'काही वर्षे गेली. शांतारामविषयी मला किती प्रेम वाटे हे बाबांना कळून आले. आपल्या त्राग्यामुळे आपल्या मुलीचे असे जन्माचे मातेरे झाले असे मनात येऊन ते रडत. ते माझ्यावर अपार माया-ममता करीत. ते स्वत: मला वाचून दाखवीत. मला आनंद देण्यासाठी धडपडत. त्यांच्यासाठी मी समाधानी दिसू लागले. मी शांती शिकले. मिरे, परंतु आत वेदना आहे. कोठे आहे शांताराम ? अनाथ शांताराम तो मला भेटला नाही. मी त्याच्यावर रागावेन, तिटकारा करीन त्याचा, असे समजून का तो मला सोडून गेला ? माझे प्रेम का इतके क्षुद्र होते ? हातून नकळत झालेल्या अपघातामुळे मी का त्याला जबाबदार धरले असते ? परंतु तो पुन्हा आला नाही. त्याची मूर्ती माझ्यासमोर आहे. मरताना आई जे म्हणाली होती ते आठवते. शांतारामला अंतर देऊ नकोस. परंतु कुठे आहे तो ? माझ्या हृदयात आहे. परंतु तेवढयाने का समाधान असते ? शांताराम. मी तुझ्यावर नाही रे रागावले, असे त्याला मी कधी म्हणेन ? आज वीस-पंचवीस वर्षे मी त्याचे स्मरण करीत जगत आहे. कदाचित तो मला भेटेल या आशेवर मी जगत आहे. बाबांचे मन माझे कष्ट पाहून कष्टी होऊ नये म्हणून मी शांति-समाधानाने जगत आहे. सर्वांना प्रेम देत आहे. देवाचे राज्य जीवनात अनुभवीत आहे. मिरे, तुझा मुरारीही कदाचित पुन्हा तुझ्याकडे येईल. काही गैरसमज असतील. या जगातील बरेचसे दु:ख गैरसमजामुळे निर्माण होते. वाट पाहा नि समज असेच झाले की, मुरारी दुसर्‍या कोणाचा झाला तरीही शांतीने राहा. मुरीरीची मानसपूजा करुन शांती मिळव आणि आयुष्य जगाची सेवा करण्यात दवड. मी काय सांगू ? बाळ, अनुभवाच्या जोरावरच तुला मी हे सांगत आहे. वेदनांतून जाऊनच मी शांत झाले आहे. कुणाला न सांगितलेले हे दु:ख आज तुला मी सांगत आहे.'

बोलता बोलता, सुमित्रेचा आवाज सद्‍गदित झाला. तिच्या डोळयांतून अश्रू आले. ती शांतपणे, स्तब्धपणे बसली. मिरीच्या डोक्यावरून हात फिरवीत बसली.

'तुम्ही थोर आहात, सुमित्राताई. शापभ्रष्ट देवता आहात. तुमची शांती मी कोठून आणू ?'

'प्रयत्‍नाने नि विवेकाने आण. या विश्वात अनंत दु:खे आहेत. आपले दु:ख त्यांतीलच एक असे समज. ते आपले दु:खच उगाळीत बसू नकोस. स्वत:च्या दु:खाला विश्वाएवढे विराट करीत बसण्याचा अहंकार करू नये, समजलीस ?'

'मी प्रयत्‍न करीन. तुम्ही आता जाऊन पडा. उद्या येथून निघायचे आहे. विश्रांती घ्या.'

'तूही चल.'

'मी थोडया वेळाने जाऊन पडेन. कबूल करते.'

सुमित्रा उठून गेली. मिरी तेथेच काही वेळ बसून राहिली. शेवटी ती अंथरुणावर जाऊन पडली. रडून तिचे डोळे भरून येतच होते.'

केव्हा उजाडले ते मिरीला कळले नाही ! डॉक्टरांनी तिला उठवले. ती उठली. आज त्यांना जायचे होते. सारी तयारी झाली. डॉक्टर, सुमित्राताई, मिरी बंदरावर आली तो तेथे पुन्हा ते हृदय विध्द करणारे दृश्य मिरीच्या दृष्टीस पडले.

'मिरी, चल, काय बघतेस ?' डॉक्टर म्हणाले.

मिरीचा पाय निघेना. मुरारी होता तेथे. त्या तरुणीशी तो बोलत होता.

'मी लवकरच येईल.'

'भेट होईल ना ?'

'प्राण घुटमळत आहेत. किती सांगू ? लवकर का आला नाहीत ? पत्र नाही मिळाले ?'

'मिळाले. परंतु तितके गंभीर वाटले नाही. तुम्ही या हां. मी एकटी.'

ती तरुणी बोटीत येऊन बसली. मिरी दु:खाने आधीच जाऊन बसली होती. बोट सुटली. मुरारीने रुमाल फडफडवला.

'मिरे, दु:ख कमी झाले का ?' सुमित्राने विचारले.

'दु:ख वाढतच आहे. हृदय फुटतही नाही. तुम्हांला दु:ख होईल म्हणून हे प्राण धरले आहेत.'

'प्राण फेकू नये. तशी आलीच वेळ तर त्यांची आसक्तीही धरु नये. तू धीर धर. मी काय सांगू?'

'मी अभागीच आहे.'

'श्रध्दा ठेव.'

बोटीत तो अपरिचित परंतु थोडा परिचित झालेला पाहुणाही मिरीला दिसला. काय असेल ते असो, त्याला पाहून तिला धीर आला. जणू या कसोटीतून पलीकडे नेण्यासाठी देवाने त्याला पाठविले होते. तो मिरीकडे आला. तेथे बसला.

'मिरे, तुझी मुद्रा आज प्रसन्न नाही.' तो म्हणाला.

'सूर्यचंद्रांवर कधीकधी ढग येतात.' ती म्हणाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel