एक दिवस देवीचे चरणतीर्थ प्राशन करत असताना वैजयंतीने अचानक कलिमलनाथा यांना विचारले,
“गुरुवर्य, साधनेचा उद्देश्य आणि तात्पर्य काय आहे?”
प्रश्न ऐकून कलिमलनाथ क्षणभर गोंधळून गेले. वैजयंती देवी असा प्रश्न करेल असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. ते गंभीरपणे म्हणाले,
“साधनेचा उद्देश्य, तात्पर्य किंवा प्रयोजन आहे साधकाला स्वयंप्रकाशी बनवणे..”
“ म्हणजे नक्की काय मला समजले नाही...” वैजयंती
“ अध्यात्मासंदर्भात आपल्या मनात सर्वात मोठा गैरसमज हा आहे की अध्यात्माने सत्कर्म आणि शुभता वाढते. आपल्याला चांगल्या मार्गावर नेण्यासाठी साधना हे एकमेव साधन आहे. ही भावना फसवी आहे. वास्तविकता अशी आहे की अध्यात्मिक साधना वाईट कमी करण्याशी किंवा चांगले किंवा शुभ वाढविण्याशी संबंधित नाही. साधना हा विषय चांगले वाईट आणि शुभ-अशुभ या दोन्हींच्या पलीकडे जाण्याशी संबंधित आहे.
साधनेला ना अंधार नाहीसा करायचा आहे ना प्रकाश वाढवायचा आहे. साधना साधकाला चांगलं-वाईट, शुभ-अशुभ आणि अंधार-प्रकाश अशा दोन्ही बाजूंचा साक्षीदार बनवत असते. आपल्या मनाच्या तीन अवस्था आहेत. पहिली म्हणजे मनाची वाईट स्थिती, दुसरी म्हणजे मनाची चांगली स्थिती आणि तिसरी म्हणजे दोन्हीच्या पलीकडे शांतीची स्थिती. ध्यानाचा एकच उद्देश आहे की जोपर्यंत साधक चांगले-वाईट आणि शुभ-अशुभ या दोन्हीपासून मुक्त होत नाही तोपर्यंत त्याच्यासाठी मोक्षाची कोणतीही शक्यता नाही.
जर तुम्ही चांगल्या गोष्टींना धरून राहाल तर तुम्ही चांगल्या गोष्टींशी बांधील व्हाल. जर तुम्ही वाईट सोडले तर तुम्हाला वाईटाच्या विरुद्ध बद्ध केले जाईल. पण जर तुम्ही दोन्ही स्वीकारले नाही तर तुम्ही परम साधक आहात. तुम्ही काय निवडता येथे तुमची खरी कसोटी लागते. तुमच्यावर कोणताही आरोप होणे योग्य नाही आणि तुम्ही सुख-दु:ख, शुभ-अशुभ, चांगलं वाईट यातील कशाशीही बाध्य ठरत नाही.
स्वभावाच्या या सहज अवस्थेला चांगले म्हणता येत नाही किंवा वाईटही म्हणता येत नाही. तो या दोन्हीच्या पलीकडे आहे. दोन्हीपेक्षा भिन्न आहे आणि दोघांचाही भूतकाळ आहे. पण सामान्यतः आपण साधनेने विचार करतो. चांगलं होण्याचा प्रयत्न हेच त्यामागचं कारण! या गैरसमजुतीमागे मोठा इतिहास आहे.
समाजाची आकांक्षा तुम्हाला सज्जन बनवण्याची आहे. कारण समाज दुष्कर्माने ग्रस्त आहे. समाज वाईटामुळे त्रासलेला आहे. म्हणूनच त्यांचे तुम्हाला चांगले बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समाज तुमचा विचार करू इच्छित नाही. समाज केवळ तुम्हाला वाईट बंधनातून मुक्त करून चांगल्या बंधनात बांधू इच्छितो. समाजालाही तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र व्हावे असे वाटत नाही. कारण महान आणि पूर्णपणे स्वतंत्र व्यक्ती समाजाचा शत्रूच बनेल. तुम्ही परावलंबी व्हावे अशी समाजाची इच्छा आहे, समाजाला तुम्ही जसे हवे तसे अवलंबून रहाणे अपेक्षित आहे.
समाजाला तुम्हाला चांगले बनवायचे आहे, जेणेकरून समाजाला तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची उच्छृंखलता, अनुशासनहीनता, उपद्रव, बंडखोरी, विद्रोह यांना सामोरे जावे लागू नये. समाज तुम्हाला धार्मिक बनवू इच्छित नाही. फार फार तर काय समाजाला तुम्हाला नैतिक बनवायचे असते. नीतिमत्ता आणि धर्म या दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत. एक नास्तिक मनुष्य देखील नैतिक असू शकतो आणि आपण ज्याला आस्तिक-आस्तिक म्हणतो त्या मनुष्यापेक्षा तो अधिक नैतिक असतो.आपण चांगले व्हावे यासाठी तुम्ही देव असण्याची गरज नाही.चांगले होण्यासाठी मोक्षाचीही गरज नाही.गरज असते फक्त सद्सदविवेकबुद्धीची. नास्तिकसुद्धा चांगला मनुष्य असू शकतो, नैतिक असू शकतो.
धर्म ही एक वेगळी बाब आहे. धर्माचे इतकेच प्रयोजन नाही की तुम्ही चोरी करू नका, खोटे बोलू नका, कोणतेही पाप करू नका. हे तर सगळ्यांनी करायलाच हवं. चोरी न केल्याने, खोटे न बोलल्याने आणि पापे न केल्याने मोक्ष प्राप्त होत नाही. खरं तर कोणालाच मोक्ष मिळत नाही. चोरी करून, खोटं बोलून पाप करणार्याला काहीच मिळत नाही, मग चोरी, खोटं बोलणं, पाप करणं यापासून परावृत्त होऊन त्याला असं वेगळं काय मिळणार?
धनसंचय करणार्याला अखेरीस काहीच मिळत नाही, मग धनत्याग केल्याने तरी काय मिळणार? जर पैसे गोळा करून काही विशेष साध्य झाले असेल तरच कदाचित पैसे देऊन टाकून काहीतरी विशेष साध्य होईल.
वासनेत मग्न होऊनही काहीच मिळत नाही, तेव्हा त्यांचा त्याग करून तरी काय मिळणार. जी गोष्ट फायदेशीर ठरू शकते ती हानिकारकही ठरू शकते आणि ज्यामुळे नुकसान होऊ शकते त्यापासून नफा देखील होऊ शकतो. परंतु ज्या वस्तूपासून काही फायदा होत नाही ती वस्तू हानी देखील करू शकत नाही. धार्मिक व्यक्ती संपत्ती जमा करणे हे मूर्खपणाचे मानतात, असे मानणे चूक नाही पण बालिश आहे. वासनेच्या सागरात बुडालेल्या माणसाला धर्म काही म्हणत नाही. त्याला केवळ अज्ञानी म्हणतात. तो काय करतोय हे त्याला कळत नाही ईतकच.
समाज ज्या गोष्टींना वाईट म्हणतो त्या सोडून दिल्यास मोक्ष मिळेल असे धर्म म्हणत नाही.या जगात सज्जनांची कमतरता नाही. ते आपल्यामध्येच आहेत, तरीही मोक्ष त्यांच्यापासून तितकाच दूर आहे जितका तो दुष्ट दुर्जानांपासून दूर आहे. त्याने काही फरक पडत नाही. मोक्षाचे अंतर तेव्हाच कमी होण्यास सुरुवात होते जेव्हा तुम्ही दुर्जन किंवा सज्जन काहीही नसता. ना संत, ना साधू ना धार्मिक असता ना अधार्मिक. कारण या दोघांमध्ये द्वंद्व आहे आणि जोपर्यंत द्वंद्व संपत जात नाही तोपर्यंत परमहंस स्थिती प्राप्त होत नाही. ही परमहंस स्थिती प्राप्त करणे हाच अध्यात्मिक साधनेचा एकमेव उद्देश आहे.
समजा जरी तुम्ही चोरी केली तरी तुमच्या व्यतिरिक्त कोणीतरी तिथे असायला हवे. तुम्ही एकट्याने कशी चोरी करू शकता? पृथ्वीवरील सर्व काही नष्ट झाले मग कोणाची आणि कशाची चोरी करणार? मग चोरी करण्याला अर्थ काय राहिला? जर तुम्ही एकटे असाल तर तुम्हाला चोरी करता येणार नाही. त्याचप्रमाणे खोटेही बोलता येत नाही. तुम्ही एकटे असाल तर दान देऊ शकता का? परोपकारासाठी इतरांचीही गरज असते. मग ती चोरी असो किंवा दान. मग ते नैतिक असो किंवा अनैतिक. मग ते पुण्य असो वा पाप. या सर्व बाह्य घटना आहेत.
पण समजा जरी संपूर्ण जगाचा नाश झाला आणि तुम्ही एकटे जिवंत राहिलात तरी तुम्ही ध्यानधारणा करू शकता. ध्यानाधारणेचा दुसऱ्या कोणाशीही आणि कशाशीही संबंध नाही. ध्यानासाठी इतर कोणाचीही आवश्यकता नाही. ध्यान ही एक आंतरिक घटना आहे. म्हणूनच ध्यान तुम्हाला मनाच्या आत घेऊन जाते.
पाप आणि पुण्य, चांगले आणि वाईट या दोन्ही गोष्टी तुमची दिशाभूल करतात. या सगळ्यांशी अंतर्मनाचा काही संबंध नाही. अंतर्मनाचा संबंध केवळ ध्यानाशी असतो. म्हणूनच साधना म्हणजे ध्यान. साधना म्हणजे अंतर्मुख होणे. साधना ही स्वतःशी निगडित आहे. साधना म्हणजे स्वत:चा शोध घेणे."
संन्यासी कलिमलनाथांच्या उपदेशाचा वैजयंतीवर काय परिणाम झाला हे सांगता येत नाही. पण त्या दिवसापासून ती पूर्वीपेक्षा जास्त गंभीर झाली आणि तिचा ध्यान धारणेचा कालावधी पूर्वीपेक्षा वाढला.
क्रमश: