'सुमित्राताई, मिरी नसेल का वाचली ? पिंजर्‍यात हा पक्षी 'मिरे ये, मुरारी ये' सारख्या का हाका मारीत आहे. मिरी जिवंत नसती, तर हा जिवंत राहिला नसता असे मला वाटते.' ती म्हणाली.

'सारे प्रभूच्या हाती.'

मुरारीच्या धन्याची मुलगी वाचली होती. आपल्या मुलीचे प्राण वाचविणार्‍याचे उतराई व्हावे असे त्याच्या मनात येत होते. त्या व्यापार्‍याने जाहिरात दिली. शेवटी एके दिवशी तो अपरिचित पाहुणा त्या व्यापार्‍याच्या घरी गेला. त्याची मुलगी झोपाळयावर झोके घेत होती. वस्त्रलंकारांनी नटलेली होती, सुखी दिसत होती.

'बाबा, बाबा, ते आले.' असे म्हणत ती वर गेली. ती वडिलांना घेऊन आली.'

'यांनी माझे प्राण वाचवले.' ती म्हणाली.

'तुम्ही बरे आहात का ? आजारी होते ना ?' त्या पाहुण्याने विचारले.

'आता बरा आहे. तुमचा मी उतराई कसा होऊ ? माझी एकुलती एक मुलगी. तिच्यावर सारा लोभ. ती जरा दूर गेली तर माझे प्राण कासावीस होतात. ती गेली होती हवापालट करायला. परंतु तिला बोलावून घेतले. ती गेली नि इकडे मला कसे तरी होऊ लागले. गुदमरल्यासारखे वाटे. ताबडतोब मुरारीला पाठवले.'

'मुरारी ?'

'हो. मुरारी आफ्रिकेतून आला. तो येथे आला. परंतु मी आजारी. त्याला लगेच पिटाळले. त्याला घरीही जाऊ दिले नाही. त्याच्या मिरीलाही भेटू दिले नाही. 'मिरीला भेटू का ?'तो म्हणाला. मी म्हटले, 'नको. आधी जा नि माझ्या मुलीला पाठव.' त्याने मुलीला बोटीत बसविले. तो तिकडेच एक दोन दिवस राहणार होता. मिरी वगैरे तिकडेच आहेत. तिला तो भेटेल. पाच-सहा वर्षांत त्यांची भेट नाही.'

'मिरी तर यांच्याबरोबरच बोटीत होती. त्यांनी तुम्हांला नाही का सांगितले. तुमच्या मुलीला मी नाही वाचवले. सुमित्राताईंना किनार्‍यावर पोहोचवून मी पुन्हा पोहत बोटीजवळ आलो मिरीला नेण्यासाठी. परंतु मिरीने हिला खाली सोडले. मिरी समजून तुमच्या मुलीला मी नेले. तीरावर बघतो तो मिरी नसून दुसरीच हिरी निघाली. मी पुन्हा वेगाने उडी घेतली. परंतु बोट बुडाली होती. तुमच्या मुलीने ही हकीकत तुम्हांला नाही सांगितली ?'

'मला त्या मुलीचे नाव माहीत नव्हते. बर्‍याच वर्षांत मी मिरीला पाहिले नव्हते. शिवाय मी घाबरून गेले होते. मिरीने तोंडावरून बुरखा घ्यायला मला सांगितले होते. ती मिरी का होती ? कोठे आहे?'

'रत्‍नाकराने ते रत्‍न स्वत:जवळ घेतले.' तो म्हणाला.

'आपले नाव काय ?'

'मला अज्ञातच राहू दे.'

'तुमचा मी कसा उतराई होऊ ?' तुम्हांला काय देऊ ?'

'जगावर प्रेम करीत जा. व्यापारी असलेत तर केवळ नफेबाजीकडे पाहू नका. थोर मन ही सर्वांत मोठी दौलत होय. मिरी भिकारी होती, अनाथ होती. परंतु तिच्या हृदयातील श्रीमंतीसमोर कुबेर भिकारी दिसेल. ती अनाथ होती. परंतु दुस-यांची आधारदेवता झाली. जातो मी.'

असे म्हणून तो अपरिचित गृहस्थ निघून गेला. मिरीच्या दु:खाचे कारण त्याच्या लक्षात आले होते. परंतु मुरारीचे व्यापार्‍याच्या मुलीवर प्रेम नाही असे या संवादावरून त्याने ताडले. काही तरी मिरीचा गैरसमज झाला. परंतु कोठे आहे ती ? असेल का जिवंत ? त्याच्या मनात अशांतता होती.

तो प्रत्येक दिवशी बंदरावर जाई. मिरी कोठून येते का बघे आणि एके दिवशी एका बोटीतून मिरी खरेच उतरली. स्वप्नात आहोत की जागृतीत आहोत हे त्याला समजेना. होय मिरीच ती.

'मिरे, तुला न्यायला आलो आहे. माझ्या हातातून तू निसटलीस परंतु प्रभूने तुला वाचविले.'

'मी येणार म्हणून तुम्हांला कोणी कळविले ?'

'हृदयवेदनांनी.'

'देवाने मला वाचविले आणि आश्चर्य म्हणजे मीही वाचण्याची धडपड केली. एक तुकडा तरंगत होता. त्याच्या आधाराने मी तीर गाठले. दूर-दूरचे तीर. तिकडच्या लोकांनी माझी व्यवस्था केली. मी आले.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel