मराठी भाषेचा शिवाजी चिपळुणकर

“मराठी भाषेचा मी शिवाजी आहे. माझ्यापूर्वी असा कोणी नव्हता, पुढें होणार नाही, ” अशी अभिनव अभिमान भाषा उच्चारणारे श्री. विष्णुशास्त्री चिपळूणकर, १८८२ मध्यें मार्चच्या १७ तारखेस गुरुवारीं पहाटे आपली अवघी बत्तीस वर्षांची परंतु असीम तेजस्वी अशी कारकीर्द  संपवून देहरुपानें निघून गेले. १८५० च्या २० मेला त्यांचा जन्म. जीं स्वप्नें त्यांनी मनांत खेळवलीं, जीं प्रत्यक्षांत आणण्यासाठीं त्यांनीं शेवटच्या श्वासापर्यंत धडपड केली तीं स्वप्नें आज स्वातंत्र्य-प्राप्ति होऊन कांही अंशीं पूर्ण झाली आहेत.

प्राथमिक शिक्षण होऊन ते इंग्रजी शिकूं लागले. पदवीधर झाले. वडील कृष्णशास्त्री त्यांना वकील, मुन्सफ व्हायला सांगत होते. परंतु भाषेची सेवा करणें त्यांनीं मनांत ध्येय ठरविलें होतें. वडील मराठींतील नामांकित लेखक. २५ वर्षे वडिलांनी हातांत खेळवलेली लेखणी पुत्रानें आपल्या हातांत घेऊन मराठी भाषेंत चमत्कार करुन दाखविले. १८७४ मध्यें ‘निबंधमाला’ मासिक सुरु होणार म्हणून ज्ञानप्रकाशांत जाहिरात झळकली. आणि सात वर्षें हें तेजस्वी मासिक चालले. त्याचे ८४ अंक निघाले. सारें लिखाण एकटांकी. शास्त्रीबोवाच निबंध लिहीत, परीक्षणें लिहीत, विनोदी चुटके लिहीत, थोरामोठयांच्या आख्यायिका देत. इतिहास, इंग्रजीभाषा, जॉन्सन, मोरोपंत, लोकहितवादी, देशाची सद्यस्थिती इत्यादी पुस्तकाकार होतील असे निबंध त्यांनी लिहिले. मराठी भाषा वाटेल तो विचार, वाटेल ती भावना व्यक्तवूं शकते ही गोष्ट नवसुशिक्षितांच्या नजरेस त्यांनी आणून दिली.

भारत परतंत्र झाला होता. ५७ चा प्रयत्नहि संपला. मिशनरी व कांहीं नव सुशिक्षित भारतीय इतिहास व संस्कृति यांवर जहरी टीका करीत होते. ज्यानें त्यानें उठावें व प्राचीन भारतावर दगड मारावे. अशावेळेस ही धीरोदात्त मूर्ति उभी राहिली व सर्व घरचे व परके टीकाकार थंड पडले. शास्त्रींबोवांना लोकहितवादी, महात्मा ज्योतिबा, न्यायमूर्ति रानडे, दयानंद वगैरेंवरहि प्रखर टीका करावी लागली. शास्त्रीबोवांना एक प्रचंड लाट परतवायची होती. स्वाभिमान जागवून नवपराक्रमास राष्ट्र उभें करावयाचें होतें. त्या काळांत जाऊं तेव्हांच त्यांच्या टीकेचें मर्म कळेल. परंतु ते प्रतिगामी नव्हते. लोकभ्रमासारखे निबंध त्यांनीं लिहिले. “स्त्रीचा पति मेला म्हणून जर ती अशुभ तर कोणाची आई मेली, बाप मेला तर तोहि कां अशुभ मानूं नये, पत्नी मरुन १३ दिवसहि झाले नाहींत तो पुन्हां लग्नाला उभा राहणारा मात्र शुभ ठरावा ना ?” असें ते विचारतात. जॉन्सनवरच्या निबंधाच्या अखेरीस लिहितात, “प्रस्तुत चरित्रापासून नवीन विद्वानांनी सतत उद्योग करण्याविषयीं उपदेश घ्यावा. त्यांना हल्ली जी पोकळ घमेंड वाटते कीं विश्वविद्यालयांतून आपण पार पडलो कीं ज्ञानाची अत्यंत सीमा गांठली, ती त्यांनीं अगोदर दवडली पाहिजे. तरुणजनांस वाचण्यालायक नानाप्रकारचीं मनोरंजक पुस्तकें , बहुश्रुत लोकांच्या उपयोगी पडण्यासारखें तऱ्हेतऱ्हेच्या माहितीचे चमत्कारिक ग्रंथ, देशांतील जुनी कविता व इतिहास सा-या भारतवर्षीयांच्या किंबहुना सा-या जगाच्या प्रीतीचें व पूज्यबुध्दीचें स्थान झालेली जी प्राचीन गीर्वाण भाषा तींत काय काय ज्ञानभंडार आहे, फारशी भाषेंत काय मौज आहे. याविषयीं शोध, हिंदुस्थानी, गुजराथी वगैरे एतद्देशीय भाषांचा मराठीशीं कितपत संबंध आहे, व्याकरणरित्या सर्वांचा कसकसा मेळ आहे. इत्यादी उद्योग करण्याचें आमच्या पुढारी मंडळीनें मनांवर घेतलें असतें तर आजची लोकांची स्थिती किती निराळी असती ? यासारखेंच देशी शेतीकडे व देशी व्यापाराकडे जर कोणी लक्ष दिलें असतें व आपल्या इंग्रजी ज्ञानाचा लाभ देशबंधूंस त्यांच्या भाषेच्या द्वारा करुन दिला असता व शेकडो व्यावहारिक कृत्यांचा संबंधानेंहि त्यांस माहिती करुन दिली असती, तर त्यांस सर्वांस केवढें भूषण झालें असतें ! ”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel