अशा रीतीने एकमेकांस साहाय्य करुन हे बंधु आपआपली उन्नति करुन घेत होते. ते सर्व लोकांस प्रिय वाटत. कोणासही  साहाय्य करण्यास ते एका पायावर तयार असत. अनाथ, पंगु, हीन, दीन सर्वांची  दाद त्यांच्याकडे लागावयाची. कोणी मनुष्य स्त्री वा पुरुष दुखाणाईत असेल तर यांनी शुश्रुषेला धांवून यावें. महात्मा गांधीनीं एके ठिकाणी म्हटले आहे. ‘There is nothing higher than serving the sick कॉल-यांची  सांथ फैलावली की, हातांत औषधाच्या बाटल्या घेऊन यांची  धावपळ सुरु असावयाची. एकदा कॉल-यांने अजारी पडलेल्या माणसास शिशिरने खांद्यावरुन ६ कोस नेलें. त्याच्या आंगास विष्ठामूत्र यांचा संपर्क झाला. परंतु यानें घाण मानिली नाही. किती परोपकारता! कोणी अनाथ अस्पृश मरण पावला तर त्याची व्यवस्था व अंत्य संस्कार करावयास तयारच. अस्पृश मरण पावला-स्त्री वा पुरुष तर यांस कोणी हात लावावयाचा नाही. परंतु या बंधुनी गांवांतील कांही प्रगमनशील विचारांचे लोक जमवून एक संघ स्थापन केला. हा संघ सर्वांचे अंत्यसंस्कार करावयास तयार असे.

सेवाधर्मांत अशा प्रकाराचें हें सुखी कुटुंब निमग्न झालेंले होतें. जिकडे तिकडे आनंद होता परंतु दीनबंधू मित्रांनी वर्णिलेल्या या सुखी कुटुंबावर आतां आघात येऊ लागले. परंतु ते सहन करण्यास शिशिरच्या मनांत ईश्वराच्या प्रेमाचा भाव उत्पन्न झाला होता जें वसंतने सांगितलें होतें. तें कसोटीस लागण्याची वेळ आली. सर्व दु:खे सहन करण्यास खरोखरच ईश्वरानें त्यास सामर्थ्य दिलें.

प्रथम त्यांचे वडील निवर्तले. वडील निवर्तल्यामुंळे सर्व आधारच गेला. मोठया कुटुबांचा पोशिंदा गेला. वडील पैसे मिळवीत.  सर्वांचे  सुरळीत चाललें होतें. परतु एवढयानेच झालें नाहीं. दु:ख गिळून हे  बंधू आपआपल्या कर्तव्याकडे वळले, तोंच दुसरा कठोर प्रसंग आला.

वडील निवर्तल्यामुळें आतां फाटाफुट झाली. शिशिर अजून घरींच धाकटया भावांसह आईजवळ होता. हेमंत व मोतीलाल दुसरीकडे गेले.  धाकटा भाऊ हिरालाल खरोखर हिरा होता. हरीचा लाल होता.  त्रिभुवनमोलांचे तें माणिक होतें. सदु्रणोचे निधान व पुण्याचे केलिमंदिर म्हणजेच हिरालाल होता. परंतु अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांने आत्महत्या करुन घेतली. त्याच्या मनास कसली कांचणी लागली होती? तो  लिहून ठेवतो. '' जगांत दु:खाने दडपून गेलेल्या मनुष्यजातीसाठीं मला कांही करतां येत नाही. म्हणून हें जग सोडणें हेंच मला  जास्त श्रेयस्कर वाटतें-'' केवढा उदार हृदयाचा तरुण ! परहित साधतां येत नाहीं मग कशास जगा! जगांत जगावयाचें कशासाठी? तर जगाला सुख द्यावयासाठी. टॉलस्टायनें एक ठिकाणी खरें जगणें म्हणजे काय याचें विवेचन केलें आहे. तो म्हणतो'आपल्या सर्व गोष्टी वेळच्या वेळीं करणें, सात वाजतां उठणें, नंतर चहापान करणें, क्रीडामंदिरांत, किंवा वाचनालयांत जावें. मग दहा वाजतां चमचमीत जेवावें. कचेरीत जावें मधल्या सुटटीत वामकुक्षी करावी. कसें बसें काम करुन सायंकाळी फिरावयास, नाहीं तर नाटक , चलचित्रपट, गायनाचा जलसा यास जावें.  रात्री भोजन करुन चार शेजा-यापाजा-यांजवळ गप्पा मारणें, १० वाजता गादीवर पसरणे ते पसरणें ते सकाळी सात वाजतां नेमकें उठणें अशा प्रकारच्या जीवनक्रमाला सर्वसाधारण लोक सुखमय समजतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel