“घनश्याम, तुम्ही माझे प्रायव्हेट सेक्रेटरी व्हा. या नसत्या फंदात कशाला पडलात? मला सुंदर सुंदर वाचून दाखवा.”
“भूल कोणाला पाडू बघता! पैशाची, सुखाची मला लालसा नाही. श्रमणा-यांची मान उंच करणे हा माझा धर्म आहे. सांगा, काय करणार, बोला.”
“काही न केले तर तुम्ही संप करणार?”
“उपायच हरल्यावर संपाचाच रामबाण.”
“अहमदाबादला मागे गांधीजींच्या नेतृत्वाखालीही संप टिकू शकला नाही. तिस-या दिवशी कामगार कामावर जाऊ लागले. गांधीजींनीही उपवास सुरू केला. घनश्याम, संप सोपी वस्तू नाही. पोराबाळांची उपासमार होते. दुकानदार उधार देत नाही. या आगीत कामगारांना लोटू नका.”
“राजकीय स्वातंत्र्यासाठी देश आगीतून गेला. लोकमान्य, गांधीजी, यांनी लोकांना अग्निदिव्य करायला सांगितले. ते का वेडे?”
“परंतु तुम्ही कशासाठी हे करणार?”
“आर्थिक स्वातंत्र्यासाठी. नुसते राजकीय स्वातंत्र्य काय चाटायचे आहे? विजयाकडे त्यागाच्या पाय-या करूनच जावे लागते. कामगार आज त्याग करतील. पुढची पिढी सुखी होईल. अमेरिकेतील कामगार ५० वर्षांपूर्वी गोळीबारात मेले, फाशी गेले. परंतु कामाचे ८ तास झाले. सुखासुखी, फुकाफुकी कोणी काही देत नाही.”
“तुम्हांला सरकारने पकडले तर? अशांती निर्माण करण्याचा, धर्मावर टीका करण्याची आरोप करतील. लोकांच्या धार्मिक भावना दुखवाल तर समाजात प्रक्षोभ माजेल. धर्म म्हणजे का अफू?”
“होय; तुझ्या प्राक्तनामुळे तू गरीब आहेस, शनि-मंगळ तुला छळत आहेत, असे सांगणारा धर्म म्हणजे अफू. परंतु जो धर्म सर्वांना आत्मवत मानायला सांगतो तो अफू नव्हे. भगवान बुद्धांसारखा पुरुष उभा राहतो आणि चराचराविषयी आपलेपणा वाटतो. ती भावना अफू नव्हे. तो धर्म आहे का आपणाजवळ? कामगारांच्या दु:खाशी होता का कधी एकरूप? तुमचे बिर्लाशेठ म्हणाले, मंदिरावर आमचा विश्वास नाही, परंतु मंदिरे बांधून धार्मिक म्हणून आम्हांला मिरवता येते. संस्कृतीचे रक्षक म्हणून मिरवता येते. हे संस्कृतीचे रक्षक की भक्षक? ते दालमियाशेठ कामगारांना म्हणाले, पैसै म्हणजे काय माया आहे. परंतु स्वत: बेटा चैनीत लोळत असतो. मी कोणते पाप करायचे ठेवले आहे! – असे तो म्हणतो. एक लग्न, दुसरे लग्न, तिसरे लग्न;-- बायका म्हणजे जणू भाजीपाला. सुंदरदास, असे लोक धर्माचे नि संस्कृतीचे उद्धरकर्ते मानले जातात हा केवढा विनोद!”