शिशिरनें विचारलें 'पण अवतार मानण्याची काय बरें जरुरी आहे'? वसंत म्हणाला''जगाला , या संसाराला आपण दु:खाचे माहेरघर समजतों ना ?या जगामध्ये अनाथाप्रमाणें, पोरक्या पोराप्रमाणे आहों असें आपणांस वाटतें ना? आपणांस मनाची खरीखुरी शांती कां बरें मिळत नाही? ईश्वर आपला मातापिता, बंधु, त्राता सर्व काही आहे हें आपण म्हणतों खरें परंतु तो आपलें बोलणें, आपली हांक ऐकतो का याची  आपणांस माहिती नसते. आपल्या मनाचे विचार ईश्वराला समजातात.  का? आमचें केविलवाणें तोंड त्याला दिसतें का? याची आपल्यास जिज्ञासा असते. अशा संशयपतित मनुष्यप्राण्याला 'ईश्वर तुमची मनें जाणतो, तुमचा धांवा ऐकतो' असें सांगणे म्हणजे सुखाचा मूलमंत्र सांगितल्यासारखे नाही काय? एवढेंच नव्हे तर या भूतलावरील आपल्या आईबापांपेक्षांही तो आपणांवर प्रेम करतो, वत्सलता दाखवितो, या ज्ञानाने, या विचाराने आपली  अंत:करणें हर्षाने नाचूं लागणार नाहींत काय? अवतार याचा अर्थ एवढाच की, आपली दीनदुबळी स्थिती पाहून स्वत:  'आपणांमध्ये येते, किंवा आपल्या जवळचे प्रिय दूत-भक्त 'ईश्वरानें तुमच हांका ऐकल्या आहेत ईश्वर आहे, सत्य आहे, प्रेममय आहे, ही कांही एक कल्पना नव्हें 'ही उपदेशामृताची वल्ली आपणांस देण्यासाठी परमेश्वर इकडे पाठवितो. या गोष्टीवर ज्याचा विश्वास असेल तो त्रिवार धन्य होय. दु:खाने दडपलेला असतांही तो माथा वर ठेऊं शकेल. कारण ईश्वर आपल्या पाठीशी आहे ही त्यास खात्री असते. ''

लहानपणचे हे विचार जरी शिशिरच्या कोमल मनावर उमटले असले तरी त्याची खोली, त्यांतील रहस्य त्याला पुष्कळ वर्षे समजलें नव्हतें.  त्याच्या मनांत धार्मिक भावना उचंबळत नसत असें नव्हें, परंतु हा  क्षणिक खेळ असे. दारुचा बाण आकाशांत आपण उडवतो, तो सूं सूं करीत जातो. क्षणभरच प्रकाश पाडतो, परंतु दुस-या क्षणी काळोख? हयाप्रमाणे शिशिरच्या हृदयाकाशांत हे ईश्वरी प्रेमाचे बाण, या हवाया उडत असत, परंतु अखंड प्रकाश देणारें येथें कांही नव्हते. वसंतकुमारांप्रमाणे तोहि प्रार्थना करी, व्याख्याने स्वत: देई व ऐके, प्रवचने ऐकत असे, परंतु या सर्वांमध्ये अद्याप कृत्रिमता होती. परंतु ती कृत्रिमता खालील विलक्षण गोष्टीनें नाहींशी झाली. ती गोष्ट अशी - वसंतकुमार एकांतात बसून एक सुंदर गाणें गात होते. ते तेथे एकटेच होते. हे गाणें त्यांनी स्वत: रचलेलें होतें. त्या गाण्यांतील अर्थ असा होता. 'हे प्रभो, तुझे प्रेम किती अनंत असलें पाहिजे. मी जागृतपणीं तेंच पाहतो.  मी झोपलों असतां स्वप्नातही तेंच पाहतों. आपल्याशीच भक्तिपूर्ण भावांने घोळून घोळून म्हटल्या जाणा-या या गाण्याचा शब्द शिशिरच्या कानावर आला. त्या आवाजांतील हृदयस्पर्शी कंपामूळे शिशिरचे पाय चटकन् त्या स्थानाकडे वळले. आणि तेथें गेल्यावर त्याच्या काय दृष्टीस  पडले? घळघळ अश्रू नयनांवाटे बाहेर पडले हाते, सर्व वस्त्र ओलें
होऊन गेलें होते! शिशिर तर थक्कच झाला, त्याची दृष्टि क्षणभर स्तिमित झाली. तो एकंदर देखावाच कांही हृदयस्पर्शी विलक्षण होता. गदद स्वराने शिशिरनें विचारलें, 'कुमार, आपण का बरें रडता?'सददित होऊन वसंत कुमार म्हणाले, 'तूं जरा मोठा झालास, म्हणजे या गोष्टी तुला समजूं लागतील.

शिशिरच्या डोक्यांत लख्ख प्रकाश पडला. ईश्वराच्या यशाची, त्याच्या प्रेमाची केवळ थोरवीच गाऊन होत नाहीं, त्या प्रेमाचा अनुभव घेतां आला पाहिजे. ईश्वराच्या अमर्याद प्रेमांचे दर्शन होऊन, आनंदाचा पूर लोटून तो नेत्रावाटे फुटला पाहिजे. आपल्या भावाची ही स्थिती आपणांस केव्हां प्राप्त होईल याविषयी त्याला आतां तळमळ लागून रहिली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel