'या प्रस्तुतच्या खटल्यात आरोपी म्हणून जो मनुष्य उभा करण्यात आला आहे. तो संपूर्णपणे निर्दोषी आहे आणि तुम्हाला आरोपी पाहिजे असेल तर तो मी आहे. तुरुंगातील पोलिसांनो, माझ्याकडे पाहा. नीट पाहा. म्हणजे तुम्ही मला ओळखाल. जे कैदी साक्षीदार म्हणऊन आणण्यात आले आहेत त्यांना मी ओळखतो. त्यांनी व मी एकत्र होऊन एकदा या पोलिसांना बेदम मारलं होतं. यासाठी मला फटक्यांची शिक्षा झाली होती. माझ्या अंगावर ते वळ अजून दिसतील. तुरुंगातील भटटीजवळ काम करताना एकदा मी भाजलो होतो ते डाग माझ्या पाठीवर आहेत. तुम्हाला बघायचे आहेत? थांबा. मी अंगरखा काढतो. हं, हे पाहा ते डाग. आहेत ना? थांबा. अंगात घालू दे हं. आलं लक्षात? या पोलिसांना, माझ्यासारखा दिसला एक तगडा माणूस, केला त्याला उभा. हा चावटपणा आहे. पोलिसांना याची लाज वाटली पाहिजे. चोर सोडून संन्याशाला सुळी देण्यात पुरुषार्थ नाही.

'आज बारा वर्षं मी जवळच्या शहरात वावरतो आहे. तेथल्या नगरपालिकेचा मी अध्यक्ष आहे. मी कारखाने उभारले आहेत. दवाखाने घातले आहेत. मंदिरं बांधली आहेत. पोलिसांना का मी दिसत नव्हतो का त्यांना ओळखता आलं नाही? मी का लपूनछपून होतो? राजरोस वावरतो आहे. सभांतून बोलतो आहे. मानपत्रं घेतो आहे. पोलिसांच्या अकलेचं दिवाळं निघालं आहे.'

'आरोपी मी आहे. मी पळून गेलो होतो. तुरुंगात एखादा कैदी गेला की, तो कायमचा कैदी होतो. मी प्रथम का गेलो तुरुंगात? कोणता केला गुन्हा? माझ्या घरी भावंडांना खायला नव्हतं. आम्ही बेकार होतो. उद्योगधंदा मिळेना. काम करायला तयार असून काम नाही. उपाशी बहीणभावंडं माझ्यानं बघवतना. मी रस्त्यातून चाललो होतो. एका हॉटेलात पाव दिसले. चोरले दोन पाव. पळत पळत घरी गेलो व माझ्या भावंडांना दिलं; परंतु मला पकडण्यात आलं. दोन पावांसाठी मला पाच वर्षांची सजा झाली. घरी भावंडांचं काय होईल हा विचार सारखा मनात येई. पाच वर्षं तुरुंगात राहायचं? मी पळून गेलो; परंतु लगेच मला पकडण्यात आलं. पाच वर्षांची सजा बारा वर्षें झाली. पुन्हा मी पळून गेलो. दुसर्‍या बाजूला गेलो. तेथे भटक्या व उडाणटप्पू म्हणून खटला भरण्यात येऊन पुन्हा माझी तुरुंगात पाठवणी केली गेली. तेथून सुटलो. परंतु कोणी आधार देईना. एका साधूनं आधार दिला; परंतु त्याच्याकडचं चांदीचं ताट मी चोरलं. का चोरलं? त्या भांडवलावर काही धंदा करीन, प्रामाणिकपणं वावरेन. कारण चोराला कोण देणार भांडवल? एकदा चोर ठरला की पोलीस नेहमी त्याच्यावर आळ घेतात. त्याची समाजात प्रतिष्ठा नसते. जो तो त्याच्याकडे साशंकतेनं पाहातो. म्हणून ते ताट मी चोरलं. पुन्हा पोलिसांनी मला त्याच रात्री पकडलं. त्यांनी मारीत मारीत मला साधूकडे नेलं. साधू थोर मनानं म्हणाला, 'ते ताट त्यानं चोरलं नाही, मीच ते त्याला दिलं आहे.' पोलिसांना मी तसंच सांगितलं होतं. पोलिसांचा उपाय चालेना. मला सोडून ते गेले. तो साधुपुरुष मला म्हणाला, 'जा, पुन्हा आत्मा मळवू नकोस.' ते ताट  हे माझं भांडवल. त्या भांडवलावर मी उद्योग आरंभिला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel