंता, श्रध्देची माणसें अशा रींतीनें कर्मप्रवृत्त होत असतात. अरें, दह्याचा एकच थेंब, परंतु तो मणभर दुधाचें दहीं करतो ! परंतु तो थेंब आंबट हवा. त्याचप्रमाणें कडव्या वृत्तीचा, अढळ श्रध्देचा, एकच मनुष्य, परंतु तो सर्वांना वेड लावतो, ध्यास लावतो, ध्येयाकडे खेंचतो.

वसंता, तूं करशील का सेवादल सुरु? काँग्रेसच्या सेवादलांत हजारों लाखो तरुण मी कधीं बरें पाहीन? हाच एक ध्यास मला आहे. माझ्या काँग्रेसला कोणत्याहि बाबतींत कमीपणा नसावा.   'तुमंच्या काँग्रेसच्या सेवादलांत किती तरुण आहेत? 'असा जर कोणी प्रश्न विचारता तर 'लाखों' असें उत्तर देतां आलें पाहिजें. परंतु असें कधी होईल, खरेंच कधी बरें होईल?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel