आईचा मार

आई! आई! तू मज मार मार।।

मारुन मारुन मजला रडवी
चाबुक उडवुन रक्ता उडवी
लावी मन्नयनांस धार।। आई....।।

लाल तुझ्या परि दृष्टीखाली
प्रेमसुधेची गंगा भरली
दिसते गे अपरंपार।। आई....।।

मारुन मारुन तूची रडशिल
जवळी ओढुन मजला घेशिल
तुज दु:ख होईल फार।। आई....।।

माडीवरती मज बसवशिल
हनुवट धरुनी मज हसवशिल
घेशिल मुके वारंवार।। आई....।।

प्रेमे तुजला मी बिलगेन
तव अश्रूंचे मजला स्नान
हरपेल मम दु:खभार।। आई....।।

आई! तुझा मज रुचतो मार
त्याहुन नाहि दुजे मज प्यार
मारुन मारुन तार
मारुन करि उद्धार।। आई....।।

-धुळे तुरुंग, मे १९३२

दिव्य आनंद


दिव्य आनंद
मन्मना एक गोविंद।।

विषयवासना मम मावळली
सकल अहंता माझी गळली
वृत्ती प्रभोरूपोन्मुख वळली
न दुजा छंद।। मन्मना....।।

ख-या सुखाचा झरा मिळाला
भेदभाव तो सकल निमाला
आज तपस्या येइ फळाला
तुटले बंध।। मन्मना....।।

भावभक्तिची गंगा भरली
ज्ञानपंकजे सुंदर फुलली
अपार शांती हृदयी जमली
सुटला गंध।। मन्मना....।।

सम मम आता डोळे उभय
सम मम आता प्रेमळ हृदय
परम सुखाया झाला उदय
मी निष्पंद।। मन्मना....।।

शांत समीरण, शांत अंबर
शांत धरित्री, शांत मदंतर
रहावया येतसे निरंतर
गोड मुकुंद।। मन्मना....।।

अता जगाची सेवा करित
दीनदु:खितां हृदयी धरित
नेइन जीवन हे उर्वरित
मी स्वच्छंद।। मन्मना....।।

अशांत अस्थिर लोकां पाहुन
तळमळती हे माझे प्राण
त्यांना आता नेउन देइन
सच्चित्कंद।। मन्मना....।।

-त्रिचनापल्ली तुरुंग, ऑगस्ट १९३०

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel