अंबर गावी सुखदेव म्हणून एक गृहस्थ राहात होता. त्याच्या पत्नीचे नाव सावित्री. बरेच दिवस मूलबाळ होईना. सावित्रीने पुष्कळ व्रते-वैकल्ये केली, नवस-सायास केले. ती निराश झाली; परंतु आता मूल होणार नाही, असे वाटल्यावर तिला मुलगा झाला. नक्षत्रासारखा मुलगा होता. त्याचे नाव शिरीष ठेवण्यात आले.

सुखदेवाला फुलांचा फार नाद. घरात मूलबाळ नव्हते, तेव्हा तो बागेत फुले फुलवी. फुलांकडे पाही. फुलांचे मुके घेई. मला मुले असती तर त्यांचे असे मुके मी घेतले असते व त्या मुलांनी माझ्या गळ्याला मिठी मारली असती, असे तो म्हणे. त्याची पुष्पोपासना पाहून जणू परमेश्वराने त्याच्या संसारवृक्षाला शेवटी फुलवते. शिरीषचे सुंदर फूल लागले. शिरीष फूल किती सुकुमार असते ! बाळ शिरीषही तसाच सुकुमार होता.

शिरीष वाढला. गावशाळेत शिकायला जाऊ लागला. सुखदेवही त्याला घरी शिकवायचे. आई सावित्री पुराणातील कथा-गोष्टी सांगायची. शिरीषची स्मरणशक्ती अपूर्व होती. तो खरोखर एकपाठी होता. पंतोजी त्याचे कौतुक करीत. शेजारी त्याची स्तुती करीत. आईबापांना तर अपार आनंद होई.

शिरीषचे शाळेतील शिक्षण संपले. तो आता हळुहळू वृद्ध आईबापांस मदत करु लागला. त्यांचे लहानसे शेत होते. शिरीष तेथे खपे. शेत पिकवी. आईबापांची सेवा करी.

गावाचे तो भूषण होता. भांडण कोठे असले तर तो न्याय देई. कोठे संकट असेल तर तो धावून जाई. एकदा एका विहिरीत एक मूल पडले. शिरीषने एकदम उडी घेतली. त्याने ते  मूल वाचवले, उदार, प्रेमळ, शूर, बुद्धीमान असा हा आदर्श तरुण होता.

त्याचे आता लग्न झाले. ऐका पोरक्या मुलीबरोबर लग्न. त्या मुलीचे लग्न ठरत नव्हते. ती गरीब होती. चुलत्याकडे ती होती.

‘तुझे लग्न कसे होणार? कोण तुला करणार? मी गरिब, कोठे तुला देऊ?’ चुलता एके दिवशी तिला म्हणाला.

‘शिरीष लावील माझ्याबरोबर लग्न. त्याला गरिबांची काळजी. अनाथ मुलींचे नशीब तो फुलवील.’ ती म्हणाली.

‘वेडी आहेस तू. असा सुंदर नवरा मिळायला साता जन्मांची पुण्याई हवी.’

‘मी का पापी आहे?’

‘पापी नसतीस तर पोरकी कशाला होतीस?’

‘ईश्वरावर ज्याची श्रद्धा आहे तो कधी पोरका होत नाही. जगातले आईबाप गेले तरी तो मायबाप सदैव आहेच.’

‘करुणे, तुझे बोलणे थोरामोठ्यांना लाजवील.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel