अशा अर्थाचे ते गाणे होते. करुण करुण गाणे. दाणे पाखडून झाले. ते तिने दळले. तिने त्या पिठाच्या पातळसर लापशी केली. सासूसास-यांस पाजली. त्यांनी प्रेमाने व कृतज्ञतेने तिच्याकडे पाहिले. किती तरी दिवसांनी इतक्या मायाममतेने त्या वृद्धांनी सुनेकडे पाहिले!

‘करुणे, धन्य आहे तुझी. तुझे हे गाणे ऐकून दगडालाही पाझर फुटेल. आम्ही तर माणसे आहोत. करुणे, तू कोंडा नाहीस. तू टपोरे मोती आहेस. मोलवान पृथ्वीमोलाचे मोती. आम्हाला तुझी पारख झाली नाही. कोंबड्यांना कोंडा कळतो. मोती काय कळणार? तुला आम्ही वाटेल ते बोललो. तुला छळले. तू सारे सहन केलेस. तुझ्या पवित्र पातिव्रत्यावरही शिंतोडे उडवले. अरेरे! झडो माझी जीभ. करुणे, तू किती कष्ट करतेस. सारे आमच्यासाठी. तू रानावनात जात असस. तुझ्या पायांना फोड येत. हातांना लाकडे तोडून घट्टे पडत आणि वाटेल ते बोलून तुझ्या हृदयासही आम्ही घरे पाडीत असू. तू स्वतः कोंडा खाऊन आम्हास चांगले देत होतीस. तरी मी तुला म्हणत असे की, तूच चांगले खातेस, आमची उपासमार करतेस. मुली! क्षमा कर आम्हाला. पुत्रवियोगाच्या दुःखामुळे तुला बोलत असू. आमचा बाळ गेला. आम्हाला विसरला. तूच आता आमचा मुलगा. तूच आधार. ये, अशी जवळ ये. तुझ्या डोक्यावरुन हात फिरवू दे. तुझे अश्रू पुसू दे. ये, ये हो जवळ.’

‘उगी. नको हो रडू बाळ. उगी उगी. तुझे सारे चांगले होईल. शिरीष तुला भेटेल. आमचे आशीर्वाद आहोत हो तुला. तू सुखी होशील. अमावास्येची पौर्णिमा होईल. दु्र्दैव जाऊन सुदैव फुलेल हो, बाळ.’ तुला हुंदके आवरत ना.

किती तरी दिवसांनी अशी प्रेमळ, अमृतमय वाणी करुणेच्या कानी आज पडत होती. धान्यपाण्याच्या दुष्काळ ह्या वर्षी होता; परंतु शिरीष गेल्यापासून करुणेच्या जीवनात प्रेमाचा, सहानुभूतीचा, सदैव दुष्काळच होता. तिला एक थेंबही मिळत नव्हता. ती किती तरी दिवस प्रेम व सहानुभूती ह्यांची भुकेली होती. आज तो दुष्काळ संपला. बाहेरचा दुष्काळ अद्याप होता. पाऊस अजून पडायचा होता. मेघ यायचे होते; परंतु करुणेच्या जीवनात आज प्रेमाचे दोन मेघ आले. सासूबाईंनी तिला प्रेम पाजले. तिने त्यांना पेज दिली, परंतु त्यांनी तिला माया दिली. इतक्या वर्षांचे श्रम सफल झाले. सासूसास-यांनी वाहवा केली. प्रेमाने पाठीवरुन हात फिरविला. दुःखी करुणा प्रसन्न झाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel