आज मिरी सुमित्राताईंकडे राहायला जाणार होती. तिने सारे सामन घेतले. कृपाकाकांच्या वस्तू तिला पूज्य वाटत. तो कंदील, ती काठी, ती जुनी आरामखुर्ची, त्यांची टोपी. सारे तिने प्रेमाने बरोबर घेतले. यशोदाआईंना, शेजारच्या जमनीला विचारून ती गेली. नाना घरी नव्हतेच. जाताना तिचे डोळे भरून आले. कृपाकाकांची प्रेमळ खोली ! त्या लहानशा खोलीने तिच्या जीवनात केवढी मोलाची भर घातली होती ! या खोलीला प्रणाम करून ती गेली.

सुमित्राताईंच्या बंगल्यातील एक खोली तिला देण्यात आली. त्या स्मरणीय वस्तू तिने नीट ठेवल्या. तिने आपली खोली नीट लावली. ती सुमित्राताईंकडे गेली. त्यांच्याजवळ बसली. राहून राहून तिला वाईट वाटत होते.

'मिरे, रडू नकोस.'

'सुमित्राताई, वेलीला सारखे येथून उपटून तेथे लावायचे, असे केले तर ती नीट वाढेल का ? माझे दैव तसेच करीत आहे, नाही का ?'

'तू येथे परकेपणा नको मानूस.'

दिवस जाऊ लागले. स्वयंपाक करणार्‍या आजीबाई जरा मत्सरी होत्या. सुमित्राचे मिरीवरचे प्रेम पाहून त्या चरफडत. परंतु मिरी सारे मनांत गिळी. त्या आजीबाईंसही भाजी वगैरे चिरायला ती मदत करी. बगीच्यातून फुले आणून कृष्णचंद्रांच्या खोलीत फुलदाणी सजवून ठेवील. सुमित्राताईस वाचून दाखवी. वाचता वाचता सुमित्राताई तिला मध्येच समजावून देत. अनेक प्रकारची माहिती देत. ऐतिहासिक गोष्टी सांगत. मिरी आनंदू लागली. कधीकधी कृष्णचंद्रही तिलाच वर्तमानपत्रे वाचायला सांगायचे. मिरी फार सुंदर वाची. तिच्या वाचनातही जणू संगीत असे.

रविवारी मुरारी घरी येत असे. त्याला भेटायला मिरी जात असे. तो तिची त्या दिवशी वाटच पाहात असे. दोघे हसतखेळत फिरायला जात. पुढचे बेत रचीत. एका रविवारी मुरारी असाच घरी आला होता. त्याचे आजोबा त्या दिवशी घरातच होते. ते कामावर नव्हते गेले. मुरारी मिरी केव्हा येईल अशी वाट पाहात होता.

'मुरारी, त्या मिरीचा नाद तू सोड. कुठली पोर तो कृपाराम घेऊन आला ! काय आहे त्या पोरीत ? पुढे निराश व्हावे लागेल. ती त्या बडया बंगल्यात गेली राहायला. येथे राहिली असती तर ? कृपाराम किती वर्षे त्या खोलीत राहात होता. त्याच्या वास्तव्याने पवित्र झालेली ती खोली. ती सोडून का मिरीने जावे ? परंतु श्रीमंतांकडे राहायला मिळेल. बंगल्यात मजा करायला सापडेल. गेली. तू आहेस गरीब. समजलास ?'

'नाना, असे का म्हणता तुम्ही ? मिरीला तिळभर तरी गर्व आहे का ? कृपाकाकांनीच, 'सुमित्राताईंकडे जा' म्हणून मरताना तिला सांगितले होते. तिचे शिक्षण तेथे होईल. सुमित्राताईंनाही तिचा आधार होईल. नाही तर त्याही एकटया बसून असतात. त्या जणू तपस्विनीच आहेत. त्या मिरीला अधिकच चांगले शिकवतील. त्यांच्या संगतीत ती अधिकच उदार नि प्रेमळ होईल.'

'उगीच गोडवे गाऊ नकोस. मागून पस्तावशील.' असे म्हणून नाना- ते आजोबा बाहेर निघून गेले. मिरीविषयी कोणी वाईट म्हटले की मुरारीला खपत नसे. त्याला राग येई त्या माणसाचा. आजोबांचा त्याला राग आला. यशोदाआई जेव्हा बाहेरुन आल्या, तेव्हा तो त्यांना म्हणाला,

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel