सर्वाहून अधिक मंत्र्यांनी जपावे. निर्दोष हवे त्यांचे वर्तन, परंतु आज देशभर बुजबुजाट होत आहे. मंत्र्यांच्या गावाला, त्यांच्या शेतीकडे जाणारा रस्ता आधी होतो, तर जो गाव कित्येक वर्षे पावसाळयात त्रास होतो म्हणून सांगतो तेथे रस्ता नाही होत. कोणा मंत्र्याला तारेनेही सिमेन्ट मिळते, तर शेतकर्‍यांच्या वाटयास येणे कठीण. अशा वार्ता देशभर, गावोगाव आहेत. त्या सर्व खर्‍याच असतील असे नाही, खोटया असतीलही. परंतु असे हे गलिच्छ वातावरण आज निर्माण झालेले आहे. त्याला का कारण नसेल? या वातावरणात प्रखर त्यागाची, उज्ज्वल ध्येयवादाची स्वच्छ हवा आली तरच राष्ट्राचे प्राण वाचतील. आजच्या काँग्रेसी सरकारजवळ आहे ही शक्ती? ज्यांच्या राजवटी बरबटलेल्या होत आहेत, जे भांडवलदारांचे कैवारी म्हणून घेत आहेत, स्वच्छ स्पष्ट तात्कालिक योजना ज्यांच्याजवळ नाहीत, त्यांनी कामगारांना मिळणार्‍या  बोनसवर तेवढी वटहुकूमी दृष्टी ठेवली तर याचे समर्थन मी कसे करू? सरदार मागे मद्रासला म्हणाले, ''काँग्रेसला लवकरच आम्ही हुसकून लावू अशा स्वप्नात समाजवादी वगैरे आहेत, परंतु पांच-पंचवीस वर्षे तरी त्यांना आशा नाही.'' सरदारही स्वप्नात आहेत. गुजरातमधील एक थोर सर्वोदय कार्यकर्ते, गांधीजींचे निकटवर्ती सेवक कोठे म्हणाले, ''हे सरकार दहा-पंधरा टक्के लोकांचे. सरदारांचे धोरण असेच चालू राहील तर दहा-वीस वर्षांनी त्यांच्या नावे खडे फोडण्यात येतील.'' परंतु हे उद्‍गार सरदारांच्या कानावर कोण घालणार?

हे कोणी कोणाला सांगायचे? मुंबईच्या कामगारबंधूंना मी एवढेच सांगे की, शांती राखा, नुसते सरकारवर रागवून रुसून काय होते? आजचे सरकार दूर करायचे असेल, तुमचे प्रश्न सोडवणारे समाजवादी सरकार यावे असे वाटत असेल तर तुम्ही श्रमणार्‍यांनी डोळे उघडे ठेवून संघटित झाले पाहिजे. त्यासाठी शर्थीचे प्रयत्‍न हवेत. त्याग हवा. कष्ट हवेत. तरच पुढेमागे निराळे सरकार येऊ शकेल. बोनसच्या सक्तीच्या शिलकेपासून हा बोध घ्या. शांत राहून परंतु मनाशी खूणगांठ बांधून इंटकचे प्रातिनिधिक स्वरूपच उखडून टाका. इंटकचे सभासद होणे आत्मघातकी असे तुम्हांस वाटले पाहिजे. तरच तुमचा असंतोष प्रामाणिक आहे असे जनतेला वाटेल.

'सरंजामशाही नि भांडवलशाही आजवर रक्तशोषण करीत आली. आपण बदला घेऊ या. पाडू या मुडदे. सारी सत्ता विशिष्ट गटाच्या हाती घेऊ या,' असे हे कम्युनिस्टी लाल तंत्र. तेथे लोकशाही नाही. मानवता नाही. सत्तालोलुपांचा एक नवा वर्ग निर्माण होईल. जो त्यांना विरोध त्याला यमसदनास पाठवतील. कदाचित, भाकरीची व्यवस्था करतील. परंतु मोकळे बोलण्याची; वागण्याची चोरी व विरोधी बोलाल तर गोळी खाल. मित्रांनो, या भारतात नको हे राक्षसी प्रकार. परंतु कम्युनिस्ट ते सारे इच्छित आहेत. जनतेने त्यांच्यापासून दूर राहावे. गोडगोड थापा नकोत. घी देखा लेकिन बडगा नही देखा. सुखस्वप्ने दूर राहातील आणि छातीवर सदैव पिस्तुल मात्र रोखले जाईल. समोर पिस्तुल रोखल्यावर भाकर मिळाली तरी काय आनंद?

काँग्रेस धिमेपणाने जात आहे. समाजवादी स्वतंत्र संघटना करून लवकर समाजवाद यावा म्हणून प्रयत्‍न करीत आहेत. इंग्लंडमध्ये रत्तक्तपात न होता उशिरा का होईना समाजवाद येत आहे. थोडा वेळ लागतो; लागू दे. परंतु मानवी मूल्यांचा बळी देऊन लवकर काही मिळेल अशी आशा नको. कुत्र्याचे स्वातंत्र्य काय करायचे? भाकरी मिळते, पण गळयाला पट्टा. तर काय किंमतीची ती भाकरी? मग तो पट्टा कम्युनिस्टांचा असला तरी पट्टाच. जीवनात मोकळेपणा नसेल तर सारे फोल आहे. इंग्रजी गुलामी आणि दवडली. आता लाल गुलामगिरी, हूं की चू न करण्याची कम्युनिस्ट आणू पाहात आहेत. भारतातील जनतेने अशांच्या वार्‍या सही उभे राहू नये. कम्युनिस्ट संघटनेशी चुकूनही संबंध नको. कारण तेथे विश्वास नाही. केव्हा मान कापतील, उलटतील त्याचा भरवसा नाही. पिशाच्चांचे तंत्र!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel