'फासही बरा. तो क्षणभर गुदमरवतो व मारतो तरी. जीव सुटतो; परंतु तुम्ही गळयात हात घातलेत की गुदमरवता; परंतु मारीत नाही. पुन्हा ते हात दूरही करता येत नाहीत. सुकुमार, परंतु जड, खरं ना? बरं, ऊठ आता.'

त्याने हात धरून तिला उठविले. दोघे निघून गेली. झाडांची पाने सळसळ वाजत होती. काही फांद्या वाकून त्या जोडप्यांच्या कानगोष्टी ऐकत होत्या. त्या जंगलातील रस्त्यांवरील विद्युद्दीप चमकू लागले. किती सुंदर दिसत होते दृश्य! हिरव्या हिरव्या झाडीत ते विजेचे दिवे; परंतु फिरायला जाणारे परतू लागले. एखादे वेळेस वाघाच्या डोळयांचीही  बिजली दिसायची.

आमची तिन्ही जोडपी त्या हॉटेलात आली. भोजने झाली. तांबूलभक्षण झाले. गाणे झाले. गप्पा झाल्या. विनोद झाले. सारी झोपण्यासाठी आपापल्या जागी निघून गेली.

रात्र गेली. उजाडले आता;परंतु आमच्या त्या तीन युवती अद्याप उठल्या नव्हत्या. बाहेरही जरा थंडच होते. गुलाबी झोपेत त्या होत्या; परंतु गुलाबाचे काटे अजून कळायचे होते. बर्‍याच वेळाने आपापल्या खोल्यांत त्या तिघी  जाग्या झाल्या, परंतु त्या तिघींचे प्रियकर नव्हते. ते कोठे गेले व केव्हा गेले? येथे निजले तर होते. केव्हा उठून गेले?

त्या तिघी सर्वत्र हिंडल्या, परंतु प्रियकरांचा पत्ता नाही. त्या आपापल्या खोल्यांत जाऊन बसल्या. बराच वेळ झाला तरीही कोणी आले नाही. शेवटी त्या तिघी एके ठिकाणी बसून नवीन विचार करू लागल्या.

पहिली : हे असे कसे गेले? गोडगोड बोलून यांनी गळा असा कसा कापला? माझ्या मनात संशय येई तो खरा झाला.
दुसरी : येथे आणून आपणास सोडून गेले असे दिसते.

तिसरी : तरीच मला म्हणाले, उद्याचे कोणी सांगावे? जाईल दिवस तो आपला.
पहिली : मग आता काय करायचे?

दुसरी : आपल्याला विचार करण्याची जरूरीच नाही. पिढीजात आपला धंद असाच आहे. हा गेला तर तो. तो गेला तर आणखी कोणी. जगात पुरुष आहेत तोपर्यंत आपणास चिंता नाही.

तिसरी : बरे झाले मेला गेला तो. पैसे देई, पण अगदी घाणेरडा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel