तुझे पाय सागर माते अहर्निश क्षाळी
तुझ्या शिरी शुभ कर ठेवी शंभु चंद्रमौळी
तुझ्या रुपलावण्याला ना तुला जगात
तुझे चराचर हे अवघे स्तोत्र नित्य गात।।
तुझा थोर महिमा माते! मंगले! उदारे!
तुझी कीर्ती वर्णून धाले थोर थोर सारे
ऋषी वदे ‘दुर्लभ आहे जन्म भारतात’
देव तेहि जन्मुन येथे आई! धन्य होत।।
तुझे भाग्य न दिसे म्हणुनी विश्व खिन्न होई
तुझे भाग्य गेले म्हणुनी सृष्टी खिन्न होई
तुझी मुले परि का अजुनी उदासीन, आई!
त्वदुद्धारकार्यासाठी उठति का न भाई?।।
उठा सकळ बंधूंनो! या करुच मुक्त माय
रुपिभुजंगपाशांत तिचे ते पवित्र पाय
पक्षिराज गरुड बनू या मुक्त ही स्वमाता
झणी करु, न विलंबाची वेळ आज आता।।
विलंबास जरि का क्षणही बंधुंनो कराल
माय ही मरेल अहा हा! तुम्हिहि रे मराल
उठा, झोप सोडा, तळपा सूर्यसे प्रभावे
करा कार्य नेटे दास्या झुगारुन द्यावे।।
चला, उठा, मी तरि आता चाललो पुढारा
मातृलोचनींच्या मजला बघवती न धारा
तुझे अश्रु आई! माझ्या मी करी पुशीन
प्रतिज्ञेस करितो तुजला मुक्त मी करीन।।
आइ! धायिधायी रडतो त्वद्विपत् बघून
पुन:पुन्हा कार्याला मी लागतो उठून
बुद्धि हृदय गात्रे माझी चंदनासमान
झिजोत गे द्याया तुजला जगी श्रेष्ठ स्थान।।
दिगंतात वृद्धिंगत मी कीर्ति तव करीन
तुझी मूर्ति मधुरा दिव्या अंतरी धरीन
तुझे नाम सतत ओठी गान गोड कंठी
तुझी प्रीति अतुला अचला साठवीन पोटी।।
-त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०