करुणा प्रातःकाळी उठे. शीतलेच्या शीतल पाण्यात स्नान करी. नंतर सोमेश्वराचे दर्शन घेऊन ती आपल्या ओवरीत एकतारीवर भजन करीत बसे. घटकाभर दिवस वर आला, म्हणजे ती राजधानीत भिक्षा मागे. तिला एकटीला कितीशी भिक्षा लागणार ? तिची गोड भजने ऐकून लोक तल्लीन होत. मुले-मुली ओंजळी भरभरुन तिला भिक्षा घालीत. करुणा स्वतःपुरती भिक्षा ठेवून उरलेली बाकीच्या अनाथ-पंगूस देऊन टाकी.

राजधानीत ती हिंडे. रोज निरनिराळ्या रस्त्यांना जाई; परंतु राजाच्या राजवाड्याकडे, प्रधानाच्या प्रासादाकडे जाण्याचे तिला धैर्य होत नसे. कोठे तरी पती दृष्टीस पडावा म्हणून तिचे डोळे तहानेले होते.

ओवरीत शिरीषचे चित्र हृदयाशी धरुन ती बसे. पुन्हा ते चित्र ती ठेवून देई. खरोखरच शिरीष कधी भेटेल ? खरेच, कधी भेटेल ?

वसंत ऋतू आला. सृष्टी सजली. वृक्षांना पल्लव फुटले. कोकिळा कुहू करु लागली. करुणेला वाढदिवस आठवला. विवाहाचा वाढदिवस. किती तरी वर्षांत तो साजरा झाला नव्हता. यंदा होईल का ? माझ्या जीवनात वसंत केव्हा येईल ? माझ्या शुष्क संसाराला पल्लव केव्हा फुटतील ? माझ्या भावना पुन्हा मंजुळ गाणी केव्हा म्हणू लागतील ? जीवनाचे नंदनवन केव्हा बहरेल, आनंदाने गजबजेल ? यंदा येईल का वसंत ?

सोमेश्वराच्या मंदिरातील प्रख्यात यात्रा वसंत ऋतूतच असे. यात्रेचे दिवस जवळ आले. मंदिराला सुंदर रंग दिला गेला. शेकडो ठिकाणची दुकाने आली. यात्रा म्हणजे कलाकौशल्य, उद्योग, व्यापार, सर्वांचे प्रदर्शन. देशातील सा-या वस्तू तेथे यावयाच्या. मालाची देवघेव, विचारांची देवघेव. व्यापारी व किर्तनकार, प्रवचनकार, मल्ल, नाटकमंडळ्या, नकलाकार, पोवाडेवाले सर्वांची तेथे हजेरी असायची.

सोमेश्वराच्या आसपासचे प्रचंड मैदान गजबजून गेले. दुकानदारांना जागा आखून देण्यात आली. पाले लागली. ह्या बाजूस कापडाची दुकाने, इकडे किराणा माल, मजाच मजा. हलवायीची गर्दी विचारुच नका.

राजधानीतील लोक यात्रा पाहायला येऊ लागले. मुले, मुली येत. वृद्ध येत, श्रीमंत, गरीब  सारे येत. यात्रेचा मुख्य दिवस जवळ येत चालला. सोमेश्वराच्या आवारात त्या वत्सल, प्रेमळ मातापित्यांची समाधी होती. तिचे दर्शन घेण्यासाठी, कृतज्ञता प्रगट करण्यासाठी हजारो नारीनर शेकडो ठिकाणांहून येत होते. रथांतून येत होते, हत्तींवरुन येत होते, उंटावरून येत होते, कोणाचे मेणे, कोणाच्या पालख्या, सारी वाहने तेथे दिसत होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel