मिरीने चहा आणला नि दोघांपुढे ठेवला.

'यांना दे की.'

'मी चहा घेत नाही.' सुमित्रा म्हणाली.

'व्रत आहे वाटते ?'

'तिचे सारे जीवनच व्रतमय आहे.' वडील म्हणाले.

'चहा झक्क झाला आहे. तूच करीत जा. त्या म्हातारबाईला असा करता नाही येणार. समजले ना ? माझे काम करीत जा. का या सुमित्राताईंचे फक्त करणार ?'

'ती सर्वांचेच करते.'

'मिरे, मला वर पोचव' सुमित्रा म्हणाली.

मिरीने हात धरून तिला खोलीत नेले. नवीन आईचे बोलणे ऐकून सुमित्रा असमाधानी दिसली, दु:खीकष्टी दिसली. आजपर्यंतचे तिचे शांतपणे जाणारे जीवन अशांत होणार की काय ?

घरात नवीन कारभार सुरू झाला. नव्या राणीसरकारांची नवी राजवट सुरू झाली. आजीबाईंना आजपर्यंत कोणी बोलले नव्हते. परंतु नवीन राणी येता-जाता त्या आजीबाईचा अपमान करी.

'एक भाजी नीट करता येईल तर शपथ. इतकी वर्षे चुलीजवळ काढली तरी कशी ? आणि यांनी खाल्ले तरी काय ? ही चटणी आहे का भरडा ? जरा अधिक नको का वाटायला ?'

'सुमित्राच्या वडिलांना जरा जाडजाडच आवडते.' आजीबाई म्हणाली.

'त्यांना जसे वाढता तसे ते खातात. त्यांना तशी जाडी चटणी आवडत असली तरी मला नाही आवडत. समजले ना ? नीट मनापासून करीत जा स्वयंपाक. येथे लाड नाही आता चालायचे. नाही तर दुसरी ठेवू बाई. बायांना काय तोटा ! तुम्हांला नवीन नवीन पदार्थ माहीत तरी आहेत का ? मी इकडची असले तरी मद्रासकडे गेला माझा जन्म. इडली वगैरे काही येते का ? पाकशास्त्राच्या पुस्तकात वाचा.'

'आता आधी वाचायला शिकवा.'

'मी शिकवू वाचायला ? नाचायलाही शिकवू का ?'

'फाजिलपणे बोलू नकोस. नवी राणी असलीस तरी या घरात वीस वर्षे मी काढली आहेत. खबरदार वेडेवाकडे बोलशील तर !'

ती नवी राणी गारच झाली. आजीबाई संतप्त होऊन निघून गेली.

घरात आता रोज उठून कटकटी असत. मिरी सर्वांना शांत करी, परंतु तिलाही शिव्याशाप मिळत. कृष्णचंद्र महिन्यातच कंटाळले. ते कामानिमित्त कोठे बाहेरगावी निघून गेले. मग तर काय, नव्या राणीसाहेबांस रान मोकळे सापडले !

एके दिवशी राणीसाहेबांनी मिरीला हाक मारली.

'काय नव्या आई?'

'तुझी खोली उद्या रिकामी कर.'

'कोठे नेऊ माझे सामान ?'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel