सरला घन अंधार। आला प्रकाश अपरंपार।।
प्रभूची मुरली हळुच वाजली
क्षणात सारी सृष्टी बदलली
सुमने पायाखाली फुलली
हरला माझा भार।। आला....।।
गदारोळ तो सकळ निमाला
प्रकाश आला सत्पथ दिसला
करुणासागर तो गहिवरला
जाइन आता पार।। आला....।।
अभ्रे येती विलया जाती
फिरुन तारकातती चमकती
तैशी झाली मदंतरस्थिति
उदया ये सुविचार।। आला....।।
विवेकदंडा करी घेउन
वैराग्याची वहाण घालुन
धैर्ये पुढती पाऊल टाकिन
खाइन मी ना हार।। आला....।।
डसावया ना धजती सर्प
व्याघ्रवृकांचा हरला दर्प
भीति न उरली मजला अल्प
विलया जात विकार।। आला....।।
हलके झाले माझे हृदय
मोह पावले समूळ विलय
सदभावाचा झाला उदय
केला जयजयकार।। आला....।।
मदंतरंगी मंजुळवाणी
वाणी तुमची शुभ कल्याणी
प्रभु! येऊ दे ऐकू निशिदिनी
विनवित वारंवार।। आला....।।
-त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३१
हे सुंदरा अनंता!
हे सुंदरा अनंता! लावण्यकेलि-सदना।
कधि भेटशील मजला। कंदर्पकोटी-वदना!
सकलांहि या जिवांच्या। प्रेमार्थ तू भुकेला
चित्ते हरावयाला। सचितोसि रंगलीला
संध्या समीप येता। भरिशी नभांत रंग
तव हृत्स्थ प्रेमसिंधु। त्याचेच ते तरंग
सांजावता नभात। उधळीत रंग येशी
रमवीशि या जिवांना। कर लेशही न घेशी
रमवावयास जीवा। सुखवावयास राया!
निज दिव्य चित्रशाळा। करिशी खुली बघाया
हसवावयास जीवा। शिकवावयास राया!
निज भव्य चित्रशाळा। करिशी खुली बघाया
पिवळे निळे गुलाबी। नारिंगी गौर लाल
संमिश्रणे सुरम्य। करितात जीव लोल
काळे कभिन्न मेघ। करितोस ते सुवर्ण
त्वत्स्पर्श दिव्य होता। राहील काय दैन्य
घालूनिया किरीट। कान्हाच का उभा तो
ऐसा कधी कधी तो। आभास गोड होतो
रक्तोत्पले सुरम्य। फुलली अनंत गंमती
ते हंस कांचनाचे। गमतात तेथ रमती
करिती प्रसन्न चित्त। करिती गंभीर धीर
चित्रे विचित्र बघुनी। हृदयात भावपूर
शोभा नभात भव्य। शोभा नभात नव्य
बघुनी अपार भरती। हृदयात भाव दिव्य