बंगालमध्यें चैतन्यांच्या वैष्णवधर्माचा प्रसार आहे. त्या धर्मांमध्ये कीर्तनभक्ति ही एक भगवंताजवळ जाण्याची पायरी आहे. जरी हे नांवांने ब्रम्हो होते, तरी ब्रम्होंना सुध्दां वैष्णवधर्मांतील कीर्तनाची पध्दत प्रिय होती. केशव चंद्रसेन कीर्तनांत कसा दंग होत असे हें प्रख्यातच आहे.
हीं कीर्तनें लोकप्रिय करण्यास कांही साधने लागतात. तीही सुदैवानें या महाकुलांत परमेश्वराने दिली होती. या भावंडांचा बाप वाद्याविशारद होता. या कलेंतील तो पारंगत होता. हा गुण मुलांमध्येही पुष्कळ अंशी उतरला होता. शिशिरकुमार लहान शिशु असतानांच त्याच्यामधील संगीताची देणगी दृग्गोचार होत असे. त्याचा पाठचा भाऊ मोतीलाल हा त्याचा या बाबतींत आवडता शिष्य. हे दोघे भाऊ कोणतेहीं लौकीक किंवा देवताविषयक गान गांऊ लागले की, वसंत व हेमंत हे संगीत सागरावर केवळ डोलत राहत. ते स्वत:ला विसरुन अनंताशी क्षणभर समरस होत असत. कधीं कधीं ते यात्राप्रसंग घडवून आणीत. या यात्रांतुन कृष्णलीला वगैरे नाटकासारखे भाग तिकडे करुन दाखवितात. त्यांचे शेजारीपाजारी लोकही यांच्या उत्साहाने भाग घेण्यास येत. आणि दिव्य संगीत व नृत्य यांच्या रमणीय संगमाने तो गांव म्हणजे श्यामसुंदराचें वृंदावनच आहे कीं काय असा भास होई.
अशा प्रकारें त्यांचे दिवस सुखानें चाललेले होते. आनंदाची सरिता संथपणे वाहात होती. राय दिनबंधू मित्र बहादूर हा या भावंडाचा दोस्त असे. हा निळीवर केलेल्या प्रख्यात नाटकाचा कर्ता तो यांच्या कुटुबांला 'सुखी कुटुंब' असे म्हणे. हें सहजमनोहर साधें राहणे, हा अकपट व सात्विक आनंद त्यास इतकें मोहून टाकी की, अशा प्रकाराचे चित्र आपल्या नाटकांत रंगवावे असें त्यास वाटलें आणि एका नाटकांत हे दिव्य स्वर्गीय प्रेम व हा मनोरम साधेपणा यांचे त्यांने चित्र रेखाटले आहे.
वर सांगितलेल्या त्या संस्थांतून कधी कधी शिशिर हाही व्याख्याने द्यावयास जात असे. शिशिरकुमार हे जरी अद्याप बाहयत: ब्रम्हो दिसले तरी त्यांच्या अंतरंगांत खरोखर वैष्णवधर्मच जागृत होता. ईश्वर स्वत: अवताररुपाने आपलें स्वरुप मनुष्यास व्यक्त करतो. आणि त्याचा अनुभव येणें म्हणजेच धर्म होय हें त्यांच्या मनांत पूर्णपणे बाणलें होतें. ते अगदी लहान असतानांच वसंतकुमारांनी अवतारतत्व त्यांच्या मनावर ठसविलें होतें. ते एकदा शिशिरला म्हणाले 'ज्याची परमेश्वराच्या अवतारावर श्रध्दा असेल तो खरोखर भाग्यवान् होय. मला जर सुदैवेंकरुन ही श्रध्दा लाभली तर मी नडियाचा गौरांग प्रभु जो आहे, त्याच्या पदकमलाचा आश्रय करुन राहीन. 'हा गौरांग कोण बरे' असें शिशिरबाबूंनी विचारले. वसंत-कुमार म्हणाले 'काय, तूं गौरांगासंबंधी ऐकले? अरे जसा ख्रिस्ती लोकांचा येशू, तसा आमचा हा नाडीयाचा चैतन्य गौरांगप्रभु होय. या दोन महात्म्यांमध्ये फारच साम्य आहे. 'शिशिर म्हणाला. 'येशुनें तर कित्येक चमत्कार केले, तसे गौरांगानेंही केले होते. काय? वसंत म्हणाला 'होय केले होते. आणि याबरोबरच हेंही लक्षात ठेव कीं, मनुष्यानें चमत्कार, आश्चर्य अद्भुत करुन दाखविल्याशिवाय जनतेची त्याच्यावर श्रध्दा बसत नाहीं, आणि जर येशू आणि निमाई यांच्या चरित्राकडे पाहिलें तर मला इतकी साम्यता दिसून येते की, मी थक्क होतों आणि मनांत पक्का विचार बाणतों की, मध्यंतरी १४०० वर्षाचा काळ दोघांच्या जन्मांत जाऊनही जर एवढें सामय दिसतें. तर दोघेही परमेश्वराचे अवतारच असले पाहिजेत.