१८५८ हें वर्ष. १८५७ चे बंड नुकतेंच शमलें होतें. बंगाल्यामध्यें नीळ उत्पन्न करणर जे परकी जमीनदार होते त्यांचे व मजुरांचे युध्द जुपंले होतें. निळीची लागवड करणार लोक या मजुरावर जबरदस्त जुलूम करीत असत. त्यास आपल्या सत्तेनें चेंगरुन टाकीत असत. पन्नास लाख लोकांनी संप पुकारला आणि निळीची लागवड व करण्याच्या शपथा घेतल्या. या अशिक्षित मजुरांना आपण जाऊन मिळावें आणि त्यांच्या गा-हाण्यांची दाद लावतां आल्यास पहावी ही सदिच्छा तरुण शिशिरच्या मनांत उत्पन्न झाली. आपले लाखों बांधव जुलमाचा निषेध करण्याकरितां हातांत कंकण बांधून तयार असतां. त्यांच्यासाठी धावून जाणें हे माझें-सुशिक्षितांचे, सुखी माणसाचे आद्यकर्तव्य नाही. काय? तूं सुखांत लोळत असतांना, दारिद्रयात दडपलेल्या, जुलमाने जिकीरीस आलेल्या, त्यांची तुम्हांला कींव वाटतां कामा नये, तर त्यांचे दु:ख तें स्वत:चे दु:ख वाटले पाहिजे.
तरुणपणांत सद्वृत्ती उचंबळत असतात, मन उदार असते, स्वार्थ त्यागास उन्मुख असतें. संसारांतील गोष्टींनी तें निर्ढावलेले व कोडगे बनलेलें नसतें अद्याप मिसुरडही ओंठावर आली नसेल. ओंठावरचा जार वाळला नसेल, अशा १७-१८ वर्षाच्या वयाच्या वेळी शिशिर बाबू काय करीत होता? निळीच्या मजुरांच्या सहाय्यासाठी जाण्यास्तव आपल्या वडील भावाजवळ परवानगी मागत होता.
आपल्या भावावर काय संकटे येतील हें वसंत कुमार जाणून होते. परंतु सद्वृत्तीला भीति नसते. ती दडपू नये. सद्वृत्तींला संकटांतच
फोंफावण्यास व दृढ होण्यास सांपडतें. सद्वृत्तीच्या अंकुरांना बळकटी यावी असें असेल तर त्यांना या संकटांच्या फत्तरांतून वाढीस लावलें पाहिजे. या उदार विचारानें वसंत कुमारांनी आपल्या या छोटया भावाला-बलवीराला-आपल्या कर्तव्याकडे धांव घेण्यास परवानगी मोठया आनंदानें दिली. 'तुला तुझया सत्कार्यात यश येवो' असा आशिर्वाद दिला. स्थानिक सरकार मजुरांवर या शेंतक-यावर उठलें होतें. निळीचे जमीनदार व लागवडवाले यांचया झटापटी होत; कधी कधी तर रक्त पातही होई या मजुरांनी या मुलाचे स्वागत केलें. त्यांचा तो एक नायक झाला व त्यानें त्यांची अमोल कामगिरी बजावली.
वय लहान होंते परंतु या शिशिरची कृती वामनी होती. या वामनानें मजुरांविषयी विश्वाची सहानुभूति संपादन केली कालिदासाने
म्हटले आहे की, 'तेजसं हि न वय:समीक्षते' ते येथे यथार्थ लागू पडतें. हरिश्चंद्र मुकर्जी या वेळेस 'हिंदू पेट्रिअट' हे वर्तमानपत्र चालवीत असते. एम्. एल्. एल् या नांवाने या पत्रात या रयतेची सर्व करुण कहाणी शिशिर बाबूने पत्र पाने प्रसिध्द केली. शिशिरबाबूचे दुसरें नाव 'मन्मथलाल घोष' असें होतें. त्यांनी 'एम्. एल्. जी. ' असे लिहिले होतें परंतु चुकीने वर सांगितलेल्या नांवावरच सर्व पत्रें प्रसिध्द झाली. स्थानिक सरकारांत या पत्रांनी फारच गडबड उडवून दिली. ही कोण व्यक्ती असावी याविषयी चौकशी सुरु झाली. आपल्या मार्गातील हा कांटा कोठे आहे याचा शेवटी सुगावा लागला. जशोहरचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्टे्रट मोलोनी व त्यांचे सहकारी स्किनर या दुक्कलीनें संशोधन करुन या सर्व गोष्टीचा सूत्रचालक शिशिर आहे हें पक्कें समजून घेतले. नंतर त्यांनीं शिशिरला धमकी दिली की, जर या प्रकारें रयतेचीं मनें तुम्ही प्रक्षुब्ध कराल तर तुमच्यावर खटला भरण्यात येईल. परंतु शिशिर शेळपट नव्हता. ताज्या दमाचा, तरुण रक्ताचा, उदार व धीर विचारांनी भरलेला वीर होता. तो या फुसक्या धमकावण्यांत थोडीच भीक घालणार! त्यांने आपलें पत्रसत्र सुरु ठेविलें. हिकमतबाज सरकारनें दुसरीच एक युक्ति योजली. शहाजीला शिक्षा करण्यानें जसें शिवाजीस स्वस्थ बसवितां आलें. तद्वत् शिशिरच्या बापास धमकी द्यावी कीं, या अल्लड पोराला गप्प बसवा, नाहीं तर परिणाम चांगला होणार नाहीं. परंतु बाप कांही कच्च्या दिलाचा नव्हाता. ज्या वेळेस ही पिता-पुत्रांची अलौकिक जोडी सरकारास यत्किंचितही बघेना तेव्हा मॅजिस्ट्रेसाहेब रागानें लाल झाले. आणि या रागाच्या भरात एक प्रकारचा सूड म्हणून शिशिरच्या बापाल ५० रुपये कांही एका क्षुल्लक काराणासाठी दंड केला. निमित्तावर टेकलेल्या माणसास अल्पहि कारण पुरेसे होतें. म्युनसिपल कायदा पुढें करुन आपल्या घराशेजारी यांनी जंगल वाढविलें असा शिशिरबाबूंच्या वडिलांवर आरोप ठेवण्यात आंला होता. परंतु या गोष्टीनें हरिनारायणांचें हृदय खचून न जाता आपल्या पूत्राला त्यांनी धीर दिला. व पत्रमाला लिहिण्यास जास्तच स्फूर्ति दिली. या एकंदर रयतेच्या दंग्याचा विचार करण्यासाठी जें कमिशन नेमण्यात आलें त्या कमिशनच्या हकिगतींत मजुरांची स्थितीनिदर्शक म्हणून या पत्रांतून लांबलांब उतारे, टिपण्णीं घेतली आहे. या पत्रात लहानपणीही इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, एकंदर दूरवर विचार, अक्कल हीं स्पष्टपणे निदर्शनास येतात. हा कोणीतरी मोठा माणूस होणार याविषयी सर्वांची बालंबाल खात्री होऊन चुकली.